(गीति)
तेव्हां विनायकानें, अपुल्या बाणीं मधेंच तोडियले ।
कृत्या विनायकावरि, येते पाहून केश तोडियले ॥१॥
सिद्धींनीं धरिली ती, सुटली कृत्या त्वरीत हातींची ।
सिद्धी कोपे तेव्हां, धांवत गेली मुरावरी साची ॥२॥
अपुल्या सूता समरीं, जय होईना म्हणून योजूनी ।
असुरें मायें करुनी, अदिती निर्मी रणांत आणूनी ॥३॥
अदिती विटंबिती ते, राक्षस सारे रणांत प्रभु दृष्टीं ।
तेव्हां विनायकासी, त्वदीय माता असून मी कष्टी ॥४॥
करितां तुजला साहे, पाहसि सूता कसातरी दृष्टी ।
कोठें विक्रम गेला, षंढासम पाहसी कसा दृष्टी ॥५॥
ऐकुन विनायकाला, भाषण वाटे खरें करी शोक ।
झाली निराळ वाणी, दुःखी होऊं नको सख्या ऐक ॥६॥
मायावी माता ही, राक्षस निर्मी असे बरें सखया ।
माता पिताहि धामीं, क्षेम असूनी फसूं नको वायां ॥७॥
सावध युद्ध करुनी, वधणें दैत्यास या रणामाजी ।
शंकर वर दैत्याचा, स्मरुनी करणें वदे करी आजी ॥८॥
दैत्याचा वर ध्यानीं, आला तत्काळ तो उषाकाल ।
दुसरे दिवशीं गणपति, युद्धा गेला धरुन तो काल ॥९॥