मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६३२५ ते ६३४८

अभंग - ६३२५ ते ६३४८

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


वरील अभंग व त्यांबरोबर दिलेला नारळ टाकून ब्राह्मण आळंदीस गेला त्यावर स्वामींनीं ज्ञानेश्वरास पत्र लिहिले ते अभंग.

॥६३२५॥
नको कांहीं पडों ग्रंथाचिये भरीं । शीघ्र व्रत करीं हेंचि एक ॥१॥
देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां ॥२॥
साधनें घालिती काळाचिये मुखीं । गर्भवास सेखीं न चुकती ॥३॥
उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा अवश्यक ॥४॥
रोकडी पातली अंगसंगे जरा । आतां उजगरा कोठवरी ॥५॥
तुका ह्मणे घालीं नामासाठीं उडी । पांडुरंग थडी पाववील ॥६॥

॥६३२६॥
नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनियां मन । निर्विषय कारण असे तेथें ॥२॥
उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मा शेवटीं असे फळ ॥३॥
आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दु:ख जाण ॥४॥
स्वप्नींच्या घायें विवळसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥५॥
तुका ह्मणे फळ आहे मुळापाशीं । शरण देवासी जाय वेगीं ॥६॥

॥६३२७॥
त्यजिलें भेटवी आणुनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥
आळवावें देवा भाकुनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥२॥
नाहीं जावें दुरुनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥३॥
तुका ह्मणे हा आहे कृपासिंधु । तोडी भवबंधुं तात्काळिक ॥४॥

॥६३२८॥
गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥१॥
मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥२॥
आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥३॥
तुका ह्मणे आळी । जेवी नुरे चि वेगळी ॥४॥

॥६३२९॥
ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥१॥
ह्मणऊनि अवघे सारा । पांडुरंगा दृढ धरा ॥२॥
सम खुण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥३॥
तुका ह्मणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥४॥

॥६३३०॥
पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥१॥
पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां झालें ॥२॥
तप तीर्थाटणें तेव्हां कार्यसिद्धी । स्थिर राहे बुद्धि हरिच्या नामीं ॥३॥
यागयाज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥५॥
तुका ह्मणे नको काबाडाचे भरीं । पडों धरीं हें चि एक ॥५॥

॥६३३१॥
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥
त्याचें दिलें त्यासी । पावे फळ आपणासी ॥२॥
आहे हा आधार । नाम त्याचें विश्वंभर ॥३॥
नाहीं रिता ठाव । तुका ह्मणे पसरीं भाव ॥४॥

॥६३३२॥
संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रह्मांडाचें ॥१॥
करोनि पारणें आंववे संसारा । उशीर उशीरा लावूं नको ॥२॥
घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥३॥
झुगारुनि दुरी लपविलें काखे । तुका ह्मणे वाखे कौतुकाचे ॥४॥

॥६३३३॥
माझ्या बापें मज दिधलें भातुकें । ह्मणोनि कौतुकें क्रीडा करीं ॥१॥
केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें ज्ञान आलें त्याचें ॥२॥
घेऊनि विभाग जावें लवलाह्या । आलेति या ठाया आपुलिया ॥३॥
तुका ह्मणे ज्ञानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥४॥

॥६३३४॥
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां ॥१॥
मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथें तुम्हां वोळंगणे । इतर तुळणे काय पुरे ॥३॥
तुका ह्मणे नेणें युक्तीची ते खोली । ह्मणोनि ठेविली पायीं डोयी ॥४॥

॥६३३५॥
बोलिली लेकुरें । वेडी वाकुडीं उत्तरें ॥१॥
करा क्षमा अपराध । महाराज तुह्मी सिद्ध ॥२॥
नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥३॥
तुका ह्मणे ज्ञानेश्वरां राखा पायांपे किंकरा ॥४॥

॥६३३६॥
काय तुह्मी जाणां । करु अव्हेर नारायणा ॥१॥
तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥२॥
कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥३॥
आणिलें अनुभवा । जनाच्या हें ज्ञानदेवा ॥४॥
आणीक कोणी भिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति ॥५॥
तुका ह्मणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥६॥

॥६३३७॥
अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥१॥
काय त्याचा वेळ जाईल माडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥२॥
मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळींचा धोंडा उभा ठाके ॥३॥
तुका ह्मणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥४॥

॥६३३८॥
तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरीं घातले ते ॥१॥
राज्यपदा आड सुखाची संपत्तिअ । उलंघूनि जाती निरयगांवा ॥२॥
इंद्रियें दमिलीं इच्छा जीती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥३॥
तुका ह्मणे हरिभजनावांचुन । करिती तो सीण पाहों नये ॥४॥

॥६३३९॥
हरिकथेवांचुन इच्छिती स्वहित । हरिजन चित्त न घला तेथें ॥१॥
जाईल भंगोन आपुला विश्वास । होईल या नाम कारणांचा ॥२॥
ज्याचिया बैसावें भोजनपंगती । त्याचिया संगती तैसें खावें ॥३॥
तुका ह्मणे काय झालेती जाणते । देवा ही परते थोर तुह्मी ॥४॥

॥६३४०॥
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥
घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जेना ॥२॥
खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥३॥
तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥४॥

॥६३४१॥
जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥१॥
करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥२॥
जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥३॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥४॥

॥६३४२॥
बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वाटुं मन त्यांच्या संगें ॥१॥
करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥२॥
सुखाची समाधि हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥३॥
तुका म्हणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥४॥

॥६३४३॥
हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥१॥
त्याची वाणी अमंगळ । कान उंचराचें बीळ ॥२॥
सांडूनि हा रस । करिती आणीक सायास ॥३॥
तुका म्हणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं ॥४॥

॥६३४४॥
प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥१॥
ऊर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्था ॥।२॥
शिवाचें जीवन । जाळी महादोष कीर्तन ॥३॥
तुका म्हणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥४॥

॥६३४५॥
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥
ऐसें करी पांडुरंगा । प्रेमवोसंडेसें अंगा ॥२॥
सर्व काळ नये । वाचे विट आड भये ॥३॥
तुका वैष्णवा संगती । हेंचि भजन पगती ॥४॥

॥६३४६॥
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥
आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारिली आस ॥२॥
भक्तीच्या उत्कर्षे । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥३॥
तुका म्हणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥४॥

॥६३४७॥
करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥
कोणाकारणें हें झालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥
तुका म्हणे मी या अभिमाना वेगळा । घालूनी गोपाळा भार असें ॥३॥

॥६३४८॥
तुह्मीं येथें पाठविला धरणेकरी । त्याची झाली परी आइका ते ॥१॥
आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । झाला समाचार आइका तो ॥२॥
देवाचे उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करुई गेला ॥३॥
तुका म्हणे सेवा समर्पूनी पायीं । झालों उतराई ठावे असा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP