मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६२४४ ते ६२६५

अभाविक, नास्तिक व तार्किक - ६२४४ ते ६२६५

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६२४४॥
मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥
वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकीया खळ ॥२॥
अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥३॥
तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥४॥

॥६२४५॥
जीव तोचि देव भोजन ते भक्ति । मरण ते चि मुक्ति पाषांडयाची ॥१॥
पिंडाच्या पोषकीं नागविलें जन । लटिकें पुराण केले वेद ॥२॥
मना आला तैसा करिती विचार । ह्मणती संसार नाहीं पुन्हा ॥३॥
तुका ह्मणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारिती ॥४॥

॥६२४६॥
नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भक्तीविण फोल ज्ञान सांगे ॥१॥
वाखाणी अद्वैत भक्तिभावेंविण । दु:ख पावे सीण श्रोता वक्ता ॥२॥
अहं ब्रह्म ह्मणोनि पाळीतसे पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥३॥
वेदबाह्य लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्यें ॥४॥
तुका ह्मणे खंडी देवभक्तपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥४॥

॥६२४७॥
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका ॥१॥
तार्कियाचें अंग आपणा सारिखें । माजिर्‍या सारिखें वाईचाळे ॥२॥
माता निंदी तया कोण तो आधार । भंगले खापर याचे नांवें ॥३॥
तुका म्हणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥४॥

॥६२४८॥
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥
तयासी बोलतां होईल विटाळ । नव जाये तो जळ स्नान करितां ॥२॥
विठ्ठल नामाचि नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥३॥
तुका म्हणे मज विठोबाची आण । जरी प्रतिवचन करीन त्यासी ॥४॥

॥६२४९॥
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसां ऐसे ॥१॥
वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां झालें पीक ॥२॥
अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥३॥
तुका म्हणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धी कष्टी सदा दु:खी ॥४॥

॥६२५०॥
अंतरींचें गोड । राहे आवडीचें कोड ॥१॥
संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनोभंगा ॥२॥
उचिताच्या कळा । नाहीं कळत सकळा ॥३॥
तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना ॥४॥

॥६२५१॥
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगडें ॥१॥
कपाळास लागली अगी । अभागि कां जीतसे ॥२॥
एके परि बरें वेडें । तार्किक कुडें जळो तें ॥३॥
तुका म्हणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥४॥

॥६२५२॥
शब्दज्ञानी येऊं नेदी दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्त ते ॥१॥
जळो ते जाणीव त्याचे दंभ । जळो त्याचें तोंड दुर्जनाचें ॥२॥
तुका ह्मणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरुं भीड ॥३॥

॥६२५३॥
कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥
गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरुप काय जाणे ॥२॥
बकापुढें सांगे भावार्थवचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥३॥
तुका म्हणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करुं नये ॥४॥

॥६२५४॥
सेकीं हें ना तैंसें झालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥१॥
स्वयें आपणचि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥२॥
सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं ज्ञानपणाची मस्ती ॥३॥
तुका ह्मणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥४॥

॥६२५५॥
अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुद्धि ॥१॥
काय ह्मणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥२॥
जो स्मरे रामराम । तयासी म्हणावें रिकामें ॥३॥
जो तीर्थव्रत करी । तयासी म्हणावे भिकारी ॥४॥
तुका म्हणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं ॥५॥

॥६२५६॥
पिंडपोषकाच्या जळो ज्ञानगोष्टी । झणी दृष्टिभेटी न हो त्याची ॥१॥
नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र झाला ॥२॥
पोहों नेणे कासे लावितो आणिका । म्हणावें त्या मुर्खा काय आतां ॥३॥
सिणलें तें गेलें सिणलियापासीं । झाली त्या दोघांसी एक गति ॥४॥
तुका म्हणे अहो देवा दिनानाथा । दरुषण आतां नको त्याचें ॥५॥

॥६२५७॥
लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या बिश्वास तो चि खरा ॥१॥
कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥२॥
जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥३॥
तुका म्हणे तैसें मतवादीयांचें जिणें । दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥४॥

॥६२५८॥
किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥
शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥२॥
नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥३॥
तुका म्हणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रंदिस ॥४॥

॥६२५९॥
म्हणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण ॥१॥
नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥२॥
शाळिग्रामासि म्हणे धोंडा । किडे पडोत त्याच्या तोंडा ॥३॥
भावी सद्गुरु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥३॥
हरिभक्तांच्या करी चेष्टा । त्याचे तोंडी पडे विष्टा ॥५॥
तुका म्हणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥६॥

॥६२६०॥
वांझेनें दाविलें गर्‍हवार लक्षण । चिरगुटें घालून बाथयाला ॥१॥
तेवीं शब्दज्ञानी करिती चावटी । ज्ञान पोटासाठीं विकूनियां ॥२॥
बोलाचिच कढी बोलाचाचि भात । जेवुनियां तृप्त कोण झाला ॥३॥
कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥४॥
तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं आठवण ॥५॥

॥६२६१॥
स्वप्नींचे धन चित्रींच्या ब्राम्हणा । जातकर्म जाणा वांटिती पैं ॥१॥
तैसें शब्दज्ञान करिती चावटीं । ज्ञान पोटासाठीं विकूनियां ॥२॥
बोलाचिच कढी बोलाचाचि भात । जेवुनियां तृप्त कोण झाला ॥३॥
कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर केवि लागे ॥४॥
तुका म्हणे जळो तैसें ज्ञानबंड । यमपुरीं दंड कठीण आहे ॥५॥

॥६२६२॥
म्हणे विठ्ठल ब्रम्ह नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥१॥
मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रम्हादिक ॥२॥
नाहीं विठ्ठल जया ठावा । तोही डोळां न पाहावा ॥३॥
तुका म्हणे नाहीं । त्याची भीड मज कांहीं ॥४॥

॥६२६३॥
नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥१॥
लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलिया हित फार होय ॥२॥
तुका म्हणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥३॥

॥६२६४॥
पिंड पोषकांनीं नागविलें जन । लटिके पुराण केले वेद ॥१॥
आपुले मताचें करुनी पाषांड । जनामध्यें भांड पोट भरी ॥२॥
मना वाटे तैसा करुनी आचार । म्हणती हा संसार नाहीं तुम्हा ॥३॥
तुका म्हणे पाठीं देती यमदंड । पापपुण्य लंड न विचारी ॥४॥

॥६२६५॥
मागें पुढें ब्रह्म दाटे । ह्मणती देव आहे कोठें ॥१॥
जयामध्यें येती जाती । तया कोणी नोळखती ॥२॥
मृगनाभीचा परिमळ परि तो हिंडे रानोमाळ ॥३॥
जळामध्यें मीन राहे । पाणी प्याया बाहेर जाये ॥४॥
ऐसी भ्रांती जाईल केव्हां । गुरुकृपा होईल तेव्हां ॥५॥
गुरुकृपा झाल्यावरी । ब्रह्मसृष्टी दिसे सारी ॥६॥
तुका ह्मणे ऐसी भ्रांती । देव असतां नाहीं ह्मणती ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP