मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय १८

क्रीडा खंड - अध्याय १८

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(भुजंगप्रयात्)

भृशुंडी मुनी पातले राजगेहीं ।

प्रभाती उठे भूपती नित्य पाही ।

करी नित्य कर्मे करी राजकार्या ।

सुरानंद खेळे बिदीं मित्रवर्या ॥१॥

तिथें नित्य खेळे कुमारासहीत ।

सभाकार्य पूर्तीस राजा करीत ।

सभेमाजि आला सजूनी असूर ।

म्हणे ज्योतिषी मी असें लांब-दूर ॥२॥

करीं ताडपत्रीं सु-पंचांग घेत ।

करीं माळरुद्राक्ष मोठीच घेत ।

करीं वस्त्र तें शुभ्रसें पांघरीलें ।

तसें ऊर्णवस्त्रा शिरीं बांधियेलें ॥३॥

ललाटीं टिळे लाविले चंदनाचे ।

असे लांब दाढी हनूभागिं त्याचे ।

अशिर्वाद देई नृपाला उचीत ।

असे भूपती तो तयाला नमीत ॥४॥

पुसे भूपती नांव गांवास त्याला ।

वदे हेमज्योती असे नाम माला ।

वसे भूपती नित्य गंधर्वलोकीं ।

त्रिकालज्ञ आहें नृपाळा विलोकीं ॥५॥

(गीति)

आल्यापासून मजला, दिसती चिन्हें घडेल अनहीत ।

राजा तुझ्या घरीं जो, आहे ब्राह्मणकुमार तो करित ॥६॥

कथितों कुमारलक्षण,नाहीं त्याचा सुरेख पायगुण ।

आहे विघ्नस्वामी, साधी हित तें त्यजून त्या जाण ॥७॥

जरि हा नगरीं राहिल, तरि नगरीची करील धुळधाण ।

ऐकुन राजा वदला, वदसी हें वाउगें असे जाण ॥८॥

त्याच्या पराक्रमाची, जाणिव नाहीं तुला असें दिसतें ।

प्रतिसृष्टिनिर्मिता हा, समर्थ बालक असें मला दिसतें ॥९॥

अनहित विनायकाचें, करणें मनिं हें नसेच सामर्थ्य ।

यानेंच नगर राज्या, रक्षियलें सांगतां तुम्हीं व्यर्थ ॥१०॥

क्रोधें ज्योतिषि वदला, ज्याचा मोठेपणा नृपा गासी ।

पाहें विनायकाला, आण इथें मूर्त ती बघायासी ॥११॥

राजा सेवक धाडी, आणी सत्वर विनायका तेथें ।

नमिलें विनायकानें, पुशिलें बोवास वृत्त हो तेथें ॥१२॥

बूवा कोठून आलां, सामुद्रिक जाणतां तुम्ही काय ? ।

सांगा मदीय देवा, धैर्यानें बोलतां वदे काय ॥१३॥

धरिला विनायकाचा, स्वकरें कर पाहुनि वदे त्यातें ।

ऐकें भाकित आतां, शांतपणें चित्त ठेवणें त्यातें ॥१४॥

चवथे दिवशीं कूपीं, पडसी जर वांचशी नदीं बुडशी ।

तेथून निभाव झाला, तरि तूं पडशी समुद्रडोहाशीं ॥१५॥

जरि वांचशी समुद्रीं, अंधःकारीं पडे तरी खास ।

त्यांतुन बचाव झाला, पर्वत अंगावरी पडे खास ॥१६॥

त्यांतुन तुजला सुटतां, भक्षिति दोघे तुला त्वरें काळ ।

संकटपरंपरा ही, टळण्यासाठीं निघे सवें बाळ ॥१७॥

नंतर तुजला पोंचवि, वदला हें ज्योतिषी तया बाळा ।

ऐकुन विनायकानें, मागितली मुद्रिकाच भूपाळा ॥१८॥

पुशिलें ज्योतिष त्यातें, अमुची वस्तू इथेंच हारवली ।

आहे कोणाजवळी, मिळेल केव्हां वदा असे मौलीं ॥१९॥

बूवा हास्य करुनी, वदले तुमची गमावलि वस्तू ।

सांपडली तर मजला, द्यावी लागेल तेधवां वस्तू ॥२०॥

ऐकुन विनायकानें, देणारच घे म्हणून ताडकन ।

मारी उरांत मुद्रा, ज्योतिषि पडला असूर धाडकन ॥२१॥

असुराचें कपट कसें, जाणियलें हें विनायकें कैसें ।

राजा फसला नाहीं, कौतुक केलें विनायकें ऐसें ॥२२॥

बालक नव्हे खरोखर, ईश्वर वाटे जनांस प्रत्यक्ष ।

भू-भार हरण करण्या, आला नगरांत दाखवी साक्ष ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP