मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ४३

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४३

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णानुसूया स्मरता क्षणी ॥ आनंददत्त हा प्रगटे मनी ॥ पापपिशाचे वनोवनी ॥ पळत सुटती भीतीने ॥१॥

म्हणे अग्निसुत कृष्णेमधी ॥ तीर्थे आहेत कोट्यावधी ॥ महिमा तयांचा अल्पबुद्धी ॥ काय वानू ऋषी हो ॥२॥

ज्वालातीर्थ परम पावन ॥ तेथ आले जरी मरण ॥ तरी फिरोनि जननीस्तन ॥ तो न पाहे कदापी ॥३॥

केदारतीर्थी उदकपान ॥ किंवा करी जो सोमपान ॥ तया जे का पुण्य जाण ॥ तेचि कृष्णेसि स्पर्शिता ॥४॥

धन्य पराशर महातीर्थ ॥ घेता जयाचे दर्शन त्वरित ॥ तुष्ट होतसे रमाकांत ॥ भक्तदैवत नरहरी ॥५॥

जेथे ज्ञानी नित्य मुक्त ॥ वास करिती सदोदित ॥ पिंडप्रदाने कुले सप्त ॥ मुक्त होती जेथ पै ॥६॥

एक असता नरहरी ॥ त्रिधा होय हा कृष्णातीरी ॥ नृसिंहतीर्थी एक दुसरी ॥ मूर्ति मंत्राख्य मुनी हो ॥७॥

अज्ञानमार्गे जे वर्तती ॥ मंत्रहीन जे दिन असती ॥ तया प्रत्यक्ष ती जी मूर्ती ॥ ज्वालास्वरूपी होय ही ॥८॥

याचिविषयी कथा एक ॥ असे पातकनिवारक ॥ नंदिग्रामी विप्र धनिक ॥ विष्णुशर्मा नामक ॥९॥

पंचरात्रागमज्ञ वर ॥ ज्ञानी सत्य प्रिय उदार ॥ परी तयाची कृपण फार ॥ भार्या असे मुनी हो ॥१०॥

संगे तियेचा पती तोही ॥ न करी धर्म कधी काही ॥ देखोनि अतिथीस नाही नाही ॥ बोले सदाही स्त्रीजित ॥११॥

यापरी कितीएक दिवस ॥ जात असता वैशाखमास ॥ ऐन दोनप्रहरी घरास ॥ यती भिक्षेस पातला ॥१२॥

करिता उच्चार नारायण ॥ विष्णुशर्मा म्हणे ऐकून ॥ येथे कदा न मिळे अन्न ॥ यतिचिन्हधारक वंचका ॥१३॥

अहो तुम्ही तरी यती कैसे ॥ यतिधर्म तो दूर असे ॥ तुह्मा लागले उदरपिसे ॥ बरे यतीसे शोभता ॥१४॥

सदा रहावे वनी यतीने ॥ तेथेचि कंदमूल खाणे ॥ सच्चिदानंदी निमग्न असणे ॥ धर्म यतीचा हाचि हो ॥१५॥

ऐसे बोलता तो स्त्रीजित ॥ क्षमाशीलही यती त्वरित ॥ कोपोनि म्हणे गा तू यथार्थ ॥ वदसी सर्वज्ञ आम्हांसी ॥१६॥

कृपा करावी तुजवरी ॥ म्हणोनि आलो मी तरी ॥ असो गृहस्थधर्म परी ॥ सांग झडकरी मला हो ॥१७॥

होईल आपुला धनव्यय ॥ म्हणोनि झालासि तू कदर्य ॥ धिक् गृहस्थाश्रम विनिंद्य ॥ तुझा अधमाधमा रे ॥१८॥

ऐसे यतीचे ऐकोनि वचन ॥ विष्णुशर्मा खिन्न वदन ॥ जाया तयाची धरी मौन ॥ काही न बोलती उभयता ॥१९॥

पुण्यविरहित ते दंपती ॥ करोनि गेला तोही यती ॥ काय जाहली कथा पुढती ॥ ऐका आता कथीन ॥२०॥

कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ त्रेचाळिसावा अध्याय हा ॥२१॥

इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये कृपणब्राह्मणकथावर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥४३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP