अभंग - ६४१५ ते ६४२५
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥६४१५॥
भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥१॥
तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥२॥
मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥४॥
॥६४१६॥
घालुनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती ॥१॥
बहु उताविळ मन । तुमचें व्हावें दरुषण ॥२॥
आलों बोळवित । तैसें याचि पंथे चित्त ॥३॥
तुका ह्मणे पेणी । येतां जातां दिवस गणीं ॥४॥
॥६४१७॥
आजि दिवस धन्य । तुमचें झालें दरुषण ॥१॥
सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥२॥
आइकतों मन । करुनी सादर श्रवण ॥३॥
तुका ह्मणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥४॥
॥६४१८॥
बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥१॥
ऐसें सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥२॥
पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥३॥
तुका ह्मणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥४॥
॥६४१९॥
काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥१॥
आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥२॥
फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥३॥
तुका ह्मणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा ॥४॥
॥६४२०॥
आजीचिया लाभें ब्रम्हांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ॥१॥
आर्तभूत माझा जीव जयांसाठीं । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ॥२॥
वाटुली पाहतां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥३॥
माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होईल समाचार सांगती तो ॥४॥
तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळले संकल्प संत आले ॥५॥
॥६४२१॥
आजी बरवें झालें । माझें माहेर भेटलें ॥१॥
डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥२॥
धन्य झालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥३॥
इच्छेचें पावलों । तुका ह्मणे धन्य झालों ॥४॥
॥६४२२॥
वोरसोनी येती । वत्सें धेनुवेच्या चित्तीं ॥१॥
माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥२॥
स्नेहें भूक तान । विसरती झाले सीण ॥३॥
तुका ह्मणे कवतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें ॥४॥
॥६४२३॥
आलें तें आधीं खाईन भातुकें । मग कवतुकें गाईन ओंव्या ॥१॥
सांगितला आधीं आइकों निरोप । होइल माझा बाप पुसे तो तें ॥२॥
तुका ह्मणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरींहून आजी ॥३॥
॥६४२४॥
आमूप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥
काय सांगों सुख झालें आलिंगनें । निवाळी दर्शनें कांति माझी ॥२॥
तुका ह्मणे यांच्या उपकारासाटीं । नाहीं माझे गांठीं कांहीं एक ॥३॥
॥६४२५॥
पवित्र व्हावया घालीन लोळणीं । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥१॥
जोडोनी हस्तक करीन विनवणी । घेईन पायवणी धावोनियां ॥२॥
तुका ह्मणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP