मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
६३५४ ते ६३९५

अभंग - ६३५४ ते ६३९५

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥६३५४॥
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरीनाथ बोलावितो ॥१॥
मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥२॥
निरांजलें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळें ॥३॥
तुका ह्मणे कई भाग्याची उजरी । होईल पंढरी देखावया ॥४॥

॥६३५५॥
कां कोणी न ह्मणे पंढरीची आई । बोलविते पाही चाल नेटें ॥१॥
तेव्हां माझ्या मना होय समाधान । जाय सर्व सीण जन्मांतर ॥२॥
तुका ह्मणे माझी होईल माउली । वोरसून घाली प्रेमपान्हा ॥३॥

॥६३५६॥
कां माझा विसर पडिला मायबापा । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥
कैसा कंठुनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥२॥
नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥३॥
तुका म्हणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥४॥

॥६३५७॥
कांहीं माझे कळों आले गुणदोष । म्हणऊनि उदास धरिलें ऐसें ॥१॥
नाहीं तरी येथें न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरीं ॥२॥
कळावें तें मना आपुलिया सवें । ठायीचें हें घ्यावें विचारुनि ॥३॥
तुका म्हणे मज अव्हेरिलें देवें । माझिया कर्त्तव्यें बुद्धीचिया ॥४॥

॥६३५८॥
जायाचें शरीर जाईल क्षणांत । कां हा गोपीनाथ पावेचि ना ॥१॥
तुम्ही संत सारे कृपेचे सागर । माझा निरोप फार सांगा देवा ॥२॥
अनाथ अज्ञान कोणी नाहीं त्याला । पायांपे विठ्ठला ठेवी मज ॥३॥
तुका म्हणे जाणे ऐसी करा निरवण । मग तो रक्षण करील माझें ॥४॥

॥६३५९॥
नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥१॥
कोपोनियां तरी देईल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥२॥
नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥३॥
तुका म्हणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥३॥

॥६३६०॥
आतां पाहों पंथ माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥१॥
काय करुं आतां न गमेसें झालें । बहुत सोसिलें बहु दिस ॥२॥
घर लागे पाठी चित्ता उभे वार । आपुलें तें झुरे पाहावया ॥३॥
तुका म्हणे जीव गेला तरी जाव । धरिला तो देव भाव सिद्धी ॥४॥

॥६३६१॥
विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥२॥
जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥३॥
जैसे तैसे माझे बोल अंगिकारीं । बोबडया उत्तरीं गौरवितों ॥४॥
तुका म्हणे विटेवरि जीं पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥५॥

॥६३६२॥
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥
पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्मे महादोष ॥२॥
सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । ऋद्धि सिद्धि ठायीं मुक्ति चारी ॥३॥
इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥४॥
तुका म्हणे जड जीव शक्तिहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥५॥

॥६३६३॥
काय झालें नेणों माझिया कपाळा । न देखिजे डोळां मूळ येतां ॥१॥
बहु दिस पाहें वचनाची वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥२॥
नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठुर न पाहिजे ॥३॥
पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरुरसा ॥४॥
तुका म्हणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥५॥

॥६३६४॥
एवढा संकोच तरि कां व्यालासी । आम्ही कोणांपाशीं तोंड वासूं ॥१॥
कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुम्हीं देवा ॥२॥
कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जिवलग ॥३॥
कोण जाणे माझे जीवींचे सांकडें । उगवील कोडें संकटाचें ॥४॥
तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती । काय माझे चित्तीं पांडुरंगा ॥५॥

॥६३६५॥
देई डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥
तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्निशीं नाम घेतां थोडें ॥२॥
फार थोडें कांहीं करुनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥३॥
आहे माझी ते चि सारीन शिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥४॥
तुका म्हणे आम्हां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥५॥

॥६३६६॥
सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रुप उरी नुरे ॥१॥
इंद्रियांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान ॥२॥
माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥३॥
आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटें आपणासी ॥४॥
तुका ह्मणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥५॥

॥६३६७॥
धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥१॥
तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥२॥
प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥३॥
जातें तळा येतों मागुताला वरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥४॥
तुका ह्मणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥५॥

॥६३६८॥
कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पापा यांचें ॥१॥
पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥२॥
कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पावती ॥३॥
कां या इंद्रियांचि न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥४॥
तुका ह्मणे कई जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥५॥

॥६३६९॥
काय पोरें झाली फार । किंवा न साहे करकर ॥१॥
ह्मणऊनि केली सांडी । घांस घेऊं न व्हां तोंडीं ॥२॥
करुं कलागती । तुज भांडणें भोंवतीं ॥३॥
तुका ह्मणे टांचें । घरीं झालें सेवरोचे ॥४॥

॥६३७०॥
कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥
तरी हा पडिला विसर । माझा तुह्मां झाला भार ॥२॥
आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां माठीं ॥३॥
तुका ह्मणे घरीं । बहु बैसले रिणकरी ॥४॥

॥६३७१॥
निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥
परि हे नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥२॥
सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥३॥
न लगे निरोपासी मोल । तुका ह्मणे वेचे बोल ॥४॥

॥६३७२॥
जोडिच्या हव्यासें । लागे धनाचें चि पिसें ॥१॥
मग आणिक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥२॥
पाहे रुक्याकदे । मग अवघें ओस पडे ॥३॥
तुका म्हणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥४॥

॥६३७३॥
मविलें मविती । नेणों राशी पडिल्या किती ॥१॥
परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥२॥
अवघ्या अवघा काळ वाटा पाहाती सकळ ॥३॥
तुका म्हने नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥४॥

॥६३७४॥
न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥१॥
ऐसे झाले बहुत दिस । झालीं युगें अठ्ठाविस ॥२॥
नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥३॥
तुका म्हणे किती । मापें केलीं देती घेती ॥४॥

॥६३७५॥
जोडी कोणासाठीं । एवढीं करितोसी आटी ॥१॥
जरी हें आम्हां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥२॥
करुनि जतन । कोण देसील हें धन ॥३॥
आमचे तळमळे । तुझें होईल वाटोळें ॥४॥
घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥५॥
तुका म्हणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥६॥

॥६३७६॥
करुनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥
जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥२॥
येथें न करीं काम । मुखें नेघें तुझें नाम ॥३॥
तुका म्हणे कुळ । तुझें बुडवीन समूळ ॥४॥

॥६३७७॥
समर्थाचे पोटीं । आम्हीं जन्मलों करंटीं ॥१॥
ऐसी झाली जगीं कीर्ति । तुझ्या मानाचे फजिती ॥२॥
येथें नाहीं खाया । न ये कोणी मूळ न्याया ॥३॥
तुका म्हणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥४॥

॥६३७८॥
पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां ॥१॥
मज सांगोनियां धाडीं । वाट पाहातों बराडी ॥२॥
कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥३॥
तुका म्हणे चिंत्ता । बहु वाटतसे आतां ॥४॥

॥६३७९॥
कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी स्थिर ॥१॥
जें या मनासी आवरुं । आंत पोटीं वाव धरुं ॥२॥
कैंची शुद्ध मति । भांडवल ऐसें हातीं ॥३॥
तुका ह्मणे अंगा । कोण दशा आली सांगा ॥४॥

॥६३८०॥
समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥
आता भावें करुनि साचा । पायां पडलों विठोबाच्या ॥२॥
न कळे उचित । करुं समाधान चित्त ॥३॥
तुका ह्मणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥४॥

॥६३८१॥
येती वारकरी । वाट पहातों तोंवरी ॥१॥
घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥२॥
पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें॥३॥
तुका ह्मणे येती । जाइन सामोरा पुढती ॥४॥

॥६३८२॥
रुळे महाद्वारीं । पायां खालील पायरी ॥१॥
तैसें माझें दंडवत । निरोप सांगतील संत ॥२॥
पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥३॥
तुका ह्मणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ ॥४॥

॥६३८३॥
माहेरासी जैसा धाडीना सुनेला । मनीं जावयाला आवांकी ते ॥१॥
माझा हेत असे जावें पंढरीसी । परीया ज्वरासी काय करुं ॥२॥
सासू ती सासरा चांडाळ माहेरा । धाडीना दातारा काय करुं ॥३॥
तुका ह्मणे विठो गरुड आहे द्वारीं । न्या मज पंढरी कृपावंता ॥४॥

॥६३८४॥
तुह्मीं संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥
काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥२॥
भाका बहुतां रीती । माझी कीव काकुलती ॥३॥
न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी ॥४॥

॥६३८५॥
होईल कृपादान । तरी मी येईन धांवोन ॥१॥
होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटी ॥२॥
रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥३॥
तुका ह्मणे ताप । हरती देखोनियां बाप ॥४॥

॥६३८६॥
परिसोनि उत्तर । जाव देईजे सत्वर ॥१॥
जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥२॥
नाणीं कांहीं मना । करुनि पापाचा उगाणा ॥३॥
तुका ह्मणे नाहीं । काय शक्ति तुझे पायीं ॥४॥

॥६३८७॥
ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥
माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥२॥
बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥३॥
तुका ह्मणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥४॥

॥६३८८॥
किती करुं शोक । पुढें वाढे दु:खे दु:ख ॥१॥
आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥२॥
पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥३॥
तुका ह्मणे बळ । माझी राहिली तळमळ ॥४॥

॥६३८९॥
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥
जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥२॥
घरीं लागे कळह । नाहीं जात तो शीतळ ॥३॥
तुका ह्मणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥४॥

॥६३९०॥
आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥
ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसीं माझीं बाळें ॥२॥
दुरी दूरांतर । तरी घेसी समाचार ॥३॥
नेसी कधीं तरी । तुका ह्मणे लाज हरी ॥४॥

॥६३९१॥
आतां हे सेवटीं । माझी आईकावी गोष्टी ॥१॥
आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥२॥
आतां करकर । पुढें न करीं उत्तर ॥३॥
तुका ह्मणे ठसा । तुझा आहे राखें तैसा ॥४॥

॥६३९२॥
बोलिलों तें आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥
क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥२॥
स्तुती निंदा केली । लागे पाहिजे साहिली ॥३॥
तुका ह्मणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥४॥

॥६३९३॥
माझें जडभारी पंढरीचे पारीं । लज्जा नानापरी निवारावी ॥१॥
लिहिल्या पत्रका धाडूं कोणा हातीं । सांगावी विनंती माझी कोणी ॥२॥
घोडि याचेखुरें उधळिली माती । यावें रातोराती नारयणा ॥३॥
तुका विष्णुदास संतांचें पोसणें । वाग्पुष्प तेणें पाठविलें ॥४॥

॥६३९४॥
पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षेम सांगा ॥१॥
अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवे नको दीन गांजों देऊं ॥२॥
ग्रासिलें भुजंगे सर्पे महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां ॥३॥
कामक्रोध सुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवर्ती मायेचिये ॥४॥
मृगजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥५॥
तुका म्हणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची ॥६॥

॥६३९५॥
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हेंचि कृपादान तुमचें मज ॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा । कींव माझी सगा काकुलती ॥२॥
अनाथ अपराधी पतिता आगळा । परि पायां वेगळा नका करुं ॥३॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षिना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP