नाटाचे अभंग - ७२२१ ते ७२३४
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
॥७२२१॥
शरीर दु:खाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार ॥
शरीर दुर्गंधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥
शरीर उत्तम चांगलें । शरीर सुखाचें घोंसुलें ॥
शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥२॥
शरीर विटाळाचें आळें । मायामोहपाशजाळें ॥
पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥३॥
शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध ॥
शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥४॥
शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा ॥
शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥५॥
शरीरा सुख नेदावा भोग । न द्यावें दु:ख न करीं त्याग ॥
नव्हे वोखटें ना चांग । तुका ह्मणे वेग करीं हरि भजनीं ॥५॥
॥७२२२॥
इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी ।
सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्ते वेव्हारी सुखरुप ॥१॥
न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस ॥
जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥
जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा ॥
संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥३॥
करिसी देवाविण आस । अवघी होईल निरास ।
तृष्णा वाढविसीं बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥४॥
धरुनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार ।
तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका ह्मणे ॥५॥
॥७२२३॥
संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार ॥
बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥
किती जन्म झाला फेरा । गणित नाहीं जी दातारा ॥
पडिलों आवर्ती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥२॥
वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धि ॥
मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनियां ॥३॥
अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा ॥
बाळत्व तारुण्य जरा । प्रधानपुरा भोग तेथें ॥४॥
ऐसीं उलंघुनि आलों स्थळें । बहुभोवंडिलों काळें ॥
आतां हे उगवावें जाळें । उजेडाअ बळें दिवसाच्या ॥५॥
सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट ॥
दावी सत्या ऐसें नष्ट । तुका ह्मणे भ्रष्ट झालों देवद्रोही ॥६॥
॥७२२४॥
विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरी निवासी ॥
विठ्ठल पुंडलिकापाशीं । कृपादानविसीं उदार ॥१॥
विठ्ठल स्मरणा कोंवळा । विठ्ठल गौरवीं आगळा ॥
आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥२॥
उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न ॥
समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥३॥
रुचीचे प्रकार । आणिताति आदरें ॥
कोठेंही न पडे अंतर । थोरां थोर धाकुटयां धाकुटा ॥४॥
करितां बळ धरितां नये । झोंबता डोळे मनें च होय ॥
आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥५॥
पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें ।
करितों सेवन आइतें । तुका ह्मणे चित्तें चित्त मेळवूनी ॥६॥
॥७२२५॥
ताप हे हरण श्रीमुख । हरीं भवरोगा ऐसें दु:ख ॥
अवलोकितां उपजे सुख । उभे सन्मुख दृष्टीपुढें ॥१॥
न पुरे डोळियांची धणी । सखोल कृपेचीच खाणी ॥
स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥२॥
राम कृष्णध्यान वामन नारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहींच नाहीं ॥
सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥३॥
गुणगंभीर चतुर सुजाण । शूर धीर उदार नारायण ॥
व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहन लावण्य हें ॥५॥
ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार ॥
अनंत आणि अपार । तो हा कठीं कर धरिताहे ॥५॥
जयाची वाणी सुमनमाळा । परमामृतजिव्हाळा ॥
अनंतां अंगीं अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरणसेवक ॥६॥
॥७२२६॥
अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा ॥
जगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥१॥
अगा विश्वव्यापका जनार्दना । गोकुळवासी गोपिकारमणा ॥
अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मर्दना कंसाचिया ॥२॥
अगा सर्वोत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा ॥
अगा निर्गुणा निराकारा । अगा आधार दिनाचिया ॥३॥
अगा उपमन्यसहाकारा । अगा शयनाफणिवरा ॥
अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥४॥
अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापती राजहंसा ॥
अगा ये पंढरीनिवासा । अगा सर्वेशा सहजरुपा ॥५॥
अगा परमात्मा परमपुरुषा । अगा अव्यया जगदीशा ॥
अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडी भवपाशा तुका ह्मणे ॥६॥
॥७२२७॥
कैसी करुं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा ॥
कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशा परी ॥१॥
कर्म भ्रष्ट माझें मन । नेणें जपतप अनुष्ठान ॥
नाहीं इंद्रियांसी दमन । नव्हे मन एक विध ॥२॥
नेणें यातीचा आचार । नेणें भक्तीचा विचार ॥
मज नाहीं संतांचा आधार । नाहीं स्थिर बुद्धि माझी ॥३॥
न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ ॥
न जिंकवती सकळ । काम क्रोध शरीरीं ॥४॥
आतां राख कैसें तरी । मज नुपेक्षावें हरी ॥
तुझीं ब्रिंदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका ह्मणे ॥५॥
॥७२२८॥
हरी नारायणा केशवा । गोविंदा गोपाळा माधवा ॥
कृष्णा विष्णु श्रीरामा यादवा । मधुसूदना सर्वेशा ॥१॥
वामना विराटा त्रिविक्रमा । श्रीधरा वैकुंठधामा ॥
भक्तमनोरथपूर्णकामा । परशरामा कृपाळा ॥२॥
पद्मनाभा हृषीकेशा । दामोदरा पूर्ण परेशा ॥
संकर्षणा आदि सर्वेशा । परमपुरुषा परमात्मा ॥३॥
प्रद्युम्ना जगदीशा । माझी आजी पुरवावी आशा ॥
तुज प्रार्थितो पुराणपुरुषा । विबुधईशा पाळका ॥४॥
अनिरुद्धा पुरुषोत्तमा । रमारमणा मेघ:श्यामा ॥
अधोक्षजा गोकुळ धामा । अच्युता अनंता नरहरी ॥५॥
गोपीव्रजजनसुखकरा । कंसमर्दना वीरयावीरा ॥
कुब्जारत यदुवीरा । दीनोद्धारा दीनबंधु ॥६॥
तुका ह्मणे विश्वंभरिता । तुज ऐसा नाहीं दाता ॥
कोठें न दिसे धुंडितां । माझी चिंता करावी ॥७॥
॥७२२९॥
विठ्ठल जिवाचा सांगाती । विठ्ठल वसे सर्वाभूतीं ॥
विठ्ठल दिसतसे सुषुप्ती । स्वप्न जागृती विठ्ठल ॥१॥
विठ्ठल सर्वांचा आधार । विठ्ठल मुक्तीचें माहेर ॥
विठ्ठल साराचें ही सार । विश्वाधार विठ्ठल ॥२॥
विठ्ठल साधन परब्रह्म । विठ्ठल कैवल्याचें धाम ॥
विठ्ठल नाम परम ॥ हरती श्रम जन्माचे ॥३॥
विठ्ठल सर्वस्वें उदार । उभारिला अभयकर ॥
रुक्मादेवीस्वामीवर । करुणाकर विठ्ठल ॥४॥
विठ्ठल सकळांचा दाता । विठ्ठल सर्वा आधीष्ठाता ॥
विठ्ठल भर्ता आणि भोक्ता । विठ्ठल दाता दिनाचा ॥५॥
विठ्ठल गुणांचा गुणनिधी । विठ्ठल करुणेचा उदधि ॥
विठ्ठल माझी सर्व सिद्धी । विठ्ठल विधी विधान ॥६॥
विठ्ठल जिवाचा हा जीव । विठ्ठल भावाचाही भाव ॥
तुका ह्मणे गुणार्णव । देवादेव विठ्ठल ॥७॥
॥७२३०॥
षड्गुण ऐश्वर्य संपत्ति । धीर उदार तूं श्रीपति ॥
परम कृपाळ परंज्योति । चरित्र कीर्ति काय वाणूं ॥१॥
जन्मोजन्मीं सुकृत राशी । गाई चारी संरक्षणेसी ।
मयुरपिच्छ मोरविशी । गोपाळांसी दाखवी ॥२॥
वत्सें गोप ब्रह्मयानें । सत्य लोका नेले चोरुन ॥
भक्तवत्सल भगवान । झाला आपण दो ठायीं ॥३॥
वत्सें वत्सप गाई होऊन । आपुलें दाविलें महिमान ॥
ब्रह्मादिकां न कळे खूण । परीपूर्ण पांडुरंगा ॥४॥
शेवटीं नीच काम करिसी । पांडवांचा पक्षपाती होसी ॥
गिळोनी अघासुरासी । बकासुरासी चिरोनी ॥५॥
वत्सासुरासी रगडीलें । तट्टू खेटुनी मारिलें ॥
गाडा दृष्टीनें भंगिलें । विमळार्जुन रांगतां ॥६॥
खाऊनी तांतडी भाजीपान । तृप्त केले ऋषीजन ॥
तुका ह्मणे आतां मी दीन । कांहीं वचन बोलावें ॥७॥
॥७२३१॥
विठ्ठल सुखाची मूर्ती । विठ्ठल धाम परंज्योति ॥
विठ्ठलाची अपार कीर्ती । त्रिजगती विस्तार ॥१॥
विठ्ठल अनाथाचा बंधु । विठ्ठल हा करुणासिंधु ॥
विठ्ठल विठ्ठल छंदु । तोडी हा बाधु जन्माचा ॥२॥
विठ्ठल मोक्षसिंधुदाता । विठ्ठल जग उद्धारिता ॥
विठ्ठल सर्वस्व जाणता । विठ्ठल कर्ता सर्वही ॥३॥
विठ्ठल कृपेचा सागर । विठ्ठल अमृताअगर ॥
विठ्ठल निर्गुण निर्विकार । नकळें पार शेषासी ॥४॥
विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेम जीवनकळा ॥
विठ्ठल अनादि सोंवळा । माया विटाळा न लिंपे ॥५॥
विठ्ठल रक्षी निज भक्तां । विठ्ठल कीर्तनासी भोक्ता ॥
तुका ह्मणे श्रोता वक्ता । करिता कथा लुब्धक ॥६॥
॥७२३२॥
वेद उद्भवे त्रिकांड । कंबुकंठ शोभादंड ॥
आपाद प्रचंड । वैजयंती साजिरी ॥१॥
आयुधमंडित चारी भुजा । दशांगुळें उदार हस्त वोजा ॥
भक्तपाळण गरुडध्वजा । भक्तराजा हें नाम ॥
नाना भूषणें मणगटीं । दंड सरळ चंदन उटी ॥
बाहु सरळ मय़ूर वेटी । केयूरांगद मिरविती ॥३॥
रम्य हनुवटी साजिरी । दंतपंक्ती विराजे अधरीं ॥
नासीक ओतींव कुसरीं । शुकाचिये परी शोभलें ॥४॥
नेत्र आकर्ण कमळाकार । भोंवया व्यंकटा भाळविस्तार ॥
उटी पिवळी टिळक कस्तुर । शोभा अपार मुगुटाची ॥५॥
माथां धरिला किरीट । मयूरपिच्छ लाविले दाट ॥
हिरे घन एकवट । नीळकंठ मस्तकीं ॥६॥
अनेक भ्रमर सुवास । सेविताती आमोदरस ॥
तुका ह्मणे त्या भाग्यास । पार नाहीं पाहा त्या ॥७॥
॥७२३३॥
आतां मी पतीत पतीत । नाहीं पातकासी नीत ॥
परी तुझा शरणागत । झालों अंत न पाही ॥१॥
नाहीं स्वस्थीर पायीं बुद्धि नाहीं हे ॥२॥
कोटी घडले अपराध । नाहीं भाव एकविध ॥
याचे गाईलें नाहीं शुद्ध । परमानंद कृपाळा ॥३॥
दास ह्मणवी एक चित्तें । सेविलें नाहीं नामामृत ॥
जाणितसें नसे अनाथें । पर कायेतें विस्मृती ॥४॥
जो होतो सकळ विचार । पायीं निवेदिला विस्तार ॥
आतां कळेल तो विचार । करी साचार स्वामिया ॥५॥
तुह्मां सांगणें प्रकार । हें तो वागजाल साचार ॥
केला करी अंगिकार । बहुत फार न बोलें ॥६॥
तुका आला लोटांगणीं । माझी परिसावी विनवणी ॥
द्यावी प्रेमसुख धणी । चक्रपाणी दीनानाथा ॥७॥
॥७२३४॥
अगा ये विठोबा अनामा । अगा ये अरुपा नारायणा ॥
अगा गोपी मनरंजना । मुरमर्दना मुरारी ॥१॥
अगा ये अलक्षा अपारा अगा ये मत्स्यकत्स्यधरा ॥
अगा ये नृसिंहा शूकरा । अदितीपुत्रा वामना ॥२॥
अगा ये रेणुकानंदना । अगा ये रघुपती लक्षुमणा ॥
यादवदळीं बळी कृष्णा । खगवाहना गोविंदा ॥३॥
बौध्य कलंकीं क्षेत्रकरा । अगा ये असुर संहारा ॥
अगा अपारविश्वाधरा । अगा श्रीधरा विठोबा ॥४॥
अगा सर्वेशा संकर्षणा । असुरमर्दना जनार्दना ॥
अगा कपी मनरंजना । आनंदघना अपारा ॥५॥
अगा ये राम कोदंडपाणी । सिंधुसुदन आनंदशयनी ॥
अगा अभ्यंतरतरणी। सहस्त्र किरणीं प्रकाशा ॥६॥
अगा ये पांडवपाळका । अगा ये ह्मणतसे तुका ॥
अगा अर्जुनपणरक्षका । रमानायका पांडुरंगा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : June 18, 2019
TOP