मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६९६१ ते ६९७९

सोर्‍या अभंग - ६९६१ ते ६९७९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६९६१॥
वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥
त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलें मागें हांसत रागें सांवलें घालिती गळां ॥२॥
जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥३॥
वेगळ्या यति पाडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥४॥
सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करुं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ती नाचों भावा ॥५॥
ह्मणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु झालें सुख काम चुकलों या काजा ॥६॥

॥६९६२॥
आणिकां उपदेशूं नेणें वाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हासे जन ॥१॥
तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा ॥ पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥२॥
बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणे मिसें ॥३॥
तुका ह्मणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥४॥

॥६९६३॥
टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आले ठाव ह्मणोनी देतें सिवी ॥१॥
आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥२॥
कोरडे ते बोल कांगे वेचितशी वांयां । वर्ते करुनी दावीं तुझ्या मुळींचिया ठाया ॥३॥
याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका ह्मणे तुह्मां गांठी सोडायाची खंती ॥४॥

॥६९६४॥
मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥
ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥२॥
न बोलतां करी चिंता न मारितां पळे । दादला सेज नावडे निज जगझोडीचे चाळे ॥३॥
देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका ह्मणे पतन सोयरीं ऐसीं झालीं एकें ॥४॥

॥६९६५॥
धन्य झाली भेटी । नाचूं वाळवंटी ॥१॥
सौरी झालें भलें केलें मज पांडुरंगें । संसार घोर सांडुन दूर नेलें आपुले संगें ॥२॥
एकाएकीं महा सुखीं निजलें एका सेजे । अवघा सखा दावी लोका नाहीं तुझें माझें ॥३॥
तुका ह्मणे नलगे येणें पुन्हा या संसारा । तीळां अंजुळी देऊनियां नामीं केला थारा ॥४॥

॥६९६६॥
चाल सख्या रामा आतां सुख होईल तुह्मां ॥१॥
जातीभ्रष्ट झाली सौरी हिंडे दारोदारीं । सावल उचलुन जगासि दावी डौर घेऊन वाजवित करीं ॥ चाल० ॥१॥
शेंवडा व्याही चिपडी विहीण दोघां प्रीत मोठी ॥ विहीण लाजून हळुच पाहे व्याही नाक चाटी ॥ चाल० ॥२॥
बाईल बाहेर ख्याली दादला तिचा भोळा । परपुरुष पाहोनियां खुणावित डोळां ॥ चाल० ॥३॥
ऐशी सौरी गमजा करी डौर छंदें नाचे । तुकारामा ध्यान पायीं अखंड नाम वाचे ॥ चाल० ॥४॥

॥६९६७॥
उंच नारी दीर्घ भारी दादले ठेंगणे पोरी । एकाएकीं हाता नये सोवलें केलें वरी ॥१॥
चाल धण्या भावा लिंग नासलें देवा ॥२॥
उंच माडी त्यावर ताडी पलंग घालगे झोडी । सारी रात घसके घेतां झाली तडातोडी ॥३॥
भाववेडा भक्तिचुडा डौर नाहीं जोडा । थाक तोडी डोळे मोडी दाढीचा केला बोडा ॥४॥
मन फुका घेती फुका जनाचा घेती थुंका । इतुकें जरी हाता ये तरी होय चैतन्य तुका ॥५॥

॥६९६८॥
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥
या साहेबाचें झालें देणें । वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥२॥
अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥३॥
तुका ह्मणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळींचिया ठाया ॥४॥

॥६९६९॥
सौरी सुर झालें दूर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं झालें सरती ॥१॥
चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥२॥
हिंडोनी चौर्‍याशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥३॥
लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सांवलें फिटोनि गेलें आतां कैंची उरी ॥४॥
झालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरवीन जीवीचें तें कोड ॥५॥
तुका ह्मणे रुका करी संसारतुटी । आतां तुह्मां आह्मां कैसी झाली जीवें साटी ॥६॥

॥६९७०॥
सम सपाट वेसनकाट नि:संग झालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥
गाऊं रघुरामा हेंचि उरलें आह्मां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहित ॥२॥
ठाव झाला रिता झांकूनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥३॥
सौरियांचा संग आह्मां दुरावलें जग । भिन्न झालें सुख भाव पालटला रंग ॥४॥
लाज भय झणी तजियेलीं दोन्ही । फिरविला वेष नव्हों कोणाचींच कोणी ॥५॥
तुका ह्मणे हा आह्मां वेष दिला जेणें । जना प्रचित सवें असों एकपणें ॥६॥

॥६९७१॥
नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों । निर्लज्ज निष्काम जना वेगळेचि ठेलों ॥१॥
चाल रघुरामा ने आपुल्या गांवा । तुजविण आह्मां कोण सोयरा सांगाती ॥२॥
जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे । साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥३॥
बहुतां पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका ह्मणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥४॥

॥६९७२॥
नीट पाट करुनी थाट । दावीतसे तोरा ॥ आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥१॥
ते सौरी नव्हे निकी । भक्तीविण फिकी ॥२॥
चांग भांग करुनी सोंग । दावी माळा मुदी ॥ रुक्याची आस धरुनी । हालविती फुदी ॥३॥
थोरे घरी करी फेरी । तेथें नाचें वरी ॥ जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥४॥
आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग ॥ तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥५॥

॥६९७३॥
चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥१॥
घर दार केलें । घरी नाहीं वरो ॥ सेजारणीं पापिणीचीं । पांच पोरें मरो ॥२॥
घरीं पांच पोरें । तीं मजहूनि आहेत थोरें ॥ पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥१॥
घर केलें दार केलें । दुकान केला मोटा ॥ पाटाची राणी । धांगडधिंगा तिचा मोठा ॥४॥
दुकान केला मोटा । पदरीं तर खोटा ॥ हिजडा ह्मणसी जोगे । तर सोहळा सहस्त्र भोगी ॥ तुका ह्मणे वेगीं । तर हरि ह्मणा जगीं ॥५॥

॥६९७४॥
तीन माचवी चार गाती त्यावर निजलें होत्यें ॥ त्यां०॥
रामनामीं मिळुन गेलें खाटलें पडलें रीतें ॥१॥
सौरी झालें बाई नाहीं त्याचें पाई ॥ ना० ॥२॥
होउनी वेडी घालीत फुगडी गेले राउळांत ॥गे०॥
मला पाहुन देव भ्याला नाहीं देउळांत ॥ सौरी झा० ॥३॥
होउनी वेडी फाडीत लुगडीं नाचें आळोआळी ॥ ना०॥
मागें पुढें रुंदावली झालें गणोबाची ॥ सौरी झा० ॥४॥
तुका ह्मणे सौरी झालें दादया मला भ्याला ॥दा०॥
संग नसतां पोरें झालीं काय सांगूं तुला । सौरी झालें बाई नाहीं०॥४॥

॥६९७५॥
जन्मा आलिया गेलिया परी । भक्ति नाहीं केली ॥
माझें ह्मणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥१॥
येथें कांही नाहीं । लव गुरुच्या पायीं ॥
चाल रांडे टाकी रुका । नको करुं बोल ॥
गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥२॥
खाऊनी जेउनी लेऊनी नेसुनी । ह्मणती आह्मी बर्‍या ॥
साधु संत घरा आल्या । होती पाठमोर्‍या ॥३॥
वाचोनी पढोनी झालें शाहणे । ह्मणती आह्मी संत ॥
परनारी देखोनी त्यांचें । चंचळ झालें चित्त ॥४॥
टिळा टोपी घालुनी माळा । ह्मणती आह्मी साधु ॥ दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावें भोंदु ॥५॥
कलियुगीं घरोघरीं । संत झाले फार ॥ वीतभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥६॥
संत ह्मणती केली निंदा । निंदा नव्हे भाई ॥ तुका असे अनन्यें भावें । शरण संता पायीं ॥७॥

॥६९७६॥
लय लक्ष जाण अलक्ष धरी गुरुचा पक्ष । तेणें जिणें उत्तमवाणें होसी धीटपणें साक्ष ॥१॥
चाल गुरु बहिणी सखिये साजणी ॥२॥
भावाबळें साहे मुळें खोउनी कासोटा । माझें तुझें सारुनी मागें लाग मुळींच्या वाटा ॥३॥
एक हाटीं भावापाठीं बैस माझ्या गोष्टीं । धीर माझा साहे तुझा जाणे भाव निष्टी ॥३॥
बोल सांडी उग्या तोंडीं टाक रुका आशा । नाहीं तरी होती परी झिंजा ओढी कैशा ॥४॥
ऐक माझें टाक तुझें नको पाठमोरी । तुका ह्मणे जाणा खूण ह्मणा रामकृष्णहरी ॥४॥

॥६९७७॥
वेणी फणी दांत सिणीं विचारिलें जनीं । घे आरिसा भांव सरिसा पाहे दांत विचकोनी ॥१॥
मोडी डोळे करी चाळे जना दावी लिले । काजळ सोंग करी चांग हात बडवी डोळे ॥२॥
चाल माझ्या भावा वेध लागो जिवा ॥३॥
पाहे सौरी नाचे फेरी सावलें करी वरी हाता रुका जेव्हां एका हरिखे अंतरीं ॥४॥
तुका ह्मणे होई जाणे सांडि लाज मान । तेव्हां जन करी मान सौरी बरी होणें ॥५॥

॥६९७८॥
सौरी जिणें धणी माने तरी श्लाघ्य दिसे । नाहीं तरी व्यर्थ परी दोहीं बाहीं हासें ॥१॥
स्मरा रामराम । तेव्हां फिटे भ्रम ॥२॥
टाका ओझें मी तुं माझे भार शिरीं ओझें । ठकसी गे निरयभागें संसारीच्या माजें ॥३॥
तुका ह्मणे सावधान धणी राखे रुजू । यमाघरीं दंड देतां कोण सोडी उजू ॥४॥

॥६९७९॥
अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधाचा घुमारा ॥ अवचिताभरला वारा । या मल्लारी देवाचा ॥१॥
शुद्धसत्वाचा कवडा मोठा । बोंधविरडें बांधला गांठा ॥ गळां वैराग्याचा पट्टा ॥ वाटा दावूं या भक्तीच्या ॥२॥
हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें ॥ ज्ञानभंडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥३॥
लक्ष चौर्‍याशीं घरें चारी । या जन्माची केली वारी ॥ प्रसन्न झाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥४॥
या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें ॥ गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP