मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७२०१ ते ७२१०

नाटाचे अभंग - ७२०१ ते ७२१०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७२०१॥
बरें झालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं ॥
वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुह्मां समर्पण ॥१॥
दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश ॥
कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥२॥
बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं झाली ओढाओढी ॥
नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥३॥
तुह्मासि पावविली हाक । तेणें निरसला धाक ॥
तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥४॥
रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश ॥
आतां कैचा आह्मां दोष । तूं जगदीश कैवारी ॥५॥
आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन ॥
तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका ह्मणे ॥६॥

॥७२०२॥
आतां माझा नेणो परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव ॥
सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥
भांडवल गांठी तरि विश्वास । झालों तों झालों निश्चय दास ॥
न पाहे मागील ते वास । पुढती सोस सेवेचाची ॥२॥
आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व ॥
अकाळीं काळ अवघें पर्व । झाला भरवंसा कृपेला भाचा ॥३॥
वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत ॥
तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥४॥
करुनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा ॥
कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥५॥
बहु मतापासुनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा ॥
बैसल्या रुपाचा कळवळा । तुका ह्मणे डोळां लेईलों तें ॥६॥

॥७२०३॥
तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी ॥
अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीराय ॥१॥
भुक्तिमुक्ति जयाच्या कामारी । रिद्धिसिद्धि वोळगती द्वारीं ॥
सुदर्शन घरटीं करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥२॥
जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं ॥
जैसी विद्युल्लता झमकें मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥३॥
सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु ॥
पक्षिश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥४॥
मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहन गरुडध्वजा ॥
तुका ह्मणे स्वामी माझा । पावे भक्तिकाजा लवलाहीं ॥५॥

॥७२०४॥
हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें ॥
आपुले ऐसें ह्मणावें । करितों जीवें निंबलोण ॥१॥
बैसतां संतांचें पंगती । कळों आलें कमळापती ॥
आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ झाला ॥२॥
येती येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड ॥
कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥३॥
मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती ॥
म्हणोनि येतों काकुलति । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥४॥
सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन ॥
आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे ते ॥५॥
आपलें आपण न करुं हित । करुं हें प्रमाण संचित ॥
तरी मी नष्ट चि पतित । तुका ह्मणे मज संत हांसती ॥५॥

॥७२०५॥
बरवें झालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं ॥
फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥१॥
न वंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं ॥
झालों संताची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥२॥
जीवनीं राखिला जिव्हाळा । झालों मी मजसीं निराळा ॥
पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥३॥
जयाचें जया होईल ठावें । लाहो या साधियेला भावें ॥
ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥४॥
आस निरसली ये खेपे । अवघे पंथ झाले सोपे ॥
तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥५॥
अंकिले पणें आनंदरुप । आतळों नये पुण्यपाप ॥
सारुनि ठेविले संकल्प । तुका ह्मणे आपे आप एकाएकीं ॥६॥

॥७२०६॥
अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभक्ति ॥
प्रगटे त्दृदयींची मूर्ति । भावशुद्धि जाणोनियां ॥१॥
बीज आणि फळ हरीचें नाम । सकळ पुण्य सकळ धर्म ॥
सकळां कळाचें हें वर्म । निवारी श्रम सकळ ही ॥२॥
जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास ॥
सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥३॥
येती अंगा वसतीं लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें ॥
आपण चि येती तयाचे गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥४॥
न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म ॥
आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥५॥
वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य ॥
मुक्ता आत्मा परिपूर्ण । तुका ह्मणे सगुण भोळ्या आम्हां ॥६॥

॥७२०७॥
श्रीअनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा ॥
जगव्यापका जनार्दना । आनंदघना अविनाशा ॥१॥
सकळदेवा । कृपाळुवा जी केशवा ॥
महामहानुभवा । सदाशिवा सहजरुपा ॥
चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा ॥
सहस्त्रपादा सहस्त्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥३॥
कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती ॥
भवतारका धरित्या क्षिती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥४॥
अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना ॥
वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥५॥
तुका आला लोटांगणीं । मज ठाव द्यावा जी चरणीं ॥
हे चि करीतसें विनवणी । भवबंधनीं सोडवावें ॥५॥

॥७२०८॥
आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत ॥
पाहतां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥१॥
विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव ॥
न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संताचे ॥२॥
बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां ॥
होय आवडी सानें थोर । रुप सुंदर मनोहर ॥
भक्तिमिय लोभापर । करी आदर याचकपणे ॥५॥
तें वर्म आले आमच्या हाता ह्मणोनि शरण निघालों संतां ॥
तुका ह्मणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥६॥

॥७२०९॥
माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव ॥
करुं भक्ति तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥
धर्म करुं तरि नाहीं चित्ती । दान देऊं तरि नाहीं वित्त ॥
नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥
नेणे गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान ॥
नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंद्रियांसी ॥३॥
तीर्थ करुं तरिमन नये सवें । व्रत करुं तरि विधि नेणें स्वभावें ॥
देव जरि आहे ह्मणों मजसवें ॥ तरि अपपरावें न वचे ॥४॥
ह्मणोनि झालों शरणागत । तुझा ह्मणे ॥५॥

॥७२१०॥
तरि म्यां आळवावें कोणा । कोण हे पुरवील वासना ॥
तुजवांचूनि नारायना । लावीं स्तना कृपावंते ॥१॥
आपुला न विचारीं सिण । न धरीं अंगसंगें भिन्न ॥
अंगीकारिलें राखें दीन । देई जीवदान आवडीचें ॥२॥
माझिया मनासि हे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस ॥
अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥३॥
माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा ॥
एवढया आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥४॥
आळवीन करुणावचनीं । आणीक गोड न लए मनीं ॥
निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रुप ॥५॥
आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारुनी पाहें ॥
लागला झरा अखंड आहे । तुका ह्मणे साहे केलें अंतरीं ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP