(गीति)
हाहा तुंबरु हुहू, वीणा घेऊन तीन गंधर्व ।
ईश्वर गुणांस वानित, कैलासीं चालिले जणूं पर्व ॥१॥
शिवदर्शनास जातां, कश्यप सदनीं करीत विश्रांती ।
स्नान करुनियां तेथें, पूजनविधियुक्त ते तिघे करिती ॥२॥
देवी शंकर विष्णू, आणि गजानन रवी असे पांच ।
देव बरोबर होते, स्थापित केले तिथें तिहीं साच ॥३॥
ऋषिपुत्रांसह दारीं, क्रीडत होता महोत्कट प्रीती ।
सदनीं प्रवेश करितां, पूजित मूर्ती बघून घे हातीं ॥४॥
फेकुन दिधल्यानंतर, गेला बाहेर तो मुलांसहित ।
ध्यान विसर्जुन बघती, मूर्ती गेल्या म्हणून ही मात ॥५॥
कश्यप मुनीस सांगति, ऐकून पुसती सुतास शिष्यांस ।
क्रोधें महोत्कटाला, पुसतां सांगे शिवे न मूर्तीस ॥६॥
अपुली आज्ञा होतां, घेइन मी शपथ पाहिजे तीही ।
एणेंकरुन त्याचें, चित्त नसे स्थीर जाहलें पाही ॥७॥
मुख उघडुनी रडे बहु पडला धरणीवरीच रावणसा ।
अदिती मुखांत त्याच्या, पाहे संपूर्ण विश्व ती सहसा ॥८॥
मूर्च्छित पडली अदिती, पाहे कश्यप तसेच गंधर्व
बघते झाले वदनीं, चवदा भुवनें सुपूर्ण तीं सर्व ॥९॥
कैलास पर्वतासह, शंकर विष्णू सहीत वैकुंठीं ।
विधि सत्यलोकवासी, इंद्रहि अमरावतीस जगजेठी ॥१०॥
अदिती सावध झाली, पोटीं धरिलें महोत्कटा स्नेहें ।
कश्यप चित्तीं ठसलें, सृष्टिनियंता सुपुत्र हा आहे ॥११॥
गंधर्वांस म्हणे तो, मूर्ती जरि घेतल्या मदिय सूतें ।
शासन करण्या मजला, बल नाहीं सांगतों तुम्हां मी तें ॥१२॥
तुमची इच्छा असली, शिक्षा करणें करा तुम्हीं माने ।
बोलाविलें तुम्हांला, भोजन करण्या मदीय कीं सतिनें ॥१३॥
तदुपरि कश्यप मुनिला, पंचायतनांशिवाय नच उदक ।
प्राशूं मग अन्न कसें, सेवूं हें बोलले तिघे पथिक ॥१४॥
ऐसें भाषण करुनी, पाहति ते बालकाकडे जेव्हां ।
गणपति शंकर विष्णू,रवि देवी तो नटे स्वयें तेव्हां ॥१५॥
त्यांच्या दृष्टिस पडलें, कौतुक वाटे तिघांस बहु मोठें ।
मानस तत्ठायीं तें, केलें स्थिर स्तोत्र गाइलें मोठें ॥१६॥