नाटाचे अभंग - ७१७० ते ७१७९
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७१७०॥
प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोढवीं कथा ॥ मति चौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥१॥
तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें ॥ मारग सिद्धाच्यानि पंथें । पावविसी तेथें तूं चि एक ॥२॥
आरंभा आदि तुझे वंदन । सकळ करितां कारण ॥ देव ऋषि मुनि आदिकरुन । ग्रंथपुराण निर्माणी ॥३॥
काय वर्णू तुझी गती । एवढी कैची मज मती ॥ दिनानाथ तुज ह्मणती । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥४॥
मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं ॥ तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥५॥
॥७१७१॥
प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार ॥ चतुर्भुज फरशधर । न कळे पार वर्णितां ॥१॥
तो देव नटला गौरीबाळ । पांयीं बांधोनि घागर्या घोळ ॥ नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥२॥
नटारंभीं थाटियला रंग । भूजा नाचवी हालवी अंग ॥ सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥३॥
जया मानवती देव ऋषी मुनी । पाहातां न पुरें डोळियां धनी ॥ असुर जयाच्या चरणीं । आदी अवसानीं तो चि एक ॥४॥
सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रुपा नाहीं पार ॥ तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥५॥
॥७१७२॥
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान ॥ विठ्ठल सिद्धींचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥
विठ्ठल कुळींचें दैवत । विठ्ठल वित्त गोत चित्त ॥ विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त हीं पाताळें भरुनी ॥ विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोहळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेले चाळा विश्व विठ्ठलें ॥४॥
विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता ॥ विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥५॥
॥७१७३॥
बर्वा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव ॥ दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण ॥ तुमचें झालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आतां ॥२॥
बरवें झालें आलों या ठाया । होतें संचित ठायींचा पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥३॥
जोडिलें न सरे हे धन । अविनाश आनंदघन ॥ अमृतमूर्ति मधुसूदन । सम चरण देखियेले ॥४॥
जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें ॥ लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥५॥
आतां या जीवाचीया साठीं । न सुटे पडलिया मिठी ॥ तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लवीं दिठी दुसर्याची ॥६॥
॥७१७४॥
मी तंव अनाथ अपराधी । कर्महिन मतिमंदबुद्धी । तुज म्यां पाठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानिधी मायबापा ॥१॥
नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥२॥
केला करविला नाहीं उपकार । नाहीं दया आली पीडितां पर ॥ करुं नये तो केला व्यापार । वाहिला भार कुटुंबाचा ॥३॥
नाहीं केलें तीर्थाचें भ्रमण । पाळिला पिंड करचरण ॥ नाही संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मूर्तीचें ॥४॥
असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय ॥ न कळे हित करावें तें । काय नये बोलूं आठवूं तें ॥५॥
आप आपण्या घातकर । शत्रु झालों मी दावेदार ॥ तूं तंव कृपेचा सागर । उतरीं पार तुका ह्मणे ॥६॥
॥७१७५॥
आतां पावेन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें ॥ अवघें सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥१॥
जवळी विठ्ठल रखुमाई । बहिणी बंधु बाप आई ॥ सकळ गोताची च साई । पारिखें काई ऐसे नेणिजे ॥२॥
जगदाकारीं झाली सत्ता । वारोनि गेली पराधीनता ॥ अवघे आपुलेचि आतां । लाज आणि चिंता दुर्हावली ॥३॥
वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं ॥ करवी तैसें आपण करी । भीड न धरी चुकल्याची ॥४॥
सोसिला होता सासुरवास । बहुतांचा बहुत दिवस ॥ बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥५॥
करिती कवतुक लाडें । जम बोलविती कोडें ॥ मायबाप उत्तरें गोडें । बोले बोबडें पुढें तुका ॥६॥
॥७१७६॥
सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला ॥ हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥
माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी ॥ सज्जन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥२॥
काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा ॥ मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥३॥
मज चालतां प्रयाणकाळीं । असतां न दिसती जवळी ॥ मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥४॥
आतां मज ऐसें करी गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा ॥ तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥५॥
॥७१७७॥
अगा ए सावळ्या सगुणा । गुणनिधिनाम नारायणा ॥ आमची परिसा विज्ञापना । सांभाळीं दीना आपुलिया ॥१॥
बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट ॥ तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥२॥
झालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी ॥ न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥३॥
येथें तों नये आठव कांहीं । विसांवा तो क्षण एक नाहीं ॥ पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं न दिसे चि ना ॥४॥
जीवित्व वेंचिलें वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें ॥ कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥५॥
माझा मींच झालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु ॥ कासया घातला पसरु । अहो जगद्गुरु तुका ह्मणे ॥६॥
॥७१७८॥
आतां मज धरवावी शुद्धी । येथुनी परतवावी बुद्धि ॥ घ्यावें सोडवुनि कृपानिधी । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥१॥
करिसील तरि नव्हे काई । राईचा डोंगर पर्वत राई ॥ आपुले करुणेची खाई । करीं वो आई मजवरी ॥२॥
मागील काळ अज्ञानपणें । सरला स्वभावें त्या गुणें ॥ नेणें आयुष्य झालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥३॥
आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय ॥ येथें म्यां येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥४॥
करुनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा ॥ आपुले नामीं घ्यावा प्रेमा । सोडवीं भ्रमापासुनियां ॥५॥
हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं ॥ करुं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका ह्मणे ॥६॥
॥७१७९॥
जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन ॥ जगजीवन नारायण । गाईन गुण तयाचे ॥१॥
जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरुनियां करीं ॥ पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥२॥
जो या असुरांचा काळ । भक्तजनप्रतिपाळ ॥ खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥३॥
जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी ॥ रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥४॥
जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा ॥ जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥५॥
जयाचें नाम पाप नासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी ॥ तो हा तेज:पुंजरासी । सर्वभावें त्यांसी तुका शरण ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2019
TOP