मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २८

क्रीडा खंड - अध्याय २८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

राज्यामाजी सुंदर, महिला कळतां अणून जुलुमानें ।

भ्रष्टवि बळजबरीनें, नित्यक्रम हा मदांध धुंदीनें ॥१॥

नातें जात न गोता, लहान मोठी असाहि भेद नसे ।

आणुन महिला सार्‍या, बळजबरीनें तयांस भोगितसे ॥२॥

विप्रस्त्री बालादी, हत्या त्यांच्या नसेच खिजगणती ।

वर्ते प्रधान त्यासम, पापें करिती प्रचूर सांगातीं ॥३॥

सर्व प्रजाहि झाली, त्रस्त खरोखर तदीय राज्यांत ।

नाम तयाचें घेतां, पातक लागेल ती प्रजा वदत ॥४॥

मृगयेसाठीं दोघें, जाती विपिनीं बघून बहु प्राणी ।

त्यांची ओझीं नगरीं, धाडुन मागें पुरांत येति झणीं ॥५॥

दिंडी

दैवयोगें कीं नयनिं दिसे मार्गी ।

जीर्ण मंदिरिं ते येति उभयवर्गी ।

तिथें थांबविती उभय मित्र घोडे ।

घेत विश्रांती हरित श्रमां थोडे ॥६॥

होति मंदिरिं त्या मूर्ति गणेशाची ।

बघुन आयति ते करिती पूजनाची ।

वनीं पूजन तें पत्र-पुष्प-पाणी ।

स्वयें अर्पुनियां निमिति उभय पाणी ॥७॥

(गीति)

घालुन प्रदक्षिणा ते, निघते झाले त्वरीत नगरांत ।

इतुकें पुण्य तयांच्या, जन्मामध्यें पडेच पदरांत ॥८॥

दशरथ राजा स्थापी, पुत्रासाठीं गजानन प्रभुसी ।

केली प्राणप्रतिष्ठा, वसिष्ट मुनिंनीं यथाविधी ऐसी ॥९॥

वरदगणपती नामा, ठेवियलें त्या गजानना मुनिंनीं ।

राजा अनुष्ठितां प्रभु, तोषुन झाला मुदीत वरदानीं ॥१०॥

राजाला प्रभु सांगे, पुत्रासाठीं उपाय वरदानीं ।

झाले पुत्र तयाला, चवघे तेव्हां प्रसिद्ध हे अवनीं ॥११॥

कौसल्यासुत रामा, लक्षूमण तो द्वितीय कांतेस ।

नाम सुमित्रा साजे, कैकयि प्रसवे द्विगुण सूतांस ॥१२॥

पहिला सूत प्रसवे, नाम तयाचें प्रसिद्ध तो भरत ।

शत्रुघ्न द्वितीय झाला, त्रिजगिं त्यांचें प्रथीत तें चरित ॥१३॥

नीती त्यजून दोघे, करिते झाले अशापरी राज्य ।

गेले यमसदनासी, नरकीं पडले बहूत दिन सहज ॥१४॥

नंतर अवनीवरि त्या, लोटुन दिधले पुढील जन्मास ।

काक दिवाभित झाले, बहु बहु वेळां जनीत जन्मास ॥१५॥

पुढती कीटक तैसे, जन्मति चांडाळ नीच यातीस ।

नंतर व्याध असुर ते, झाले अख्यात तेंच अवनीस ॥१६॥

व्याध असुर हे झाले, पूर्वीचे भूप आणखी मंत्री ।

मृगया करुन रानीं, पूजियला कीं प्रभू सुमन पत्रीं ॥१७॥

पूजाप्रभाव पुण्यें, झाल्या गांठी म्हणून उद्धार ।

ऐसें चरित्र त्यांचें, ऐके वामन चरीत हें मधुर ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP