मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७२११ ते ७२२०

नाटाचे अभंग - ७२११ ते ७२२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७२११॥
हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध ॥
आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्‍वर्गा ॥१॥
सांवळें रुप ल्यावें डोळां । सा चौ आठरांचा गोळा ॥
पदर लागो नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्त्र ॥२॥
भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान ॥
तरींच घेतल्याचा गुण । होईल जाण सत्य भाव ॥३॥
नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागो नये वारा ॥
बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥४॥
पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होईल परी ॥
होईल पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा ॥
होसिल मागें होतासी तैसा । तुका ह्मणे दशा भोगीं वैराग्य ॥६॥

॥७२१२॥
मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदु:ख जाणसी ॥
हें तों न घडे रे सायासी । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥
लक्ष चौर्‍याशी न चुके फेरा । गर्भवासी यातना थोरा ॥
येऊनि पडसी संदेहपुरा । वोळसा थोरा मायाजाळी ॥२॥
पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती ।
कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥३॥
नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती ॥
होईन देव चि ह्मणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥४॥
क्षण एक मन स्थिर करुनी । सावध होई डोळे उघडोनी ॥
पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥५॥

॥७२१३॥
दास्य करी दासांचें । उणे न साहे तयांचें ॥
वाढिलें ठायींचें । भाणें टाकोनियां धांवे ॥१॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर ॥
सर्वस्वें उदार । भक्तालागीं प्रकटे ॥२॥
हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचे भूषण ॥
नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥३॥
सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी ॥
सेवकाच्या शिरीं धरुनि चाले पादुका ॥४॥
राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा ॥
दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥
भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं ॥
तुका ह्मणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥५॥

॥७२१४॥
हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस ॥
होउनी राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥
धरुनि पाय त्यजिलें जन । न लगे मान मृतिकाधन ॥
कंठीं नामआमृताचें पान । न लगे आन ऐसें झालें ॥२॥
वाव तरी उदंडा च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी ॥
कामक्रोधा न सुटे मिठी । गिर्‍हे तरी वेठीं राबविती ॥३॥
बळी तरि नागवती काळा । लीन तरी सकळांच्या तळा ॥
उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥४॥
संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास ॥
रिद्धिसिद्धि देशवटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥५॥
जन्म मृत्यु स्वप्नासारिखें । आप त्यां न दिसे पारखें ॥
तुका ह्मणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमामृताची ॥६॥

॥७२१५॥
बहुत जाचलों संसारीं । वसें गर्भी मातेच्या उदरीं ॥
लक्ष चौर्‍याशी योनिद्वारीं । झालों भिकारी याचक ॥१॥
जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं ॥
प्रालब्ध क्रियमाण सांगती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥२॥
न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा ॥
नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाही जीवा खापरीं तडफडी ॥३॥
काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती ॥
खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांती तरी वेगळें ॥४॥
ऐसे दु:ख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपलें ओझें ॥
भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥५॥
आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना ॥
गुण न विचारी अव गुणा । तुका करुणा भाकीतसे ॥६॥

॥७२१६॥
जंव हे सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये ॥
तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जावें चुकों नको ॥१॥
जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला ॥
मनीं भाव धरुनि भला न वंचे त्याला चुकों नको ॥२॥
जोडोनि धन न घलीं माते । ब्रह्मवृंदें पूजन यती ॥
सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगा ती चुकों नको ॥३॥
दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हे विषयसंगीं ॥
काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥४॥
मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं ॥
पुढें संचित जाईल ग्वाही । तुका ह्मणे ते ही यमयाज्ञा ॥५॥

॥७२१७॥
ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत ॥
आह्मां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥१॥
उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन ॥
काय गा मिरवूनि भूषण । वायां थोरपण जनांमध्यें ॥२॥
अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान ॥
उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥२॥
शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना ॥
पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥४॥
आतां पुढें बोलणें तें काई । मज तारिसी तरी च सही ॥
वचन आपुलें सिद्धी नेई । तुका ह्मणे तई मज कळसी ॥५॥

॥७२१८॥
चांगलें नाम गोमटें रुप । निवती डोळे हरती ताप ॥
विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प अति सार ॥१॥
शस्त्र हें निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान ॥
कोठें योजेल दश दान । खंडी नारायण दु:ख चिंतनें ॥२॥
सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत ॥
हाणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥३॥
ह्मणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा ॥
तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥४॥
येणें मज भोगविल्या खाणी । नसतां छंद लाविला मनीं ॥
माजलों मी माझे भ्रमणीं । झाली वोडणी विटंबना ॥५॥
पावलों केलियाचा दंड । खाणी भोगविल्या उदंड ॥
आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥६॥

॥७२१९॥
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम ॥
दयाळु तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥
उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासि ॥
चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥२॥
जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा ॥
नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळाभुलवणा ॥३॥
गांढया तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत ॥
ओंगळ तरीं कुब्जेशी रत । भ्याड अनंत बहु पापा ॥४॥
खेळ तो येणें चि खेळावा । नट तो येणें चि अवगावा ॥
लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥५॥
उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच ॥
तुका ह्मणे बोलिलों साच । नाहीं अहाच पूजा केली ॥६॥

॥७२२०॥
काय आह्मी भक्ति करणें कैसी । काय एक वाहावें तुह्मांसी ॥
अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रुपीं गंधीं ॥१॥
कसें करुं इंद्रियां बंधन । पुण्यपापाचें खंडण ॥
काय व्रत करुं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥२॥
काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं ॥
कवणे ठायीं धरुनि भाव । काय तें वाव तुजविण ॥३॥
काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाव ठेवूं कैसा ॥
काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥४॥
तुझिया नामाचि सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ ॥
धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका ह्मणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP