हिंसा निषेध - ६२४१ ते ६२४३
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६२४१॥
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला ॥१॥
कोण त्याची करील कींव । जीवें जीव नेणती ॥२॥
पुढिलांसाठीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥३॥
तुका म्हणे कुटिती हाडें । आपुल्या नाडें रडती ॥४॥
॥६२४२॥
मारुं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापक पणें ॥१॥
एक सूत्र जिवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥२॥
नाहीं साहों येत दु:खाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य झालें ॥३॥
तुका ह्मणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥४॥
॥६२४३॥
जीवें जीव नेणे पापी सारिका चि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥
आत्मा नारायण सर्वा घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥२॥
देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठुराचे हात वाहाती कैसे ॥३॥
तुका ह्मणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महा दु:खें ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP