श्रीगणेशाय नमः ॥
कृष्णामासससरोवरी ॥ भक्तहंस विहार करी ॥ अभक्तकाक दुःखवारी ॥ सेवन करी अहर्निशी ॥१॥
आता कृष्णाचरणकमला ॥ नमोनि सेवा कथारसाला ॥ कैसा चंद्रिकासंग जाहला ॥ गोष्पदापासाव सहस्त्रधेनु ॥२॥
नारद म्हणे ऋषींप्रती ॥ बैसोनिया उंदरावरती ॥ कैलासी जाता गणपति ॥ उडुपति हांसे पडतांची ॥३॥
तव आला गणेशा राग ॥ म्हणे नोहे हा साधुमार्ग ॥ भाद्रशुद्ध चतुर्थीयोग ॥ येता अदृश्य जगा तू ॥४॥
तये दिनी तुजला नर ॥ बळेचि पाहता आळ थोर ॥ मिथ्याचि येऊनि तो पामर ॥ दुःख फार भोगील ॥५॥
चंद्र शापलासे जाणून ॥ आला तात्काळ चतुरानन ॥ चंद्रासि गेला धिःकारून ॥ कैलासनगी तयासह ॥६॥
गणाध्यक्षाची घेऊनि भेटी ॥ नमिती मृगांक परमेष्ठी ॥ सद्गदीत होऊनिया कंठी ॥ स्तविती तुष्टीस्तव तया ॥७॥
आदिमूर्ति गजानना ॥ ब्रह्मा विष्णु शिवकारणा ॥ मंगलधामा सनातना ॥ शरण चरणा पातलो ॥८॥
ऐशी ऐकोनि ब्रह्मस्तुति ॥ प्रसन्न होय मंगलमूर्ति ॥ बोले माझी वृथा उक्ति ॥ कल्पांतीही न होय ॥९॥
यापरी परिसोनि बोले विधी ॥ तू अससी दयानिधी ॥ मुक्त करी गा कल्पनिधी ॥ देवाधिदेवा गणेशा ॥१०॥
गणेश म्हणे मजप्रति ॥ शुक्ल भाद्रपद चतुर्थी ॥ येता भक्तीने जे पूजिती ॥ पावती ते शुद्ध यश ॥११॥
भाद्रशुद्ध चतुर्थीसी ॥ पाहू नये कलानिधीसी ॥ कृष्णेचे उत्तर दिशेसी ॥ जावोनि शशी तप करो ॥१२॥
होईल तो शापमुक्त ॥ ऐसे ऐकता गणेशसूक्त ॥ वंदोनि शशी दोघांप्रत ॥ जाय तपा सह्याद्री ॥१३॥
तेथे सिद्धेशसन्निधी ॥ वर्षे सोळा कलानिधी ॥ पंचाक्षरी जपे साधी ॥ कार्य सिद्धेशकृपेने ॥१४॥
सिद्धेश्वराचा पद्महस्त ॥ मस्तकी पडता शापमुक्त ॥ शशी स्थापिला शिवे जेथ ॥ निघे तेथोनि चंद्रिका ॥१५॥
मिळाली कृष्णेस येऊन ॥ तेथ करिता स्नान दान ॥ मोक्ष लाधे शीघ्र जन ॥ शंका मनी नसावी ॥१६॥
चंद्रिका कृष्णासंगमावरी ॥ श्रवण येता सोमवारी ॥ सक्तुपिंडे श्राद्ध करी ॥ तारी सप्त कुलांसी ॥१७॥
चंद्रिका तीर्थाहूनि दूर ॥ तीन सहस्त्र धनुषांवर ॥ निर्जना नदी मनोहर ॥ संगमचरित्र ऐका ते ॥१८॥
कृष्णानदीचे दक्षिणतीरी ॥ असे निर्जना नाम शबरी ॥ बहुत वर्षे तप करी ॥ अंधकारि तुष्ट व्हावया ॥१९॥
तिचा देखोनिया भाव ॥ साक्षात झाला महादेव ॥ भक्तार्तीनाशक सदाशिव ॥ माग वर म्हणतसे ॥२०॥
येरी म्हणे ममाश्रमी ॥ यज्ञसाधन खदिरनामी ॥ जलरूप व्हावे तेथून मी ॥ कृष्णाजीवनी मिळावे ॥२१॥
बरे बोलोनि महेश्वर ॥ शबरीस पाहे करुणाकर ॥ खदिरमूलापासाव नीर ॥ सत्वर वाहू लागले ॥२२॥
तेचि निर्जना नदी जाहली ॥ जाऊनि कृष्णेप्रति मिळाली ॥ हेचि कथा तुम्हा वर्णिली ॥ ऐकता जाळी पापखंडे ॥२३॥
कन्यागती श्राद्ध करिता ॥ मुक्त होय मातापिता ॥ निर्जनासंगमी तर्पण करता ॥ पितर होती सोमप ॥२४॥
श्रवण नक्षत्र सोमवारी ॥ निर्जनासंगमी जो स्नान करी ॥ सप्त पितरां तो उद्धरी ॥ शंका अंतरी नसावी ॥२५॥
नारद म्हणे मुनिजना ॥ आणीक असती तीर्थे नाना ॥ पुढले अध्यायी करीन कथना ॥ पावन गणेशप्रवरादि ॥२६॥
हा अध्याय करिता श्रवण ॥ निःसत्त्व होय भवबंधन ॥ कृष्णाप्रसादे नारायण ॥ मुक्तिसदन देईल ॥२७॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ती तेणे अखंड ॥ पंचदशोऽध्याय हा ॥२८॥