मनास बोध - ७०६७ ते ७०७५
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७०६७॥
तुजवांचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना ॥
जीवभावना पूरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥१॥
नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचूनि एका ॥
मनीं मानसीं चिंतितां रुपनाम । पळे पाप ताप भयें नासे काम ॥२॥
हरी नाम हें साच तूझें पुराणीं । हरी हातिचें काळगर्भादियोनी ॥
करुं मुखवाणी कैसी देशधडी । तुजवांचुनी वाणितां व्यर्थ गोडी ॥३॥
भवभंजना व्यापका लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ॥
असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणिक व्यर्थ कायी ॥४॥
दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी ॥
तुका राहिला पायीं तो राख देवा । असें मागतसे तुझी चरणसेवा ॥५॥
॥७०६८॥
उभीं भींवरेच्या तिरीं राहिलाहे । असे सन्मुख दक्षिणे मूख वाहे ॥
महापातकांसी पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नाम वीर ॥१॥
गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं सर्वमुख ॥
लागलें मुनिवरां हें गोड चित्तीं । देहभावना तुटलियासी खंती ॥२॥
ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा द्यावयासी उदार ॥३॥
जया वोळगती सिद्धि सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाई ॥३॥
असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हें धरुनी भक्तिलोभा ॥
पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली हे सिद्धसाधकांची ॥४॥
करावे गुहा धरा पथ आधीं । जया पार नाहीं सुखा तेंच साधीं ॥
ह्मणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥५॥
॥७०६९॥
धना गुतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं ॥
मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परि तें तृप्त नाहीं ॥१॥
न दिसे शुद्ध पाहतां निजमति । पुढें पडिलों इंद्रिया थोर घातीं ॥
जिवा नास त्या संगती दंड वेडी । हरी शीघ्र या दृष्ट संगासि तोडीं ॥२॥
असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दृष्टमाया ममता ॥
क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवे कोण हरी ॥३॥
निज देखतां निज हे दूरी जाये । निद्रा आळस दंभ या भीत आहें ॥
तयां वस्ति देहीं नको देऊं देवा । तुजवांचुनी आणिक नास्ति हेवा ॥४॥
करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी ॥
नको मोकलूं दीणबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥५॥
॥७०७०॥
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुर्बिलीं साजिरीं मोरपीसें ॥
हरें त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादवा योगिराया ॥१॥
जया कामिनी लुब्धल्या सहस्त्रसोळा । सकुमार ह्या गोपिका दिव्य बाळा ॥
शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळ कंठीं ॥२॥
असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही ॥
महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रुप हें पापनासी ॥३॥
कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली दैवाची ॥
जया चिंतितां अग्नि हा शांति नीवें । धरा मानसीं आपला देहभाव ॥४॥
सुनी देखतां मूख हें चित्त ध्याय । देह मांडला भाव हा बापमाय ॥
तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रुप कैसे ॥५॥
॥७०७१॥
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अग्नि हा काष्ठ तेवीं ॥
घटीं बिंबलें बिंब हें ठायिंठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥१॥
तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भक्षितां पालटे तेंचि देहीं ॥
तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥२॥
फळ कर्दळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये ॥
धीर नाहीं ते वाउगें धीग झालें । फळ पुष्प ना यत्न ते व्यर्थ गेले ॥३॥
असें नाम हें दर्पणें सिद्ध केलें । असें बिंब तें या मळा आड ठेलें ।
कसें शुद्ध नाहीं दिसे माजि रुप । नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥४॥
करा वर्म ठावें नका सोंग वांयां । तुका वीनवीतो पडों काय पायां ।
तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहे ॥५॥
॥७०७२॥
मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी ॥
असे हीत माझें तुज शरण आलों । देहदु:ख हें भोगितां फार भ्यालों ॥
भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहेतीस तीन्ही ॥२॥
जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती तेचि सोये ।
करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका वीनवीतो मस्तक ठेवूनि पायीं ॥३॥
॥७०७३॥
मायबाप जोहार जी जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥
मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥२॥
फांकूं नका रुजू झालियावांचून । सांगा जी कोण धरिती धण्या ॥३॥
आजी मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥४॥
तुका ह्मणे कांहीं न चले ते बोली । अखरनें सालीं झाडा घेती ॥५॥
॥७०७४॥
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा वास ॥१॥
जों यावें तों हातचि रिता नाहीं । कधीं तरी कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥
तुका म्हणे उद्यां लावीन मनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥३॥
॥७०७५॥
देती घेती परज गेली । वर खालीं करुनियां ॥१॥
धांवणियाचे न पडे हातीं । खादलीं राती काळोखी ॥२॥
अवघियांचें अवघें नेलें । कांहीं ठेविलें नाहीं मागें ॥३॥
सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरी होती ॥४॥
घराकडे पाहूं नयेसेंचि झालें । अमानत केलें दिवाणांत ॥५॥
आतां तुका कोणा न लगेचि हातीं । झाली ते निश्चिती बोलों नये ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 09, 2019
TOP