लग्नांतील गाणीं - ३१ ते ४०
हळदीचे घण भरतांना म्हणावयाचीं गाणीं
३१
अशी गेला कोण्या गांवा याचा घोर नाहीं मला ।
त्याच्या संगतीला देव मारवती गेला ॥
कशी माडीवरती माडी त्याला चंदनाची शिडी ।
गवळण वेडी कृष्ण गारुडी ग गारुडी ॥
३२
कडकडीत दडदडीत वीज लवली । जम्नागिरी गाया चारीतो ।
यश्वदेच्या बागेमधें पावा वाजतो । गाया चारीतो ।
आगाशीं बिजवा लवतो । त्यांतमधीं राघू बोलतो ॥
३३
गांवाला ग गेला कुण्या गांवाला ग गेला याचा घोर नाहीं मला ।
राजमंदिरीं झोंपेच्या भरीं । लक्ष्मी घाली वारा ।
सर्वा श्रृंगार गवळणीचा । विडा लवंगाचा । चुडा भिंगाचा ।
शिरीं माठ गवळणीचा । पदर जरीचा पिवळ्या रंगाचा ।
३४
अशी गेला कुण्या गांवा याचा घोर नाहीं मला ग ।
गांवी धरा धरा या कृष्णाला पाण्याच्या वाट चेंडू खेळतो रस्त्याला ॥
३५
चाल गोरे चाल कान्हा खेळतो गुलाल ।
असा दर्र्या खोल याचं पाणी मोठं गोड ।
सभेला पाणी गेलं राजानं नवल केलं ॥
३६
गौळणी गौळणी श्रीकृष्णानं नाच केला घागरी बांधुनी ।
चाल गडे चाल माझ्या दादाची चालणी ।
मखमली बोल याची पारोशी बोलणी ।
३७
चौघी गेल्या चहूकोनीं । मधवी गेली टाकोनी ।
रवीच्या नादाखालीं । लोणी गेलें विधरोनी ॥
३८
पगडी ग वरती लाल तुरा सई कोथमिरा ।
भरला मथुरेचा बाजार झाली दोपार ।
हरी भेटल ग भेटल वाटेवरी ।
कसा जाऊं देईना तरी ऐक श्रीहरी ।
गोष्ट नाहीं बरी मस्कर्या हो करी ।
आम्ही सासुरवाशिणी नारी जाच लई भारी जातों माघारीं ॥
३९
हौस मला मोठी पंढरीला जायाची । वाळवंटी राह्याची
चंद्रभागेला व्हायाची । उभ्या रस्त्यानं जायाची ।
आबीर बुका घ्यायाची । विठ्ठलला व्हायाची ।
४०
जरी बुका की मूठ फेका । जागोजाग विठ्ठलाच्या चरणीं लागा ॥
पंढरी बघा हरी ग पंढरी बघा ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP