(शिखरिणी)
पिता माता दोघें सदनिं बसलीं शांत मनसें ।
घडे एकाएकीं सुतशिर तदा पेंद समसें ।
बघोनी दृष्टीनें उभय करिती शोक मग तीं ।
सवें दोघें घेती शिरकमल तें स्वर्ग बघती ॥१॥
(वसंततिलका)
देवांतका कळत तात अधींच स्वर्गी ।
माता पिता करित शोक तदर्थ मार्गी ।
होती प्रविष्ट मग तीं नगरांत जेव्हां ।
देवांतका परम वाटत दुःख तेव्हां ॥२॥
(भुजंगप्रयात)
वदे रौद्रकेतू सूता साग्र हें कीं ।
मुनीसूत राजा गृहीं लग्र जें कीं ।
तयासाठिं आणी गृहीं काश्यपेया ।
वधी बंधु तूझा मही सूतराया ॥३॥
(उपजाति)
नरांतका हें कळतांच वृत्त । प्राणास त्याच्या हरणा-प्रयुक्त ।
पुरांत धाडी असुरांस गुप्त । गेले तिथें जे मुर ते समाप्त ॥४॥
(गीति)
तेव्हां कश्यपसूता, शिक्षा करण्या स्वतां तिथें गेला ।
एकहि वीर न उरला, समरांगणिं तो तिथेंच मृत झाला ॥५॥
त्याचें मस्तक अपुल्या, सदनीं पडलें कपिथ्यफल ऐसें ।
ऐकुन वृत्त पित्याला, देवांतक त्यास हें वदे ऐसें ॥६॥
कश्यपनंदन मारुन, नंतर विधि हा पुढेंच मी करिन ।
रंभेचा कोंब जसा, खोडावा त्या समान मारीन ॥७॥
ऐसें वदून जनका, केलें उड्डाण तेधवां त्यानें ।
त्याचे सेवक सारे, उडते झाले जणूच तीं पानें ॥८॥
घेरिति पुरास तेव्हां, राक्षस सारे वधोन पुरवासी ।
नृपमंदिराशिं जमले, तों दूतांनीं निवेदिलें प्रभुसी ॥९॥