(साकी)
कालांतक हा दैत्य असे कीं द्वंद्वयुद्ध हें करितो ।
प्रकाम्य नामक सिद्धि जियेला तिजसंगें करितो ॥१॥
धृ० ॥सुन सुन हें सखया समरकथा ऐकें या ।
दैत्यजातिला स्त्रीजातीशीं करणें युद्धा हें कीं ।
लाजिरवाणें आहे वाटे कविमत साच असें कीं ॥२॥
राक्षस समरीं सिद्धी लागी हरवित युद्धामाजी ।
कौशल्यानें वषितासिद्धी नेम धरित त्यामाजी ॥३॥
शिरसा लक्षुन पर्वत टाकी वधिला असुर तियेनें ।
नंतर समरीं मुसलमल्ल नी मणिमा या जोडीनें ॥४॥
प्रकाम्य सिद्धीसंगें लढते पुनरपि असूरजोडी ।
इषिता वषिता महिमा प्राप्ती लघिमा गरिमा सोडी ॥५॥
या सिद्धींनीं समरामाजी प्रचंड राक्षस दोनी ।
इतर असुर हे वधिले त्रयदिनिं युद्धासी या करुनी ॥६॥
ऐसें पाहुन देवांतक हा युद्धामध्यें शिरला ।
तेव्हां समरीं देववीर बहु असिनें वधिता झाला ॥७॥
असुरपराक्रम पाहुन तेव्हां देवसैन्य तें फुटलें ।
इकडे तिकडे देव सर्वही तेथून पळते झाले ॥८॥
देवसैन्य हें विलग पाहुनी आठी सिद्धी मिळुनी ।
एकजुटीनें असुरसैन्य त्या झाकित तरु-हीरांनीं ॥९॥
तेव्हां दैत्यें खड्ग घेउनी चूर्ण तयांचें केलें ।
आठहि सिद्धी निर्बल करुनी तेथें त्यां लोळविलें ॥१०॥
पाहुन बुद्धी स्थिती तयांची मागे आज्ञा प्रभुसी ।
असुरांची मी पाहिं परीक्षा मोद होत त्यांसी ॥११॥