अभंग - ६३१८ ते ६३२४
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
अलकापुरीं (आळंदीं) त ब्राह्मण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास ज्ञानोबांनीं स्वप्नीं येऊन सांगितलें कीं देहूस तुकोबापाशीं जाणें ब्राह्मण स्वामीपें आला त्यास करुन दिलेले अभंग.
॥६३१८॥
श्रीपंढरीशा पतितपावना । एक विज्ञापना पायांपाशीं ॥१॥
अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं ब्रीदावळी ॥२॥
न सांगतां कळे अंतरींचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥३॥
आळिकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देउनियां ॥४॥
तुका ह्मणे तूंचि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देई धीर मना ॥५॥
॥६३१९॥
अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाईच्या वरा पांडुरंगा ॥१॥
अगा सर्वोत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥२॥
अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसता धरितया ॥३॥
अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणावचना चित्त द्यावें ॥४॥
तुका ह्मणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥५॥
॥६३२०॥
नव्हे दास खरा । परि झाला हा डांगोरा ॥१॥
यासी काय करुं आतां । तूं हें सकळ जाणता ॥२॥
नाहीं पुण्य गांठीं । जें हें वेचूं कोणासाठीं ॥३॥
तुका ह्मणे कां उपाधि । वाढविली कृपानिधि ॥४॥
॥६३२१॥
तुजविण सता । नाहीं वाचा वदविता ॥१॥
ऐसी आह्मी जाणों दास । ह्मणोनी झालों उदास ॥२॥
तुह्मी दिला धीर । तेणें मन झालें स्थिर ॥३॥
तुका ह्मणे आड । केलों मी हें तुझें कोड ॥४॥
॥६३२२॥
काय मी जाणता । तुह्माहूनी अनंता ॥१॥
जों हा करुं अतिशय । कां तुम्हां दया नये ॥२॥
काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥३॥
तुका ह्मणे वाणी । माझी वदे तुह्मांहूनी ॥४॥
॥६३२३॥
काय ज्ञानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥१॥
ऐकोनियां लिखित । म्हूण जाणवली हे मात ॥२॥
तरी जाणे धणी । वदे सेवकाची वाणी ॥३॥
तुका ह्मणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥४॥
॥६३२४॥
ठेवुनियां डोई । पायीं झालों उतराई ॥१॥
कारण तें तुह्मी जाणां । मी तराळ नारायणा ॥२॥
प्रसंगीं वचन । दिलें तेंचि खावें अन्न ॥३॥
तुका ह्मणे भार । तुह्मी जाणां थोडा फार ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 12, 2019
TOP