सणाचे उखाणे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
१
तळूमळू सरावन पोळा । गौरीनं उघडला डोळा । गौरीचीं चित्रं । महाळाचीं पितरं । महालाची निवडली डाळ । आली घटाची माळ । घटाच्या माळेच्या दिल्या गाठी । शिलगणाला आली दाटी । शिलंगणाचं सोनं । केलं दिवाळीनं येणं । दिवाळीची पंती ।
संक्रांत आली नेमकी ।संक्रातीचं सुगाड । नयाच्या पुनवेचं दुगाड । नयाच्या पुनवेचा पुजती पाटा । शिमगा आला गजघाटा । शिमग्याची कांडती सोजी । शिपण्याचा उभारती गुढी । मारली आकरितीनं उडी । आकरितीचं पुजती कर । बेंदापावतर दम धर ।बेंदाचा पुजूं बैल । लाडवांत लाडू । साडवांत साडू । ***
२
वड सावित्रीचा पुजती वड । बेद्रानं केला चढ । बेंद्राची येती काव । आली पंचम धाव । पंचमीचा पुजतें नाग ।
आला गौराईला राग । गौराईचीं करतें घावनं । गणपती आलं पावणं । गणपतीची निवडतें डाळ । आली घाटाची माळ । घटाच्या माळेला देतें गाठी । शिलगणानं केली दाटी । शिलगणाचं घेती सोनं । देवदिवाळीनं केलं येणं । दिवाळीची पुजती पंती । संक्रांत
आली नेणती । संक्रांतीचें पुजतें सुगाड । माहीपुनं आली दुगाड । माहीपुनाची चोळली ओंबी । शिमगा खेळतो झोंबी शिमगाची मळतें कणीक । रंगपंचमी आली आणीक । रंगपंचमीचा उडवतें रंग । पाडवा आला जबरदंग । पाडव्याची उभारतें गुढी । आक्रितीनं मारली उडी । आक्रितीचा पुजतें करा । **** चं नाव घ्या माझ्या चंद्राबाईच्या लग्नापवतर दम धरा ।
३
हंडयावर हंड सात । वरल्या परातींत भात । भातावर तूप । तुपासारखं रुप । रुपासारखा जोडा । चंद्रभागेला पडला वेढा ।
चंद्रभागेंत चालल्या नावा । उठा उठा **** मला पंढरपूर दावा ।
४
पंढरपूरची पातळं । तुळजापूरचीं धोतरं । धोतराचा चटका । बाळपणाचा पटका । पटक्याची लेडी । अष्टपुरांत शिवली बंडी ।
बंडिकावी बंडिका । तांब्याची तामपत्रं दारांत । चला जाऊं थोरांत । थोराच पाणी अटलं । लिमळा गांवांत तीन दिवस नाहीं कटलं । वदीं आली मुंबईची ।मुंबई पाहिलं । पुण पाहिलं ।बडोदं राहिलं। वडोद्याला लागतो पैका ।******चं नाव घेती समस्त मंडळी एका ।
५
झुमझुमक येत होतें । खिडकीवाटे पहात होतें । खिडकीला तुणतुण ।अडकित्याला घुंगर बारा । हंडा मोडितें खांडांसाठीं ।
रुपया मोडतें पानासाठीं । येवढं सायास कुणासाठी । ****** च्या जिवासाठीं ।
६
तुण तुण तुरा । अडकित्याला घुंगरं बारा । **** जात्यात कळवातिणीच्या घरा । पानं खात्यात कराकरा । मी घालतें शेल्याच वारा ।
७
झण झण झण्यांत । बसलें मेण्यांत । गुलाल भांगांत । कसर चोळी अंगांत । मास मुठींत । खोबर्याच्या वाटींत ।
लवंगाच्या घाटींत । उपर पासोटीचं सोडलं सोगं । ****** कचेरीला उभं ।
८
झरझरी खमीस । त्याला कोथमिरी खिस । **** जिथं बसं तिथं चांदसुर्व्या दिसं ।
९
कणकण कुदळी मणमण माती । पोतरल्या भिंती । चितारले खांब । सासुबाईच्या पोटीं जलमले ***** राव ।
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP