कावडे अभंग - ६९५५ ते ६९६०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६९५५॥
॥आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक ॥ ठेवूनी गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी ॥
हरिहरांचे पवाडे ॥१॥
माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ॥ पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥
जें या सीतळाहूनी सीतळ । पातळाहूनी जें पातळ ॥ प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥३॥
जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ॥ धराल ते धरा शंभूचे चरण ।
दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥
काळा घेऊं नेदी वाव । आला तो राखें घावडाव ॥ शुद्ध सत्वीं राखोने भाव । ह्मणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥५॥
पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन ॥ जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर ह्मणों तया ॥६॥
शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोटयाचा पसारा ॥ सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें अहो सांगतों ॥७॥
व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ॥ पुण्य़ तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥
संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ॥ पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥
तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चाखेडी । पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥
॥६९५६॥
आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र ॥ पव्हे घातली सर्वत्र ॥ पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥
यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ॥ पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि ह्मणा रे ॥२॥
नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें ॥ नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें ।
महदि महदा साक्षित्वें हरि ह्मणा रे ॥३॥
हे हरिनामाची आंबिली । जगा पोटभरी केली ॥ विश्रांति कल्पतरुची साउली । सकळां वर्णा सेवितां भली । ह्मणा हर हर महादेव ॥४॥
तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ॥ या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥
॥६९५७॥
आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥
नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥
नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥
नमो तया मातापित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥
नमो तया जाणे आणिकाचें सुखदु:ख । राखे तान भुक तया नमो ॥५॥
परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी ॥६॥
तुका ह्मणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥
॥६९५८॥
आहारे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥
थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । बाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥२॥
बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकार्यास नये दारा ॥३॥
विद्याबळें वाद करुनियां छळी । आणिकासी फळी मांडोनियां ॥४॥
गावींचिया देवा नाहीं दंडवता । ब्राह्मण अतीत घडेचिना ॥५॥
सदा सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवेना ॥६॥
खासेमध्यें धन पोटासी बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥७॥
तुका ह्मणे नटे दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥८॥
॥६९५९॥
आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ ॥ तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठतनु देवाचिया ॥१॥
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण ह्मणों नये लिंगा ॥ संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥
काठी म्हणों नये वितु । अन्न ह्मणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥
चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । येरू तो नव्हे पर्वतासमान ॥ शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥
गरुड नव्हे पाखरुं । ढोर नव्हे नंदिकेश्वरु ॥ झाड नव्हे कल्पतरु । कामधेनु गाय न ह्मणावी ॥५॥
कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह ॥ ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥
गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड ॥ परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥
सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु ॥ नाहीं नाहीं चर्मातु । कृष्णाजिन व्याघ्रांबर ॥८॥
मुक्ताफळें नव्हेती गारा । खडयाऐसा नव्हे हिरा ॥ जीव नव्हे सोइरा । वोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥
गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति ॥ तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥
कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी ॥ तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥
॥६९६०॥
आहा आहारे भाई । तयासी कल्याण चिंतीतों आशिर्वचन ॥ ऐका गा ए जनसंत तुह्मी ॥१॥
आलिया अतीता पांथिक देव यात्रा । देती भूतीं सर्वत्रा अन्नपान ॥२॥
चैत्र मासीं येतां प्रेमाची अंबिली । आवडी कृष्णावळी दान दे त्या ॥३॥
वस्त्र दान अश्व वृषभ आवडीनें । काया कष्टवून चित्तवित्तें ॥४॥
तुका ह्मणे करी हरिहरस्मरण । घोष हा गर्जोन हरीहर ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 09, 2019
TOP