(गीति)
गणपति सदनीं येती, शंभू स्तवि त्यास तेधवां फार ।
काशीवास करावा, कथिला हेतू सविस्तरें फार ॥१॥
अससी पुत्र म्हणूनी, सांगतसें कार्य हें तुला योग्य ।
नेईं सत्वर सिद्धिस, कार्य करी ऐकणें सुता योग्य ॥२॥
प्रभुनें तपास करितां, दीवोदासाकडून लव पाप ।
घडलें नाहीं ऐसें, दिसलें नाहीं पुरांत ही पाप ॥३॥
ज्योतिषरुपा धरिलें, मायेनें मग करी चमत्कार ।
स्वप्नें दाखवि लोकां, त्यांना वाटे अपूर्व तो फार ॥४॥
काशी-नगरामध्यें, नुकते गेले नवीन ज्योतीषी ।
पुसतां फळें तयांना, सांगति ते योग्य योग्य ज्योतीषी ॥५॥
पूजन करिती त्यांना, वर देती ते त्वरीत हो सफल ।
त्यांच्या वरप्रभावें, रोगी होती अरोग्य तत्काल ॥६॥
वस्तू-प्रश्न तसे कीं, फलती सत्वर मनोरथापरि ते ।
ज्योतिष प्रसिद्ध झालें, उद्यम त्यजिती समस्त मानवते ॥७॥
दीवोदास तयांना, आव्हानीं मंदिरीं पुसायासी ।
नृप-मंदिरांत जातां, बसवि असनीं तयांस पूजेसी ॥८॥
पुसतां प्रश्न तयांना, पटलें भूपास तेधवां सहजी ।
ज्योतिष फलांवरी कीं, बसला विश्वास त्या पुरामाजी ॥९॥
ज्योतिष छंद तयांना, लागे इतुका किं भाळले कीर्ती ।
विस्मृति स्वकूल देवा, ज्योतिषि दिसलें सुरांपरी मूर्ती ॥१०॥
सतरा दिवशीं येइल, भूपा तुजला पुरुष भेटेल ।
तो तुजला सांगे जें, ऐकें भूपा हितार्थ होईल ॥११॥
ज्योतिष कथितां कथितां, लक्ष असूं दे गुपीत समजेल ।
ऐसें सांगुन गेले, भूपति त्याचा सुमार्ग लक्षील ॥१२॥