शूद्र दैवतांचा उपहास - ६२८७ ते ६२८९
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६२८७॥
नव्हे जाखाई जोखाई । मायराणी मेसाबाई ॥१॥
बळिया माझा पंढरीराव । जो या देवांचाहे देव ॥२॥
रंडी चंडी शक्ति । मद्यमांसातें भक्षिती ॥३॥
बहिरव खंडेराव । रोटीसुटीसांटीं देव ॥४॥
गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥५॥
मुंज्या ह्मैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥६॥
वेताळें फेताळें । जळो त्यांचें काळें ॥७॥
तुका ह्मणे चित्तीं । धरा रखुमाईचा पती ॥८॥
॥६२८८॥
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥
फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
तुका ह्मणे अवघें फटकाळ हें जन । अनुभविये खूण जाणतील ॥३॥
॥६२८९॥
शिव शक्ति आणि सूर्य गणपती । एकच ह्मणती विष्णूसही ॥१॥
हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥२॥
अन्य देवतांसी देव ह्मणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥३॥
वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्यदेवतांस देवपण ॥४॥
आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥५॥
धन्य ते वैष्णव भजती केशव । सात्त्विक हे जीव मोक्षा योग्य ॥६॥
तुका ह्मणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हारे ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP