धुर्वक अभंग - ७०८२ ते ७१०८
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७०८२॥
करिसी की न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥
देसी कीं न देसी पायांचें दर्शन । ह्मणऊनि मन स्थिर नाहीं ॥२॥
बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । ह्मणोनियां जीवा भय वाटे ॥३॥
होईल कीं न होय तुज माझा आठव । पडिला संदेह हाचि मज ॥४॥
तुका म्हणे मी तों कमाईचें हीण । म्हणऊनी सीण करीं देवा ॥५॥
॥७०८३॥
ऐसा माझा कोण आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥१॥
काय सेवा रुजू आहे सत्ताबळ । तें मज राऊळ कृपा करी ॥२॥
काम याति शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥३॥
कोण तपोनिधि दानधर्मशीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥४॥
तुका म्हणे वांयां झालों भूमीभार । होईल विचार काय नेणों ॥५॥
॥७०८४॥
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काय नव्हे ॥१॥
करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥२॥
शुद्ध माझा भाव होईल तुझे पायीं । तरीच हें देई निवडूनी ॥३॥
उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥४॥
तुका म्हणे मज पायांसवें चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥५॥
॥७०८५॥
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥
नाहीं ऐसा झाला देव माझ्या मतें । भुकेलें जिवितें काय जाणे ॥२॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबेचि ना ॥३॥
झालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥४॥
तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥५॥
॥७०८६॥
न कळे तत्वज्ञान मूढ माझी मति । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥१॥
आगमाचें भेद मी तों काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसे ॥२॥
कांहीं नेणें परि म्हणवितों दास । होईल त्याचा त्यास अभिमान ॥३॥
संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥४॥
मागिल्या लागाचें केलेंसे खंडन । एकाएकीं मन राखियेलें ॥५॥
तुका म्हणे अगा रखुमादेवीवरा । भक्तकरुणाकरा सांभाळावें ॥६॥
॥७०८७॥
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥
इतुलें करी देवा ऐकें हें गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥२॥
इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतचरणरज वंदीं माथां ॥३॥
इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥४॥
भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका म्हणे आतां शरण आलों ॥५॥
॥७०८८॥
तुझा दास ऐसा म्हणती लोकपाळ । म्हणऊनी सांभाळ करीं माझा ॥१॥
अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥२॥
माझे गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाहीं ॥३॥
नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥४॥
तुका म्हणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥५॥
॥७०८९॥
जाणावें तें काय नेणावें तें काय । ध्यावें तुझे पाय हेंचि सार ॥१॥
करावें तें काय न करावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥२॥
बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हेंचि सार ॥३॥
जावें तें कोठें न जावें ते आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥४॥
तुका म्हणे तूं करिसी तें सोपें । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥५॥
॥७०९०॥
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव । मी भक्त तूं देव ऐसें करीं ॥१॥
दावीं रुप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥२॥
पाहोनी श्रीमुख देईन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥३॥
पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनी एकांत सुखगोष्टी ॥४॥
तुका ह्मणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥५॥
॥७०९१॥
मागें शरणागत तारिले बहुत । ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥१॥
पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥२॥
अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्या ॥३॥
गजेंद्रपशु नाडिला जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥४॥
प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥५॥
पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तूं कैवारी नारायण ॥६॥
तुका ह्मणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥७॥
॥७०९२॥
तुझा शरणागत झालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥१॥
पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥२॥
अनाथाचा नाथ बोलतील संत । ऐकोनियां मात विश्वासलों ॥३॥
न करावी निरास न धरावें उदास । देई याचकास कृपादान ॥४॥
तुका ह्मणे मी तों पातकांची रासी । देई पायापासी ठाव देवा ॥५॥
॥७०९३॥
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नि जैसा ॥१॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥२॥
घडे ज्या उपकार भूतांची ते दया । आत्मस्थिती तया अंगीं वसे ॥३॥
न बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनी तो जनीं जनार्दन ॥४॥
तुका ह्मणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडी मांडी ॥५॥
॥७०९४॥
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्म निधान हातीं चढे ॥१॥
कुळधर्मे भक्ति कुळधर्मे गति । कुळधर्म विश्रांती पाववील ॥२॥
कुळधर्मे दया कुळधर्मे उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥३॥
कुळधर्मे महत्त्व कुळधर्मे मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥४॥
तुका ह्मणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरी होय ॥५॥
॥७०९५॥
पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥
सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणिक हें वर्म नाहीं दुजें ॥२॥
गति तेचि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥३॥
संतांचा संग तोचि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥४॥
तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥५॥
॥७०९६॥
न वजें वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥१॥
न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥२॥
न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥३॥
न वजे वांयां झालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥४॥
तुका ह्मणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥५॥
॥७०९७॥
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमार । सकळ विढार संपत्तीचें ॥१॥
कंठीं धरीन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥२॥
पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां आगर लावण्याचें ॥३॥
करीन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥४॥
तुका ह्मण हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥५॥
॥७०९८॥
बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दु:ख काय जाणे ॥१॥
तयापरी करीं पाळण हें माझें । घेऊनियां ओझें सकळ भार ॥२॥
कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥३॥
सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥४॥
जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित झालें ऐसें ॥५॥
तुका ह्मणे तुह्मी तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों द्यावी ॥६॥
॥७०९९॥
जीवनावांचूनी तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥
न संपडे झालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥२॥
मातेचा वियोग झालिया हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥३॥
सांगावे ते किती तुह्मांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥४॥
येचि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥५॥
तुका ह्मणे तूं हें जाणसी सकळ । यावरी कृपाळ होई देवा ॥६॥
॥७१००॥
शरण आलें त्यासी न दावी हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥
आळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥२॥
गांजलियांचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥३॥
भागलियाचा होईरें विसावा । परिसावी देवा विज्ञापना ॥४॥
अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥५॥
तुका ह्मणे आह्मां विसरावें ना देवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥६॥
॥७१०१॥
कोण आह्मां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥१॥
कोणापाशीं आह्मीं सांगावें सुख:दुख । कोण तानभूक निवारील ॥२॥
कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥३॥
कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझाविल ॥४॥
कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होईल साहाता कोण दुजा ॥५॥
तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥६॥
॥७१०२॥
तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आह्मां मुक्तिपांग काई ॥१॥
धांवा केला आतां येई वो धांवोन । येथें काई करणें न लगे संदेह ॥२॥
गायनाचा आतां कोठें उरला काळ । आनंदें सकळ भरी आलें ॥३॥
देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥४॥
तेव्हां झाली अवघी बाधा वाताहात । प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥५॥
तुका ह्मणे आह्मी जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥६॥
॥७१०३॥
तरी कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शक्तिहीन ॥१॥
कीर्तिविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥२॥
तरीच ह्मणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥३॥
चांगलेंपण हें निरुपमता अंगीं । बाणलें श्रीरंगीं ह्मणऊनी ॥४॥
तरीच हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशी नाहीं ॥५॥
तुका ह्मणे तरी करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥६॥
॥७१०४॥
अवीट हें क्षीर हरिकथा माउली । सेवितां सेविली वैष्णवजनीं ॥१॥
अमृत राहिलें लाजोनी माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदें ॥२॥
पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥३॥
सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥४॥
निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरुनियां प्रीत गाये नाचे ॥५॥
तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होउनी ठेला ॥६॥
॥७१०५॥
संसारसोहळें भोगितां सकळ । भक्तां त्याचें बळ विठोबाचें ॥१॥
भय चिंता धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥२॥
पापपुण्य त्यांचें धरुं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावें ॥३॥
नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव भक्तां थोर सर्व वाहे ॥४॥
तुका ह्मणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निश्चिंत त्याचियानें ॥५॥
॥७१०६॥
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥
भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥२॥
देवें भक्तां रुप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥३॥
एका अंगीं दोन्ही झाली हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥४॥
तुका ह्मणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देवभक्त ॥५॥
॥७१०७॥
हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनी ठाके ॥१॥
गोपाळांची पूजा उच्छिष्टकवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥१॥
चोरोनियां खाये दूध दहीं लोणी । भावें चक्रपाणी गोविला तो ॥३॥
निष्काम तो झाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥४॥
जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥५॥
तुका ह्मणे हेंचि चैतन्य सांवळें । व्यापूनी निराळें राहिलेंसे ॥६॥
॥७१०८॥
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥१॥
आदराचे ठायीं बहुच आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥२॥
न ह्मणे सोइरा सुहृद आवश्यक । राजा आणि रंक सारिखाची ॥३॥
भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळेंचि ॥४॥
कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवूनी देव शंका फेडी ॥५॥
तुका ह्मणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 09, 2019
TOP