मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ६

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ६

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

कृष्णादिवाकर उगवता ॥ अज्ञानतम नाशी तत्त्वता ॥ सवेंचि ब्रह्म प्रकाशता ॥ संदेह काही उरेना ॥१॥

स्कंद म्हणे ऋषींप्रती ॥ आता सिंहावलोकने चित्ती ॥ देखा कृष्णामंडली सांगती ॥ तेचि ऋषितीर्थ जाहले ॥२॥

नरनारायण जेथ ॥ सिद्ध गंधर्व अग्निष्वात्त ॥ महोरग ब्रह्मर्षि मूर्तिमंत ॥ जया ठायी राहती ॥३॥

संगमाचे उत्तरतटी ॥ ऋषितीर्थ असे विख्याती ॥ पितृतीर्थ दक्षिणप्रांती ॥ देवतीर्थ पूर्वेसी ॥४॥

देवतीर्थी सिद्धेश्वर ॥ वसे धौम्य ऋषीश्वर ॥ स्नान करोनि सुदामा भूसुर ॥ धूतपाप जाहला ॥५॥

म्हणूनि धूतपाप बोलिजे ॥ संगमापासूनि कोस जे ॥ यथार्थ नाम जया साजे ॥ स्कंद म्हणे ऋषींसी ॥६॥

पितृतीर्थी स्नान करिता ॥ तिले पितरांसी तर्पिता ॥ अखंड जोडे पुण्य तत्त्वता ॥ काय वर्णू ऋषी हो ॥७॥

तेथे जो श्राद्ध करील ॥ पिंड सातूचे देईल ॥ स्वगोत्रवर्धन करील ॥ हिरण्यदाने निश्चये ॥८॥

मिष्टान्ने पितृश्राद्ध करी ॥ नारायणाश्रमी जरी ॥ घृत मधुक्षीर वारी ॥ अखंड मिळे पितरांसी ॥९॥

संगमाचे उत्तरेसी ॥ स्नान करुनि ऋषींसी ॥ तृप्त करी यवान्नासी ॥ अखंड लाधे समृद्धि ॥१०॥

जे का नरनारायणासी ॥ देती तिलयुक्त फलासी ॥ संतुष्ट होवोनि ते त्यासी ॥ इच्छिले मानसी पुरविती ॥११॥

माघमासी एक स्नान ॥ ऋषिदेवांचे पूजन ॥ नारिकेल देता द्विजांकारण ॥ रुद्रलोक मिळतसे ॥१२॥

पापशुद्धि धरोनि चित्ती ॥ प्रातःकाली देवतीथी ॥ स्नान करावे मंत्रोक्ती ॥ भक्तिपूर्वक अवधारी ॥१३॥

मंत्र ॥ सवित्रे प्रसवित्रे च परं धाम जलं मम ॥ त्वत्तेजसा परिभ्रष्टं पापं यातु सहस्त्रधा ॥१४॥

दिवाकर जगन्नाथ प्रभाकर नमोऽस्तुते ॥ परिपूर्ण कुरुष्वैव स्नानं त्वेतन्ममाच्युत ॥१५॥

जो हा असे आगमोक्त ॥ ऐसा मंत्र उच्चारित ॥ अग्निवरुणां करोनि दंडवत ॥ स्नान करावे तात्काळ ॥१६॥

माघमासी करिता स्नान ॥ बिंब रवीचे भेदून ॥ शीघ्र पावे मोक्षभुवन ॥ काय वर्णू ऋषी हो ॥१७॥

शुक्लपक्षी माघमासी ॥ हस्तनक्षत्र एकादशी ॥ स्नान करिता पाप नाशी ॥ जन्मजन्मांतरींचे ॥१८॥

ऋषींस म्हणे शरजन्मा ॥ काय वानू तीर्थमहिमा ॥ धूतपाप होय सुदामा ॥ मातृगामी जरी तो ॥१९॥

शालकवंशी धौम्यमुनी ॥ पंचाक्षरी मंत्र जपोनी ॥ सिद्धि झडकरी पावोनी ॥ पुनीत जाहला तेधवा ॥२०॥

ध्यानस्थ करोनि शिवलिंग ॥ अर्चिता टाकिला देहलिंग ॥ स्वयेंचि झाला स्वयंभू ॥ सिद्धेश्वर नामाने ॥२१॥

पुष्पवृष्टि प्रभंजन ॥ करी सौम्य वर्षाव घन ॥ सकल झाले शुद्ध मन ॥ सिद्धेश्वरप्रसादे ॥२२॥

सिद्धेश्वर तीर्थासी ॥ व्यतिपात संक्रमेसी ॥ स्नान पिंडप्रदानेशी ॥ करिता पावे सौम्य गति ॥२३॥

माघ व्यतिपात आमेसी ॥ धूतपापतीर्थासी ॥ करितां घृत गूढ पायसी ॥ प्राप्य होय रुद्रलोक ॥२४॥

कृष्णेच्या उत्तरतटी ॥ तीर्थ सिद्धेश्वर विख्याति ॥ हिरण्यदान जे करिती ॥ सूर्यगति पावती ॥२५॥

स्कंद म्हणे ऋषींलाग्न ॥ ऐसे धूतपाप महिमान ॥ जयेठायी द्विजनंदन ॥ उत्तम गति पावला ॥२६॥

ऐशी ही पुण्य पावन कथा ॥ भक्तिपूर्वक नित्य ऐकता ॥ चतुर्वर्ग फल तत्त्वतां ॥ लाधे कृष्णाप्रसादे ॥२७॥

पुढिले अध्यायी सुरस आख्यान ॥ सत्य ब्राह्मणा उपदेश गहन ॥ होता पावेल ब्रह्मसदन ॥ आनंदभिधान असे हे ॥२८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ पाहता चाखोनि रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ षष्ठोऽध्याय वर्णिला ॥२९॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये धूतपापतीर्थवर्णनं नाम षष्ठोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP