मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७१९० ते ७२००

नाटाचे अभंग - ७१९० ते ७२००

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७१९०॥
सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें ॥ दहन होती सकळ कर्मे । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥
ह्मणोनि नाहीं कांही चिंता । तूं चि आमुचा मातापिता ॥ बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोगां सर्वांठायीं ॥२॥
ऐसा हा कळला निर्धार । माझा तुज न पडे विसर ॥ अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळ ॥३॥
दु:ख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ति झाल्या कामारी दासी ॥ त्यांचें वर्म तूं आह्मांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥
जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष ॥ काय तें उणें आह्मां आनंदास । सेवूं ब्रम्हरस तुका म्हणे ॥५॥

॥७१९१॥
देवा तूं आमचा कृपाळ । भक्तिप्रतिपाळ दीनवत्सल ॥ माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां ॥ पुढती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥२॥
आह्मां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांहीं एक ॥ झाला इहलोकीं परलोक । आलें सकळैक वैकुंठ ॥३॥
न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती ॥ आनंदलहरीची गती । वर्णू कीर्ती तया सुखा ॥४॥
तुझिया नामाचीं भूषणें । तोंये मज लेवविलीं लेणें ॥ तुका ह्मणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आह्मां ॥५॥

॥७१९२॥
न पवे सन्निध वाटते चिंता । वरिया बहुतांची सत्ता ॥ नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बळिवंता सांपडलों ॥१॥
बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी ॥ उघडया नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाण जाणतां ॥२॥
तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां ॥ झाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥३॥
अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय ॥ दिवस गेलिया ठाकईल छाय । उरईल हाय रातिकाळीं ॥४॥
होईल संचिताची सत्ता । अंगा येईल पराधीनता ॥ ठाव तो न दिसे लपतां । बहुत चिंता प्रवर्तली ॥५॥
ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी ॥ तुका ह्मणे माझी बळबुधी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥६॥

॥७१९३॥
आतां धर्माधर्मी कांहीं उचित । माझें विचारावें हित ॥ तुज मी ठाउका पतित । शरणागत परि झालों ॥१॥
येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं ॥ पावलों पाय भलत्या परी । मग बाहेरी न घालावें ॥२॥
ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें ॥ आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीर्ति हे जगें वाणिजेते ॥३॥
घालोनियांझ माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥४॥
येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार ॥ देह हें नाशवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥५॥
केली आराणुक सकळां हातीं । धरावें धरिलें तें चित्तीं ॥ तुका ह्मणे सांगितलें संतीं । देई अंतीं ठाव मज देवा ॥६॥

॥७१९४॥
बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी ॥ महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होईजे ॥१॥
दिलीं इंद्रियें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन ॥ जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥२॥
तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे ॥ नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥३॥
ऐसिये पावविलो ठायीं । आतां मी काई होऊं उतराई ॥ येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आई पांडुरंगे ॥४॥
फेडियेला डोळियांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ ॥ लावूनि स्तनी केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥५॥
नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा ॥ आला आकारा आमुच्या चाडा । तुका ह्मणे भिडा भक्तीचिया ॥६॥

॥७१९५॥
अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं ॥ अपराधाची वोळिलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥१॥
किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मळिलें अंतर ॥ आदि वर्तमान भविष्याकार । गेला अंतपार ऐसें नाहीं ॥२॥
विविध कर्म चौर्‍यायशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा ॥ कर्मकठोर पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥३॥
जीवा नाहीं कुडीचें लाहातें । ये भिन्न पंच भूतें ॥ रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥४॥
पुत्र पन्ती सहोदर । मायबाप गोताचा पसर ॥ मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळी दूर होती खळाळीं ॥५॥
ह्मणोनि नासावें अज्ञान । इतुलें करीं कृपादान ॥ कृपाळु तूं जनार्दन । धरुनि चरण तुका विनवी ॥६॥

॥७१९६॥
ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी ॥ राम कृष्ण नामें वरी । हरी हरी दोष सकळ ॥१॥
जनार्दना जगजीवना । विराटस्वरुपा वामना ॥ महदादि मधुसूदना ॥ सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥३॥
मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा ॥ नटनाटयकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥४॥
गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्व जाणा ॥ करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥५॥
कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥६॥

॥७१९७॥
होतों तें चितीत मानसीं । नवस फळले नवसीं ॥ जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥
धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय ॥ कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥२॥
मज तों पडियेली होती भुली । चित्ताची अपसव्य चाली ॥ होती मृगजळें गोवी केली । दृष्टी उघडली बरें झालें ॥३॥
आतां हा सिद्धि पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव ॥ ऐसी तुह्मां भाकीतसे कींव । कृपाळूवा जगदानिया ॥४॥
कळों येते आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं ॥ केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥५॥
कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी ॥ प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥६॥

॥७१९८॥
तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा ॥
भवतारका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
काय जाणावें म्याम दीनें । तुझिये भक्तींची लक्षणें ॥
धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥२॥
न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसें ॥
चालवी आपल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥३॥
तुज समर्पिली काया । जीवेंभावें पंढरीराया ॥
सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥४॥
चतुर तरीं चतुरां राव । जाणता तरीं जीवांचा जीव ॥
न्यून तो कोण एक ठाव । आरुप भाव परि माझा ॥५॥
होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल ॥
आदरा ऐसें पाविजे मोल । तुका ह्मणे साच फोल तूं जाणसी ॥६॥

॥७१९९॥
कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसतसे फार ॥
अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥१॥
पाप बळिवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें ॥
मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥२॥
काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन ॥
कीं वृद्ध झाला नारायण । न चले पण आधील तो ॥३॥
आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी ॥
पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥४॥
नको चाळवूं अनंता । कासया होतोसी नेणता ॥
काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका ह्मणे आतां होई प्रगट ॥५॥

॥७२००॥
मत ते हांसतील संत । जीहीं देखिलेती मूर्तिमंत ॥
ह्मणोनी उद्वेगलें चित्त । आहा च भक्त ऐसा दिसें ॥१॥
ध्यानीं म्या वर्णावेती कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे ॥
तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आसे लागलोंसें ॥२॥
कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा ॥
आह्मां लेकरांसि पीडा । एक मागें जोडा दुसर्‍याचा ॥३॥
सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय ॥
तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥४॥
नये हा जरी कारणा । तरीं कां व्यालेती नारायणा ॥
वचन द्यावें जी वचना । मज अज्ञाना समजावीं ॥
बहुत दिवस केला बोभाट । पाहतां श्रमलों ते वाट ॥
तुका ह्मणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP