श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरूभ्यो नमः ॥ श्रीकृष्णायै नमः ॥
कृष्णा घोर वडवानल ॥ जाळी पापाब्धि समूळ ॥ चित्त होतांचि निर्मळ ॥ दावी मौक्तिक भक्तांसि ॥१॥
विष्णुकृपेची साउली ॥ होता ब्रह्मकन्या जाहली ॥ भक्तजनांची माउली ॥ कृष्णावेणा सत्य पै ॥२॥
आता श्रोते व्हावे सावधान ॥ ऐका सिंहावलोकनेकरून ॥ कैसी कृष्णा आली जाण ॥ तेचि कथा सांगतो ॥३॥
कल्पारंभी कृष्णावेणा ॥ स्वर्गी असता देव जाणा ॥ नित्य करिती पूजना ॥ अनन्य भावेसि ॥४॥
तेव्हा सृष्टी पुण्यवंत ॥ लोक असती बुद्धिवंत ॥ पूर्ण होउनि आयुष्यवंत ॥ राहती समस्तही ॥५॥
जो जयासि पाहिजे अर्थ ॥ तो सिद्धीस असे जात ॥ सकळ लोक भक्तिमंत ॥ सदा वर्तती सत्कर्मी ॥६॥
ऐसे जाता काही दिवस ॥ कालस्वभावे पातकास ॥ होता अंतरी प्रवेश ॥ ऐक पुढती सांगेन ॥७॥
पापसंसर्गाची बुद्धि ॥ तिणेच नष्ट जाहली सिद्धि ॥ दोषांची जाहली वृद्धि ॥ झाल्या औषधी त्या ठायी ॥८॥
त्या साठी जनांच्या निर्वाहाकारण ॥ फलमूल औषधी जाण ॥ वनस्पती केल्या उत्पन्न ॥ व्हावे रक्षण म्हणूनि ॥९॥
औषधी जीवनाकारण ॥ मेघवृष्टि केली निर्माण ॥ धर्माधर्म व्यवस्थापन ॥ मन्वादिमुखे करीतसे ॥१०॥
ऐसे असता अवचित ॥ धर्मापासून उत्पन्न होत ॥ चतुर्वपु निश्चित ॥ धर्मरक्षणाकारणे ॥११॥
नर आणि नारायण ॥ तिसरे प्रभुत्व वेगळे जाण ॥ चवथा कृष्ण होऊन ॥ झाली काया संपूर्ण ॥१२॥
प्रजादुःखांचे परिमार्जन ॥ चिंतोनिया चौघेजण ॥ कृष्ण धाकुटा त्यालागून ॥ बोलती काय परिसा ते ॥१३॥
जाऊनिया ब्रह्मसदनी ॥ कृष्णा आणावी तेथोनि ॥ जी का असे सुखदायिनी ॥ सर्व लोकांसि निश्चये ॥१४॥
आणिक सांगावे ब्रह्मयासि ॥ तीर्थे कल्पावी भूमीसि ॥ यापरी बोलूनि कृष्णासि ॥ होती स्वस्थ त्रिवर्ग ॥१५॥
रुकार देऊनी तिघांजणा ॥ सवेंचि गेला ब्रह्मसदना ॥ देखोनि कृष्ण चतुरानना ॥ निरोप कथी तयासि ॥१६॥
ऐकोनिया कृष्णवचन ॥ तात्काळ तोषला भारतीरमण ॥ करूनि कृष्णा कृष्णाधीन ॥ आपणही निघाला ॥१७॥
तैसेचि विष्णु आणि शंकर ॥ इंद्रादिदेव ऋषीश्वर ॥ करीत वाद्यांचा गजर ॥ तिजमागूनि चालले ॥१८॥
आनंदे बहु गर्जना करीत ॥ जय कृष्णे जय कृष्णे उच्चारित ॥ कोठे करावी स्थापित ॥ ऐसे बोलती एकमेका ॥१९॥
प्रवास करिता मार्गात ॥ ऋषि देखिला आसनस्थ ॥ त्यासि विचारिती त्वरित ॥ कवण तुम्ही ऋषिवर्या ॥२०॥
काय इच्छिसी मानसी ॥ प्रसन्न होउनी कृष्णा तुसी ॥ देईल सत्वर मग इजसी ॥ दैव उदेले तुझे बा ॥२१॥
देवीच्या आगमोत्सवार्थ ॥ जे जे असेल अभीप्सित ॥ ते ते मिळेल त्वरित ॥ शंका नाणी किमपही ॥२२॥
ऐसे ऐकोनिया वचन ॥ संतुष्ट जाहले ऋषिमन ॥ करसंपुट जोडून ॥ घाली लोटांगण भूमीसी ॥२३॥
उभा ठेला मग भूवरी ॥ म्हणे मी सह्यगिरी ॥ कृष्णा पूजावी अंतरी ॥ हेतू धरोनी बैसलो ॥२४॥
साक्षाद्विष्णुमयी कृष्णा ॥ व्हावी मजपासाव उत्पन्ना ॥ जिच्या पुण्यजलाने स्नाना ॥ करिता धन्य होईन ॥२५॥
तीर्थमातेच्या कृपेने ॥ जगी राहीन धन्यपणे ॥ ऐकोनि ऐशी उभयवचने ॥ तुष्ट झाली महानदी ॥२६॥
भक्तवत्सल श्यामकांती ॥ प्रसन्नवदना कृष्णामूर्ति ॥ बोलती झाली पर्वताप्रति ॥ तथास्तु ऐसे त्रिवार ॥२७॥
मी तुजपासून होते उत्पन्न ॥ याचि कारणे तव सुता जाण ॥ सह्यजा हे नामाभिधान ॥ विश्रुत होय भूमंडळी ॥२८॥
जैसा विष्णु भक्तवत्सल ॥ तैसेचि देवीचे शब्द कोमल ॥ ऐकोनि करिती देव नवल ॥ धन्य गिरी म्हणोनी ॥२९॥
देवासहित श्रीकृष्णा ॥ जाई आपुले सुस्थाना ॥ तैसाचि निघे पर्वतराणा ॥ नरनारायणासहित ॥३०॥
सिद्ध आणि विद्याधर ॥ सर्प आणि किन्नर ॥ गिरिवरी पातले सत्वर ॥ चवदा भुवने दाटली ॥३१॥
श्रीकृष्णामहोत्सवार्थ ॥ पित्रर्षिदेव समस्त ॥ स्तुति करिती अनवरत ॥ महानंदे करोनि ॥३२॥
कृतार्थ होईल सर्व लोक ॥ कामधेनूही इष्टदयक ॥ आली भूमंडळी नाक ॥ सोडूनिया सत्य पै ॥३३॥
एकवार मिळे कृष्णाजल ॥ तरी सुधा व्यर्थ केवल ॥ हव्यकव्ये आम्ही सकल ॥ तुष्ट होऊ तर्पिता ॥३४॥
सर्व अशुभांचे करी हरण ॥ ऐसा कृष्णाप्रवाह जाण ॥ तेथील जन भाग्यवान ॥ देश होय पुनीत ॥३५॥
कृष्णाप्रवाह जाय जेथोनि ॥ तीच पुण्य क्षेत्रमेदिनी ॥ निरय सोडिले पूर्वजगणी ॥ कृष्णावास होताचि ॥३६॥
होता कृष्णातटी वास ॥ पापे धुंडिती आश्रयास ॥ सकळ लोकांस स्वर्गास ॥ सोपान झाली जावया ॥३७॥
ऐसे नानापरी स्तवन ॥ करिता भोळे भाविक जन ॥ देव करिती पुष्पवर्षण ॥ संतोष होई सर्वांसी ॥३८॥
ऐसा सोहळा पाहूनि नयनी ॥ सह्य आनंदला मनी ॥ पूजासाहित्य करि घेऊनी ॥ करी पूजन कृष्णेचे ॥३९॥
तधी तोषून जनार्दन ॥ सह्यासि बोले गर्जोन ॥ म्हणे मी अश्वत्थ होऊन ॥ वास करीन ये स्थळी ॥४०॥
कृष्णा माझी तनु जाण ॥ निघेल अश्वत्थमुळापासून ॥ ऐसे बोलूनि जगज्जीवन ॥ अश्वत्थ होवोनि राहिला ॥४१॥
श्वेताश्वत्थमुळापासून ॥ तात्काळ जाहले कृष्णाजनन ॥ प्रवाहरूप सनातन ॥ पुर्वगामी जाहले ॥४२॥
कृष्णेचा ओघ पाहता नयनी ॥ जय जय केला सर्व ऋषींनी ॥ आनंदे टाळिया पिटोनी ॥ नाचो लागले सर्वही ॥४३॥
वाद्यांचा होतसे गजर ॥ दुंदुभिनादे कोंदले अंबर ॥ सुरवर वर्षती सुमनभार ॥ आल्हाद घन दाटला ॥४४॥
सकल देव मुनिवर ॥ करोनि कृष्णेस नमस्कार ॥ गेले स्वधामी सपरिकर ॥ जय जय कृष्णे करीत ॥४५॥
नारद म्हणे ऋषींसी ॥ कृष्णा आली भूमीसी ॥ तई अधर्मीदिकांसी ॥ थारा कोठे मिळेना ॥४६॥
पापे पळती देशातून ॥ कोठे न मिळे तया स्थान ॥ सर्व लोक पुण्यवान ॥ करिती भजन कृष्णेचे ॥४७॥
राक्षस होऊनि भयाभीत ॥ तेहि वेगे पळोनि जात ॥ परि मनी असे हेत ॥ कृष्णा मुक्त करील ॥४८॥
शुभ्रवर्ण वाहे सलिल ॥ ऐशी कृष्णा पुण्यशील ॥ दर्शने प्राणी तात्काल ॥ सायुज्यपदा पावती ॥४९॥
तिच्या आश्रये स्थळोस्थळी ॥ तीर्थे वसती पावलोपावली ॥ त्यांसि घेवोनि खेळीमेळी ॥ समुद्रांतरी प्रवेशे ॥५०॥
जैशी ऋग्वेदसंहिता ॥ तैशीच असे कृष्णा माता ॥ सूक्ता म्हणावे सर्व तीर्था ॥ पापमुक्त कराया ॥५१॥
स्कंदासि सांगे उमारमण ॥ ऐसे कृष्णेचे महिमान ॥ कथियेले मी संक्षेपून ॥ विस्तार करी तू आता ॥५२॥
जगाच्या हिताकारणे ॥ करावी महात्म्यकथने ॥ मुनींसि मत्प्रसादाने ॥ तीर्थे तुवा त्यापरी ॥५३॥
श्रवण करूनि तातवचन ॥ स्कंदे केले साष्टांग नमन ॥ गेला तो ऋषीस घेऊन ॥ स्वस्थानासी तात्काळ ॥५४॥
सह्यापासाव सागरावधी ॥ तीर्थे असती जी मधी ॥ तया ऐके ऋषीची मांदी ॥ स्कंदमुखेकरूनी ॥५५॥
नारद म्हणे मुनिपुंगवा ॥ ऐका महिमा तो आघवा ॥ नमन करूनि स्कंददेवा ॥ तुम्हांप्रती सांगतो ॥५६॥
पुढले अध्यायी तीर्थमहिमा ॥ नारद सांगेल वायंचमा ॥ श्रवण करिता सर्व कामां ॥ कृष्णाबाई पुरवील ॥५७॥
कृष्णानदीचे आगमन ॥ अत्यादरे करिता श्रवण ॥ दीर्घायुष्य ऐश्वर्य धन ॥ आरोग्य मिळे सर्वदा ॥५८॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ तृतीयोऽध्याय वर्णिला ॥५९॥