नाटाचे अभंग - ७१८० ते ७१८९
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७१८०॥
काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण ॥ ऐसें तुह्मी सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥१॥
काय हें खंडईल कर्म । पारुषतील धर्माधर्म ॥ कासयानें तें कळे वर्म । ह्मणउनी श्रम वाटतसे ॥२॥
काय हो स्थिर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं ॥ धरिली जाईल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥३॥
काय ऐसें पुण्य होईल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी ॥ मज तो कुरवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥४॥
काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनि सोहळे ॥ संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥५॥
ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस हे चि तळमळ । तुका ह्मणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥६॥
॥७१८१॥
तूंचि अनाथाचा दाता । दु:ख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारी कृपावंता मायबापा ॥१॥
संतसंगति देई चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा ॥ हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥२॥
मज भाव प्रेम देई कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं ॥ विनंती माझी परिसावी हे ॥३॥
आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तिविण मायबापा ॥४॥
जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोढवावी रंगकथा । पुरवी व्यथा मायबापा ॥५॥
॥७१८२॥
सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें ॥ आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥
आपुले इच्छे आणिकां पीडि । काय तें देईल बराडी ॥ कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धि अधरा ॥२॥
दासीचा पाहुनरउखतें । धणी देईल आपुल्या हातें ॥ करूणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शक्तिहीन ॥३॥
काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे न फिटे धणी ॥ सीण तरी आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥४॥
विलेपनें बुजविती तोड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड । ऐसियास भांड ह्मणे देव तो ॥५॥
तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन ॥ तुका ह्मणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥६॥
॥७१८३॥
विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव ॥ नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥
कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं ॥ माप या लागलें शरीरीं । झालियावरी सळे ओढिती ॥२॥
बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें झालिया तुटी ॥ भोगिले मागें पुढें ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥३॥
जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे ॥ चालिलों किती तें न कळे । दु:खे होरबळे भूकतान ॥४॥
एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित ॥ तें हें देह मानुनि अनित्य । न करिती नित्य नामस्मरण ॥५॥
तुका ह्मणे न वेचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल ॥ वेचितां फुकाचे चि बोल । केवढें खोल अभागिया ॥६॥
॥७१८४॥
आले हो संसारा तुह्मी एक करा । मुक्तिमारग हळूचि धरा ॥ काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा दचकसी ना ॥१॥
नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा ॥ ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥२॥
नाहीं दिलें पावेल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा ॥ नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥३॥
क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं ॥ ओढिती कांटवणा सोई । अग्निस्तंभीं बाही कवटाळविती ॥४॥
देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती ॥ लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥५॥
तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ ॥ पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमि ज्वाळ लोळविती ॥६॥
ह्मणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास ॥ करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका ह्मणे ॥७॥
॥७१८५॥
न बोलती तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा ॥ तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥१॥
उतरी आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर ॥ माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥२॥
दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी ॥ यथाशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥३॥
ह्मणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास ॥ धीर हा करुनि सायास ॥ न वजें येथून वचन ॥ हाचि माझा
नेम सत्य जाण । आहे नाहीं ह्मण तुका ह्मणे ॥५॥
॥७१८६॥
आतां मी न पडें सायासीं । संसारदु:खाचिये पाशीं ॥ शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥१॥
न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधले पाय ॥ आतां मज न विसंबें माय । मोकलुनि धाय विनवितसें ॥२॥
बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें ॥ त्रिगुण येतील लहरें । तेणें दु:खें थोरें आक्रंदलों ॥३॥
आणीक दु:खें सांगों मी किती । सकळ संसारस्थिती ॥ न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥४॥
आतां मज न साहवे सर्वथा । संसार गंधीची हे वार्ता ॥ झालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका ह्मणे ॥५॥
॥७१८७॥
आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं ॥ जवळीं अथवा दुरी धरीं । घालीं संसारीं अथवा नको ॥१॥
शरण आलों नेणतपणें । भाव आणि भक्ति कांहीं च नेणें ॥ मतिमंद सर्वज्ञानें । बहु रंक उणे रंकाहुनी ॥२॥
मन स्थिर नाहीं माझिये हातीं । इंद्रियें धांवतां नावरती ॥ सकळ खुंटलिया युक्ती । शांति निवृत्ति जवळी नाहीं ॥३॥
सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव ॥ आतां करीं कळे तो उपाव । तूंचि सर्व ठाव माझा देवा ॥४॥
राहिलो धरुनि विश्वास । आधार नेटी तुझी कास ॥ आणिक नेणें मी सायास । तुका ह्मणे यास तुझें उचित ॥५॥
॥७१८८॥
देवा तूं कृपाकरुणासिंधु । होशी मायबाप आमचा बंधु ॥ जीवनसिद्धी साधनसिंधु । तोडसी भवबंधु काळपाश ॥१॥
शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार ॥ सकळां देवा तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥२॥
भागलीं स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार ॥ जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥३॥
नेणें भाव परि ह्मणवीं तुझा । नेणें भक्ति परि करितों पूजा ॥ आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥४॥
तुझिया बळें पंढरीनाथा । झालों निर्भर तुटली व्यथा ॥ घातला भार तुझिया माथां । न भी सर्वथा तुका ह्मणे ॥५॥
॥७१८९॥
कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी ॥ अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥१॥
प्रथम केला गर्भी वास । काय ते सांगावे सायास ॥ दु:ख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥२॥
बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा ॥ वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥३॥
क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौर्याशीं घेतल्या धांवा ॥ भोवंडिती पाठी लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥४॥
आतां पुरे ऐसी भरोवरी रंक होऊनि राहेन द्वारीं ॥ तुझा दास मी दीन कामारी । तुका ह्मणे करीं कृपा आतां ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2019
TOP