(गीति)
अदिती वरप्रदानें, तोषित केली गजानन प्रभुनें ।
इकडे पीडित झाली, अवनी बहु त्या असूरभारानें ॥१॥
पूर्वस्वरुप बदलुनि, आली चरणांसमीप ती माझे ।
प्रार्थुन म्हणे मला ती, सोसत नाहीं असूर बहु ओझें ॥२॥
वदलों तियेस मग मी, असुरांपासून गे तुला पीडा ।
हवनें बंद म्हणूनी, हव्या-कव्यांसही असे पीडा ॥३॥
यास्तव आपण सारे, शरण रिघूंया गजानना आधीं ।
आधि निरशिल प्रभु तो, संसाराची चुकेल मग आधीं ॥४॥
म्हणती परमात्म्यासी, शास्त्रांमाजी तया निराकार ।
आकार त्यास येतां, म्हणती झाले तयास साकार ॥५॥
साकार देव होतां, त्याच्या हस्तें असूर हो हनन ।
विधीचें भाषण ऐकुन, सुर-मुनि-अवनी करीत तीं स्तवन ॥६॥
वदतीं झालीं देवा, व्हावें साकार कीं असुरनाशा ।
आम्ही पीडित झालों, मुक्त करीं तूं अम्हांस ही आशा ॥७॥
ऐसें स्तवीत असतां, तों एकाकीं विहत्ध्वनी थोर ।
तुम्ही भिऊं नका घे, कश्यपसदनीं गणेश अवतार ॥८॥
तेथें अद्भुत कृत्यें, करुनी फडशा असंख्य दुष्टांचा ।
बहुविध प्रकार करुनी, स्वकरें संहार तो करी साचा ॥९॥
(शार्दूलविक्रीडित)
आकाशीं ध्वनि जाहला अदितिच्या कुक्षीं प्रभू येतसे ।
झाले मास पुरे नऊ अदितिला झाली प्रसूती असे ।
तेजस्वी सुत तो बघून जननी नेत्रांस झांकीतसे ।
तेव्हां कश्यप तो सुतास नयनीं पाहे गती ती असे ॥१०॥
दोघें धैर्य करुन त्यास बघती बोले प्रभू त्यांस कीं ।
हे माते मजसी सु-भाव मजसी पूर्वी वरा देत कीं ।
तो मी पूर्ण करावयास उदरीं जन्मोन हो सूत मी ।
ऐसें भाषण ती करुन श्रवणीं मोदें मला ती नमी ॥११॥
तूझें दिव्य असें सुरुप लपवीं बालत्व रुपा धरीं ।
होईं मानव तूं इथें झडकरी प्रार्थीत ती सुंदरी ।
ऐकूनी मग मी तिथेंच उदरीं जन्मोन होई सुत ।
केलें रुदन तें श्रवोन जनकें विप्रांस पाचारित ॥१२॥
केला जातक कश्यपें विधि पुढें केलें असे बारसें ।
ठेवी नाम सुता ’महोत्कट’ असें मोदें करुनी असें ।
ऐकावें पुढती पुराण मुनि हो बोले तयां सूत तो ।
सांगे तेंच भृगू सुवृत्त पुढती ऐके सुखें भूप तो ॥१३॥