अष्ट मंगलचिह्लें ( जैनधर्म )- १ मत्स्ययुगुलम् , २ नन्दावर्त ३ मद्रासन , ४ कुंभ , ५ श्रीवत्स , ६ दर्पण , ७ सम्पुट आणि ८ स्वस्तिक .
अष्ट मंगल घृत - १ वेखंड , २ कोष्ठ , ३ ब्राह्मी , ४ मोहरी , ५ उपळसरी , ६ सेंधेलोण , ७ पिंपळी आणि ८ तूप . यांच्या मिश्रनानें विधियुक्त बनविलेलें तूप . हें बुद्धिवर्धक आहे . ( योगरत्नाकर )
अष्ट मंजरी ( विदूषकी अथव थट्टेखोर सख्या )- १ रूपमंजरी , २ मंजुलीलामंजरी , ३ रसमंजरी , ४ रतिमंजरी , ५ गुणमंजरी , ६ विलासमजरी , ७ लवंगमंजरी , ८ कस्तुरीमंजरी , ४ रतिमंजरी , ५ गुणमंजरी , ६ विलासमंजरी , ७ लवंगमंजरी , ८ कस्तुरीमंजरी . अशा श्रीकृषणपत्नी राधेच्या आठ सखी होत्या . ( कल्याण ऑक्टो . १९५४ )
अष्ट मंत्री ( रामायणकालीन )- १ वसिष्ठ , २ वामदेव हे दोन ऋषि ऋत्विज , ३ सुयज्ञ , ४ जाबालि , ५ काश्यप , ६ गौतम , ७ मार्कंडेय व ८ कात्यायन , अशी राज्ययंत्रावर नियमन करणारी मंत्रिसंस्था रामायण कालीं होती .
वसिष्ठो वामदेवश्च मंत्रिणश्च तथापरे ।
सुयज्ञोऽप्यथ जाबालिःकाश्यपोऽप्यथ गौतमः ॥
मार्कंडेयस्तु दीर्घायुस्तथा कात्यायनो द्विजः ॥ ( वा . रा . बा . ७ - ४ )
अष्ट मर्यादागिरी - १ हिमालय , २ हेमकूट , ३ निषध , ४ गंधमादन , ५ नील , ६ श्चेत , ७ शृंगवार आणि ८ माल्यवान् . हे आठ मोठे पर्वत जंबुद्वीपांत असून ते त्यांतील नऊ भागांच्या मर्यादा आहेत .
अष्ट महारोग - १ वातव्याधि , २ अश्मरी , ३ कुष्ठ , ४ मेह , ५ उदर , ६ भगंदर , ७ अर्श ( मूळव्याध ), आणि ८ संग्रहणी . ( वाग्भट )
अष्ट मांगल्य - १ आरसा , २ फणी , ३ कुंकवाचा करंडा , ४ काजळाची डबी , ५ गंधपात्र , ६ झारी , ७ माप आणि ८ दिवा . हीं आठ शुभ चिह्लें मानिलीं आहेत . हें अष्ट मांगल्या केरळांत विशेषतः सर्व मंगल प्रसंगीं लागतें . ( स्त्री मासिक फेब्रु . १९६३ )
अष्ट महासिद्धि - १ अणिमा - शरीर सूक्ष्म्ज होणें , २ महिमा - शरीर मोठें होणें , ३ हलकें होणें , ४ प्राप्ति - सर्व प्राण्यांच्या इंद्रियांशीं त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपानें , संबंध घडाणें , ५ प्राकाश्य - ऐहिक व पारलौकिक स्थानीं भोग व दर्शनाचें सामर्थ्य येणें , ६ ईशिता - मायेची ईशाच्या ठिकाणीं असणारी प्रेरणा , ७ वशिता - आसक्त न होणें आणि ८ प्राकाम्यइच्छा करावी तें सुख अमर्याद प्राप्त होणें . ( ए . भा . १५ - ४२ ते ४७ ) या आठांखेरीज वाटेल ती इच्छा पूर्ण होणें अशी एक " कामवसयित्व " नामक नवबी सिद्धि महासिद्धींतच मोडते असें म्हणतात . ( माऊली विशेषांक )
अष्ट माता ( काव्याच्या )- १ स्वास्थ्य , २ प्रतिभा , ३ अभ्यास , ४ भक्ति , ५ विद्वत्कथा , ६ बहुश्रुतता , ७ स्मृतिदाढर्य आणि ८ अनिर्वेद
( सनाधान ).
स्वास्थ्यं प्रतिमाभ्यासो भाक्तिर्विद्वत्कथा बहुश्रुतता ।
स्मृतिर्दाढर्यमनिर्वेदश्च मातरोऽष्टौ कवित्वस्य ॥ ( सु . )
अष्ट मातृका ( देवशक्ति )- ( अ ) १ ब्राह्मी , २ माहेश्चरी , ३ कौमारी , ४ वैषणवी , ५ वाराही , ६ इंद्रणी , ७ चामुंडा आणि ८ महालक्ष्मी . या आठ देवशक्ति , आहेत . विवाहादि मंगलप्रसंगीं यांची पूजा करतात ; ( आ ) १ रौद्री , २ वैष्णवी , ३ ब्राह्मी , ४ कुमारी , ५ वाराही , ६ नारसिंही , ७ चामुंडा , ८ माहेन्द्री ( काशीखंड ). ( इ ) १ योगीश्चरी , २ माहेश्वरी , ३ वैष्णवी , ४ ब्रह्मणी , ५ कौमारी , ६ इंद्रजा , ७ यमदंधरा व ८ वराहा .
( वराहपुराण )
अष्ट महाद्वादशी - १ उन्मीलनी , २ वञ्जुली , ३ त्रिस्पृशा , ४ पक्षवर्धिनी , ५ जया , ६ विजया , ७ जयन्ती आणि ८ पापनाशिनी .
( ब्रह्मवैवर्तपुराण )
अष्ट महौषधी - १ सहदेवी , २ वचा , ३ व्याघ्री , ४ बला ५ अतिबला , ६ शङ्खपुष्पी , ७ सिंही व ८ सुवर्चला . देवाच्या अभिषेकास या आठ महौषधींचा उपयोग करावयाचा असतो . ( मत्स्य . २६७ - १४ - १५ )
अष्ट महारस - १ वैक्रान्तमणि , २ हिंगूळ , ३ पारा , ४ हलाहल , ५ कांतलोह , ६ अभ्रक , ७ स्वर्णमोक्षी व ७ रौप्यमाक्षी . ( आयुर्वेद )
अष्ट मूर्ति - ( अ ) १ पृथ्वी , २ आप , ३ तेज , ४ वायु , ५ आकाश , ६ सूर्य , ७ चंद्र आणि ८ ऋत्विंज . या ब्रह्माच्या आठ मूर्ती होत . ( वज्रकोश ); ( आ ) ( शिवदेवतेच्या )- १ शर्व , २ भव , ३ रुद्र , ४ उग्र , ५ भीम , ६ पशुपति , ७ ईशान आणि ८ महादेव . या शिवदेवतेच्या आठ मूर्ति आठ तत्त्वामध्यें अधिष्ठित आहेत . ( वायुपुराण )
अष्ट मूत्रें औषधी ( आयुर्वेद )- १ गाय , २ म्हैस , ३ शेळी , ४ मेंढी , ५ हत्तीण , ६ घोडा , ७ गाढवी व ८ उंटीण ( सुश्रुत सूत्र ४५ - १० )
अष्त भुजा - १ सुरभी , २ ज्ञान , ३ वैराग्य , ४ योनि , ५ शंख , ६ पंकज , ७ लिंग व ८ निर्वाणकम देवीच्या पूजेचे प्रसंगीं करावयाच्या या आठ प्रकारच्या मुद्रा , जपाच्या शेवटीं या मुद्रांचें प्रदर्शन करतात . ( शुक्ल - आह्लिक सूत्रावलि )
अष्ट योगिनी - ( अ ) १ मंगला , २ पिंगला , ३ धन्या , ४ भ्रामरी , ५ भद्रिका , ६ उत्का , ७ सिद्धा आणि ८ संकटा . या पार्वतीच्या आठ सख्या . या शुभाशुभ फल देणार्या आहेत . ( आ ) १ मार्जनी , २ कर्पूर - तिलका , ३ मलयगंधिनी , ४ कौमुदिका , ५ भेरुंडा , ६ माताली , ७ नायकी आणि ८ जया किंवा शुभाचारा . ( म . ज्ञा . को विभाग ७ )
अष्टयंत्रबल सिद्धि - प्राचीनकालीं युद्धोपयोगी अशा अष्टयंत्रबल सिद्धि प्रमुख होत्या . हीं आठ प्रकारचीं वाहने , होती , तीं - १ दिव्य विमान , २ पुष्पक विमान , ३ सौभ विमान , ४ सूत विमान , ५ हर्यश्च विमान , ५ हर्यश्च विमान , ६ प्लव विमान , ७ अमृतगवी आणि ८ शिला संतरिणी . ( चिंतनके नये चरण )
अष्ट रस - १ शृंगार , २ हस्य , ३ करुण , ४ रौद्र , ५ वीर , ६ भयानक , ७ बिभत्स आणि ८ अद्भुत . हे आठच रस नाटयशास्त्रांत भरतकालीं मानीत असत .
शृंगारहास्यकरुणा रौद्रवीरभयानकाः ।
बीभस्ताद्भुतसंज्ञौ चैत्यष्टौ नाटये रसाः स्मृताः ॥ ( भ . नाटय ६ - १६ )
अष्ट रस - ( आ ) शृंगार , वीर , करून आणि हास्य हे चार प्रकृति रस व वीभत्स , रौद्र , भयानक व अद्भुत हे चार गौण रस होत . कोणी कोणी " शांत " हा नववा रस समजतात .
निर्वेदस्थायिभावोऽस्ति नवमो रसःअ ॥ ( नासदीय सूक्तभाष्य )
अष्ट रस ( अध्यात्म )- १ पृथ्वी , २ जल , ३ वनस्पति , ४ मनुष्य , ५ वाचा , ६ ऋचा , ७ साम आणि ८ उद्नीथ म्हणजे ओंकार . हा आठवा श्रेष्ठ रस असें उपनिषदांत मानलें आहे .
स एष रसानां रसतमः परम परार्ध्योऽष्टमो य उद्नीथः । ( छांदोग्य )
अष्टलक्ष्मी - १ धनलक्ष्मी , २ धान्यलक्ष्मी , ३ घैर्यलक्ष्मी , ४ विजयालक्ष्मी ५ वीरलक्ष्मी , ६ संतानलक्ष्मी , ७ गजलक्ष्मी आणि ८ विद्यालक्ष्मी .
अष्टलवण - १ पादेलोण , २ ओंवा , ३ अमसुलें , ४ आम्लवेतस हीं एकेक भाग , ५ दालचिनी , ६ वेलदोडा , ७ मिर्यें प्रत्येकीं अर्धा भाग आणि ८ साखर सर्वांबरोबर घालून केलेलें चूर्ण ,
अष्टलोकपाल - १ चंद्र , २ अग्नि , ३ सूर्य , ४ वायु , ५ इंद्र , ६ कुबेर , ७ यम व ८ वरुण ,
’ अष्टानां लोकपालानां वपुर्धारयते नृपः ॥ ’ ( मनु . ५ - ९६ )
अष्टवर्ग - ( अ ) वर्णमालेंतील आठ वर्ण , अ , क , च , ट , त , प , य , श . ’ अकचटतपयश हे ख्यात । अष्टवर्ग असती शास्त्रांत॥ "
( क . माहात्म्य )
अष्टवसु - ( अ ) १ घ्रव , घोर , ३ सोम , ४ आप , ५ नल , ६ अनिल , ७ प्रत्यूष आणि ८ प्रभास , हे आठ चालू मन्वतरांतील धर्मर्षि व प्रचेतसदक्षकन्या वसु हिचे ठायीं झालेले वसुसंज्ञक देव . ( पद्म सृष्टिखंड ); ( आ ) १ द्रोण , २ प्राण , ३ घ्रुव , ४ अर्क , ५ अग्नि , ६ दोष , ७ वसु आणि ८ विभावसु , ( भागवत )
अष्टवायन - १ हलकुंड , २ सुपारी , ३ दक्षिणा , ४ खण , ५ सूप , ६ कंकण , ७ धान्य आणि ८ मणी ( एकसर ). या आठ सौमाग्यसंपन्न पदार्थांचें वाण देतात . त्यास अष्टवायन म्हणतात .
अष्टविकृति व त्यांचे कर्ते ऋषि - वेदमंत्रांतील अक्षराचें रक्षण आहेत . १ जटा - व्याडि , २ माला - वसिष्ठ , ३ शिखा - भृगु , ४ रेखा - अष्टा - वक्र , ५ ध्वज - विश्वामित्र , ६ दंड - पराशर , ७ रथा - कश्यप आणि ८ घन - अत्रि . ( विकृतवल्ली १ - ५ ) ( रावण भाष्य )
अष्ट विद्येश्चर - १ नंदी , २ महाकाल , ३ चंड , ४ भृंगरिटी , घण्टाकर्ण , ६ पुष्पदंत , ७ कपाली व ८ वीरभद्र . घण्टाकर्णः पुष्पदंतः वीरभद्रकः
एवमाद्या महाभागा महाबलपराक्रमाः ॥ ( सिद्धांत शिखामणि ) ( आ ) १ अनंत , २ सूक्ष्म , ३ शिवोत्तम , ४ एकनेत्र , ५ एकरुद्र , ६ त्रिमूर्ती , ७ श्रींकत व ८ शिखंडी ( पाशुपतदर्शन )
अष्ट विनायक - १ श्रीमोरेश्वर गणनाथ - मोरगांव जि . पुणें , २ श्री - बल्लाळेश्चर - पाली , ३ श्रीगनपति - रांजणगांव , ४ श्रीगजमुखविनायक - कर्जत - नजीक , ५ चिंतामणि - थेऊर जि . पुणें , ६ गिरिजात्मज लेण्याद्रि - जुन्नरजवळ . ७ श्री विघ्नेश्चर - ओझर जि . पुणें आणि ८ श्रीसिद्धिविनायक - सिद्धटेक - दौण्डजवळ . हीं महाराष्ट्रांतील अष्टविनायक स्थानें होत .
अष्ट विवाह - १ ब्राह्मविवाह - सालंकृत कन्यादान , २ दैवविवाह - यज्ञप्रसंगीं ऋत्विजास दान म्हणून , ३ आर्ष - धन घेऊन , ४ प्राजापत्य - धर्माचरणार्थ कन्यादान देणें , ५ आसुर - शुक्र घेऊन , ६ गांधर्वविवाह - परस्पर अनुमतीनें , ७ राक्षस - जवरीनें कन्यादान करून आणणें , आणि ८ पैशाचविवाह - चोरून आणून विवाह करणें , असे विवाहाचे आठ प्रकार प्राचीनांनीं कल्पिलेले आहेत . ( मनु . ३ - २१ )
अष्टवृत्ति ( मनाची स्थिति - भावना )- १ राग , २ करुणा , ३ भीति , ४ काळजी , ५ जिज्ञासा , ६ भावुकता , ७ लज्जा व ८ अभिमान .
अष्ट व्यूह ( शरीरस्थ )- १ अस्थिव्यूह , २ स्नायुव्यूह , ३ पचनेंद्रियव्यूह , ४ अभिसरणव्यूह , ५ श्वासेंद्रियव्यूह , ६ उत्सर्जकव्यूह , ७ शोषणव्य़ूह व ८ मज्जातंतुव्यूह . मानव शरीरांत अंतरिंद्रिंयांच्या नैसर्गिक योजनेच्या ज्या आठ व्यवस्था आहेत . त्यास व्यूह अशी संज्ञा शास्त्रकारांनीं दिली आहे . ( म . ज्ञा . को . वि . २० )
अष्टविध अन्न - १ भोज्य , २ पेय , ३ चोष्य , ४ लेह्म , ५ खाद्य , ६ चर्व्य , ७ निःपेय ( खीर कण्हेरी इ . ) व ८ मक्ष्य , असे आठ प्रकार
( आपटे - कोश )
अष्टविध प्रकार दुधाचे - १ गाय , २ म्हैस , ३ शेळी , ४ उंटीण , ५ स्त्री , ६ मेंढी , ७ हत्तीण व ८ गाढवीण . अशा आठ प्रकारच्या प्राण्यांचे दूध ( औषधाच्या कामीं ) वा पर ण्याचा सामान्यतः प्रचार आहे . " ऐभमेकशफं चेति क्षीरमष्टविधं स्मृतम् " ( अष्टांगसंग्रह सूत्रस्थान )