सदाशिवावर अभंग - ७०५४ ते ७०५७
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७०५४॥
काय धर्म नीत । तुम्हां शिकवावें हित ॥१॥
अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रह्मांड सकळा ॥२॥
नाम महादेव । येथें निवडला भाव ॥३॥
तुका म्हणे वेळे । माझें तुम्हां कां न कळे ॥४॥
॥७०५५॥
भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥
ऐसा घरींचा मोळा । ठावा निकटां जवळां ॥२॥
हाक देतां दारीं । येती जवळी सामोरीं ॥३॥
तुका म्हणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥४॥
॥७०५६॥
देव देवाचा हा देव । देवातीत महादेव ॥१॥
किरीट कुंडलें रंडमाळा । अंगीं भस्माची मेखळा ॥२॥
काखे झोळी हातीं पत्र । भिक्षा मागे पार्वतीवर ॥३॥
राजा श्रियाळ चांगुणा । अतिथी आलासे निर्वाणा ॥४॥
भक्तां संकटीं निर्वाणी । तुका रुळे त्याचे चरणीं ॥५॥
॥७०५७॥
भाळलोचना विशाळा । नंदीवाहना दयाळा ॥१॥
भोळ्या पतीतपावना । दुष्टदैत्यनिर्दळणा ॥२॥
गौरीप्रीय सदाशिवा । विश्वव्यापका माधवा ॥३॥
भोळा शंभू चक्रवर्ती । ऐसा नाहीं त्रिजगती ॥४॥
तुका म्हणे पायीं ठेवा । हरी वासना पुरवा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 09, 2019
TOP