मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
कृष्णाचा पाळणा

कृष्णाचा पाळणा

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.



पहिल्या दिवशींचा पहिला मासोळा । गर्भ्या नारीचा ग रंग पिवळा । पिंड घडवितो कृष्ण सावळा । जू जू रे जु जु ॥१॥
दोनव्या महिन्या पदर बंद । चोळी पातळावर काढिला चांद । आई बापाशीं झाला आनंद । जु जु रे ॥२॥
तीनच्या महिन्या कंथाला ठाव । हळदीकुकुवानं ललाट ल्यावं । ओटी भरुनी खोबरं घ्यावं । जु जु रे जु जु ॥३॥
चवथ्या महिन्या कुसव चढ । अन्नापाणीशीं लागना ओढ । कवळ्या पानाशी बांधीती विडा । अबीर बुक्क्याचा उडवीती पुडा ॥४॥
पांचव्या महिन्या पांच फेर न । बाळ देवाशीं जात शरण । सांडलं  मोती घ्याव भरुन । जु जु रे जु जू ॥५॥
सहाव्या महिन्या सया सक्राती । चोळी पातळावर इच्छा पुरवीती । देवीला गोपा मागूनी घेती । जु जु रे जु जू ॥६॥
सातव्या महिन्या सात फेर न । कमरा बांधीती पोलादी विळा । कडो पाजिल्या लिंबाच्या डहाळया । बाळाच्या मुखीं अफूचा गोळा । जु जु रे जू जू ॥७॥


कृष्णाचा पाळणा :
पहिल्या दिवशीं जन्मिलं बाळ । कळस सोन्याचा देतोया ढाळ । पडला परकाश तिनीया ताळ । दिप्ती नेत्तर दोनीया डोळा । कसा मारीला बाळाचा काळ । करील भक्ताचा परतपाळ । जु बाळा जु बाळा जुजु रे ॥१॥
दुसर्‍या दिवशीं दुसरा रंग । रुप सावळं गोर्‍याचं अंग । जसं चमकतं आइन्यांतलं भिग । नागिनी पद्मिनी झाल्यात्या दंग येडया गवळणी बाळाच्या संग । श्रीकृष्ण बाळावर शिंपीती रंग । जु बाळा जु बाळा जु जु रे ॥२॥
तिसर्‍या दिवशीं आनंद मोठा । शीता सावित्री बायांनो ऊठा । दान धरम गाईच्या पेटा । खारीक खोबरं साखर वाटा । आयो नारीनों आवा ग लुटा । जु बाळ जु बाळा जु जू रे ॥३॥
चवथ्या दिवशीं चवथी करीती । आठ रंगाच्या बोलावून नारी । पाळणा बांधीला यश्वदा घरीं । त्याला लाविली रेशमी दोरी । जु जु म्हणून हालवितो हरी । पाळणा गातात न्हानाल्या पोरी ॥ जु बाळा जु बाळा जु जु रे ॥४॥
पांचव्या दिवशीं पांचवा राडा । रानसटवीनं येढीला वाडा । लिंब नारळ देवीला फोडा । तान्ही वासरं गाईला सोडा । तिनी सांजाचा अंगारा लावा । तान्ह्या बाळाची दृष्ट हो काढा । यश्वदा मातेचा जीव थोडा थोडा । जु बाळा जु बाळा जु जु रे ॥५॥
सहाव्या दिवशीं कल्लीचा वारा । जशा तुटती अस्मानी तारा । ऊठा सयांनों घागरी भरा । चला घेऊन यश्वदा घरां । कृष्ण जल्मला मान एक हिरा । राधा घालीति वारा । जु बाळा जु बाळा जुजु रे ॥६॥
सातव्या दिवशीं सातवीचें मोल । छप्पन रंगाचं काढीलं गोलं । चारी बाजूला चारीचं लाल । मधीं चंदन होईल मोल । श्रीकृष्ण मांडीवर यश्वदा झुल । जु बाळा जु बाळा जुजु रे ॥७॥
आठव्या दिवशीं आठवा थाट । भुलल्या गवळणी तीनशें - साठ । दह्या- दुधाचा भरुनी माठ । श्रीकृष्ण बाळाची पहात्यात वाट । जू बाळा जु बाळा जुजु रे ॥८॥
नवव्या दिवशीं नवाच फंद । तान्ह्या बाळानं घेतीला छंद । वसुदेवानं सोडवील बंद । धन कीं गवळ्या राजा तूं नंद । जु बाळा जु बाळा जु जु रे ॥९॥
दहाव्या दिवशीं दहायासी राती । तेहतीस कोटी देव मिळूनी येती । तान्ह्या बाळाला वंदूनी जाती । यश्वदा माता डोळ्यांनीं पहाती ।ओवाळूनी टाकिती माणिक मोतीं । जु बाळा जु बाळा जु जु रे ॥१०॥
आकराव्या दिवशीं आकरावा गदा । नित्त पाण्याच्या वाटेला उभा । सोडावा रस्ता जाऊंदे दादा । जु बाळा जु बाळा जु जुरे ॥११॥
बाराव्या दिवशीं बारसावळी । कंसमामाची जळती होळी । अनसूयानं वाजिवली टाळी । नांव ठेवावं वनैयामाळी । जु बाळा जु बाळा जुजु रे ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP