सेतावर अभंग - ७१२० ते ७१२५
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७१२०॥
सेत करा हे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं ॥२॥
सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥३॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥४॥
कर्म कुळवणी । न लगे धर्मपाळी दोन्ही ॥५॥
ज्ञानपाभारी तो फणी । न लगे करावी पेरणी ॥६॥
बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचें ॥७॥
नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोर्याच्या तेटें ॥८॥
पीक न वजे हा भरंवसा । करी उद्वेग तो पिसा ॥९॥
सराई सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥१०॥
प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥११॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१२॥
॥७१२१॥
वोणव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥
तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहूनी जागा ॥२॥
चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥३॥
डोळे झांकूनी राती । कूपीं पडे दिवसा जोती ॥४॥
पोसी वांज गाय । तेथें कैंची दूध साय ॥५॥
फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥६॥
॥७१२२॥
तुळसी पीक आलें दैव दुणावलें । बलाई गेली गेलें सेत तरीं ॥१॥
आतां उणें काय आमुच्या कुटुंबा । वृंदावनीं अंबा पिकली आहे ॥२॥
एक एक पान त्रिभुवनासमान । नवनिधी धन तुका म्हणे ॥३॥
॥७१२३॥
मेरुचे पाठारीं आह्मी केलें सेत । पेरियलें तेथ काय पहा ॥१॥
सोहं ऐसें बीज पेरे आत्मशेत । रात्रंदिस तेथ चोज वाटे ॥२॥
सत्रावीचें तेथें लाऊनीयां पाणी । अखंड उन्मनीं राहतसे ॥३॥
इच्छा मन गाई सोकल्या वोढाळ । त्यांनीं वेळोवेळ केला नाश ॥४॥
काम क्रोध मद मातले ते पोळ । राखणा प्रबळ बोध बसे ॥५॥
ज्ञानबळें तयां घातलें वेसणी । सत्व झोंपाटणीं बुजे खिंडीं ॥६॥
वोजाविलें शेत खाऊं नाहीं दिलें । प्रेमपिक झालें एकविध ॥७॥
हुरडा होईना चित्त फार भ्यालें । दिवाण वारिलें कडमेरा ॥८॥
चित्त वेंटाळिली शुद्ध राशी केली । पाऊलें पूजिलीं विठोबाचीं ॥९॥
तुका ह्मणे रास भावें उचलिली । नेऊनी ठेविली देवापाशीं ॥६॥
॥७१२४॥
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोन । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥
सोंकरी विसावा तोंवरी । नको खाऊं उभें आहे तों ॥२॥
गोफणेसी गुंडा घाली पागोर्याच्या नेटें । पळती हाहाकारें अवघीं पाखरांचीं थाटें ॥३॥
पेटवूनी आगटी राहें जागा पालटूनी । पडिलिया मानी बळ बुद्धि व्हावीं दोनी ॥४॥
खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारुनियां ज्याचें भाग देई त्यासी ॥५॥
तुका ह्मणे मग नाहीं आपलें कारण । निज आलें हातां भूस झाडिलें निकण ॥६॥
॥७१२५॥
पांडुरंगा कौल दिले परात्पर । सेत केलें खरें पंढरीये ॥१॥
ज्ञानाचे नांगर धरिले निर्धार । सुकळ हा थोर हातां आला ॥२॥
पांच कुळवाडी सरकती केले । कापिला विठ्ठलें नाम सार ॥३॥
परमार्थ बैल आवडिनें जुंपी । तुका म्हणे खेपीं चुके आतां ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : June 10, 2019
TOP