नाव घेण्याचे उखाणे
लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.
१.
दारीं होती तुळस । मला गावला कळस । ते ठेवला केळी खांबी ।
केळीचा मऊ गाभा । मी पाडीतें गोड आंबा । आंबा दिला नणदाहातीं ।
अशी नणंद मनप्यारी । सकाळ उठून करते न्याहारी । अशी जाऊ शहाणी ।
आठा दिवसांनीं घालते पाणी । दारामधीं आड । वर डाळिंबाचं झाड । त्याचं डाळिंब किती गोड ।
काय बोललं खासं । मला आलं हसं । हसलें गालच्या गालांत । गेलें रंगमहालांत ।
विसरलें मायबाप । बहीणभावाची बुजाली सई । रंगमहालाला भिंगाची साई । सोन्याचं कारलं देवाला वाहिलं ।
****** साठीं नांदगाव पाहिलं ।
२.
माडीवर माडी । तिथं भरला कौलारी बाजार । दगडीचे घेतले करडी । त्याच्या घेतल्या अरडी । अरलंसुरलं शिंक्या लावलं ।
शिकं तुटलं मडकं फुटलं । वोघळ गेला देवदारकीं । देवदारकाचा पैका । आणा घालतें ऐका ।
आणा घालतें एक । देवरामाची लेक
आणा घालतें गहीन । तात्याबाची बहीण ।
आणा घालतें हौशी । भाऊदादाची मावशी ।
आणा घालती काशी । लक्ष्मणाची भाची ।
आणा घालती लाडी । भिकाची धोडी ।
आणा घालती पावणी । रामाची मेहुणी ।
आणा घालती तान्ही । मारुतरावाची राणी ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 25, 2018
TOP