मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७०५८ ते ७०६४

स्तुती अभंग - ७०५८ ते ७०६४

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


दत्तात्रय स्तुति.

॥७०५८॥
तीन शिरें सहा हात । तया माझें दंडवत ॥१॥
काखीं झोळी पुढें श्वान । नित्य जान्हवीचें स्नान ॥२॥
माथां शोभे जटाभार । अंगीं विभुती सुंदर ॥३॥
शंख चक्र गदा हातीं । पायीं खडावा गर्जती ॥४॥
तुका ह्मणे दिगांबर । तया माझा नमस्कार ॥५॥
==

हनुमंत स्तुति.

॥७०५९॥
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥२॥
शूर आणि धीर । स्वामीकाजीं तूं सादर ॥३॥
तुका ह्मणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥४॥

॥७०६०॥
केली सीताशुद्धि । मूळ रामायणा आधीं ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ मोहन ॥२॥
जाऊनी पाताळा । केली देवीची अवकळा ॥३॥
राम लक्षुमण । नेले आणिले चोरुन ॥४॥
जोडुनियां कर । उभा सन्मुख समोर ॥५॥
तुका ह्मणे जपें । वायुसुता जाती पापें ॥६॥

॥७०६१॥
काम घातला बांधोडी । काळ केला देशधडी ॥१॥
तया माझें दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥२॥
शरीर वज्राऐसें । कवळी ब्रम्हांड जो पुच्छें ॥३॥
रामाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥४॥

॥७०६२॥
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥२॥
करोनी उड्डाण । केलें लंकेचें शोधन ॥३॥
जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥४॥

॥७०६३॥
आणुनियां गिरीद्रोण । वांचविला लक्षुमण ॥१॥
नमूं तुज बलभीमा । कळे प्रतापाची सीमा ॥२॥
केलें सिंधुचें लंघन । केलें सीतेचें शोधन ॥३॥
एकनिष्ट निरंतर । रामकार्यासी तत्पर ॥४॥
तुका म्हणे नाम । वसे हृदयीं आराम ॥५॥

॥७०६४॥
कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां ॥ आलें वैकुंठ जवळां । पंढरीये सन्निध ॥१॥
पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरी ॥ अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥२॥
चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार ॥ गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥३॥
मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुल्लतीं ॥ शूर उठावती । एका एक आगळे ॥४॥
नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आलें वैष्णवदळ । कळिकाळ कांपती ॥५॥
आस करिती ब्रम्हादिक । देखुनि वाळवंटींचें सुख ॥ धन्य धन्य मृत्युलोक । म्हणती भाग्याचे कैसे ॥६॥
मरण मुक्ति वाराणसी । पितृऋण गया कासी ॥ उधार नाहीं पंढरीसी । पायापाशीं विठोबाच्या ॥७॥
तुका म्हणे आतां । काय करणें आम्हां चिंता ॥ सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP