श्रीगणेशाय नमः ॥
निराकार निर्गुण स्वयंभे ॥ साकार सगुण जगदंबे ॥ भक्तचित्ती सदा बिंबे ॥ न विसंबे कृष्णावेणी ॥१॥
पूर्वाध्यायी अमृतेश्वरासी ॥ ब्रह्मे ठेविले चार नामांसी ॥ ऋषी विचारिती नारदासी ॥ कैसी विविध सांग पा ॥२॥
ऐसा ऐकोनि ऋषींचा प्रश्न ॥ आनंदोनि बोले ब्रह्मनंदन ॥ यज्ञांती लाधे अग्निपासून ॥ चतुरानन अमृतासी ॥३॥
तये ठायी स्थापिले लिंग ॥ नामे ब्रह्मामृतानंद अभंग ॥ जयाचेनि दर्शन दुरितभंग ॥ पुण्यसंग होतसे ॥४॥
कंटकदैतेयापासाव ॥ रक्षिले देव सवासव ॥ दैत्यांसि मारूनि महादेव ॥ अमृतेश नाव म्हणोनी ॥५॥
कालगतीने धर्मलोप झाला ॥ द्वापारी तो शिवे स्थापिला ॥ पुनर म्हणोनि धर्मेश्वर बोलिला ॥ अधर्माला जो दहन करी ॥६॥
बारा वरुषे पांडव तेथ ॥ आचरते झाले महाव्रत ॥ सर्व भद्र झाले प्राप्त ॥ भद्रेश बोल तयासाठी ॥७॥
ऐसे ऐकोनि सर्व ऋषी ॥ पांडवे आचरिले बारा वरुषी ॥ व्रत कैसे ते देवऋषि ॥ सांग आम्हांसी बोलती ॥८॥
ऐसी ऐकोनिया उक्ति ॥ नारद बोले कथा पुढती ॥ राजसूययज्ञाची होता निवृत्ति ॥ काय स्थिति जाहली ॥९॥
उत्पात होती भयंकर ॥ ऐसे पाहोनि युधिष्ठिर ॥ चिंता पावला अति दुस्तर ॥ व्यासचरण ध्यातसे ॥१०॥
त्रिकालज्ञ व्यासमुनी ॥ तात्काल पातला तये स्थानी ॥ धर्म ठेवूनि मस्तक चरणी ॥ अरिष्टकारण विचारी ॥११॥
ऐकोनि सरस्वतीतनय ॥ म्हणे प्रजेचाचि हा अन्याय ॥ येरू म्हणे सांगा उपाय ॥ काय करू सर्वज्ञा ॥१२॥
तधी म्हणे पराशरसुत ॥ क्रोधमदलोभविवर्जित ॥ आचरता द्वादशाब्दव्रत ॥ शांत होतील अरिष्टे ॥१३॥
परिसोनिया व्यासवाणी ॥ द्यूतांचे मिष करोनी ॥ धर्मराज गेला तपोवनी ॥ जननीबंधुसहित पै ॥१४॥
अकरा वरुषात सर्व तीर्थे ॥ पृथिवीतील करोनि जेथे ॥ आले पांडव कृष्णा तेथे ॥ परमार्थसाधन कराया ॥१५॥
कृष्णा साक्षात विष्णुमयी ॥ स्नान करोनि तये ठायी ॥ लिंग स्थापोनि मुक्तिदायी ॥ एक हायन राहिला ॥१६॥
नाम असे धर्मेश्वरू ॥ कन्यागती येता गुरू ॥ अपूर्ण असती व्रताचारू ॥ पूर्ण होती तये स्थानी ॥१७॥
कन्यागती बृहस्पती ॥ येता झाली वर्षे पूर्ती ॥ भद्र पावला धर्मनृपति ॥ तीर्थ भद्रेश्वर म्हणोनी ॥१८॥
भद्रेश्वरतीर्थी स्नान करिता ॥ भद्रेश्वराचे दर्शन घेता ॥ सकल सिद्धी येत हाता ॥ उमाकांता पूजिता ॥१९॥
विष्णुकुंडी अमृतेश्वरी ॥ श्रवण येता सोमवासरी ॥ स्नान करितांचि ते अवसरी ॥ पाप दूरी होतसे ॥२०॥
गुरुवासरी येता दर्श ॥ ब्रह्मकुंडी बुडोनि हरुष ॥ डोळा पाहतांचि भद्रेश ॥ स्वये अमृतेश होतसे ॥२१॥
अमायुक्त सोमदिन ॥ व्यतीपात दक्षिणायन ॥ रुद्रकुंडी करोनि स्नान ॥ पितृतर्पण करावे ॥२२॥
जीव असता कन्यागती ॥ सक्षौरस्नान भद्रेशनिकटी ॥ उपवास श्राद्ध कृष्णातटी ॥ करिता तुष्टती पितृगण ॥२३॥
कन्येसी वाचस्पति असता ॥ कृष्णातीरी प्रायश्चित्त घेता ॥ तयाचे पितर सायुज्यता ॥ तात्काल पावती निर्धारी ॥२४॥
ऐसे ऐकोनि ऋषीश्वरी ॥ प्रश्न केला कृष्णाथोरी ॥ कन्यागती का तारकारी ॥ करी संदेहखंडण ॥२५॥
स्कंद म्हणे ऋषीश्वरांसी ॥ ऐका पुरातन इतिहासासी ॥ जो विधीने नारदासी ॥ पुण्यराशी वर्णिला ॥२६॥
दिवोदास राजा प्रसिद्ध ॥ राज्य करिता देव सिद्ध ॥ काशी सोडोनि नानाविध ॥ विप्र विबुध चालले ॥२७॥
तपोधन गेले तये वेळी ॥ तीर्थयात्रेची करोनि बोली ॥ दक्षिणेसि जातसे इंदुमौलि ॥ मंदराचळी विश्वेश ॥२८॥
कोणी गेले गोदावरीसी ॥ गौतमादि करिती तीर्थाटणासी ॥ जनस्थानी राहिले कित्येक ऋषि ॥ तपासी निश्चयेकरूनी ॥२९॥
व्यास सुतपा याज्ञवल्क्य ॥ शौनक जैमिनी मार्कंडेय ॥ भरद्वाज पाराशर मांडव्य ॥ वसिष्ठ दत्तात्रय योगी ॥३०॥
सहपुत्र जमदग्नि देवल ॥ कश्यप कौशिकमुनी कपिल ॥ तीर्थे हिंडता हिंडता सकळ ॥ आले कृष्णावेणेसी ॥३१॥
कृष्णा देखोनिया नयनी ॥ धन्य मानिती सकल मुनी ॥ वास कराया तये स्थानी ॥ पर्णकुटिका बांधिती ॥३२॥
एकदा मिळोनी कृष्णातटी ॥ ऋषी पडले महासंकटी ॥ होत नाही आम्हा भेटी ॥ भागीरथीची म्हणोनी ॥३३॥
एक म्हणती तप करोनी ॥ आणू येथे मुक्तिदायिनी ॥ रुचता सर्वांसि ते मनी ॥ नारायण चिंतिती ॥३४॥
ध्यान करितांचि तात्काळ ॥ पातला तेथे भक्तपाळ ॥ मागा सत्वर मनींची आळ ॥ पावाल दुर्लभ जरी ती ॥३५॥
ऐसे वचन ऐकोनिया ॥ म्हणती देखिले तुझिये पाया ॥ आता आम्हावरी दया ॥ करी वाया न कष्टवी ॥३६॥
जी का तुझे पायापासून ॥ निघोनि करी ब्रह्मांडभेदन ॥ सदाशिवाचे जटेतून ॥ त्रिपथगामिनी जाहली ॥३७॥
ती त्रैलोक्यपावनी गंगा ॥ आणि कृष्णेचिया संगा ॥ कन्यागती पांडुरंगा ॥ भवतरंग तराया ॥३८॥
ऐसे ऐकोनिया वचन ॥ तथास्तु म्हणोनी नारायण ॥ करिता विष्णुपदी स्मरण ॥ येऊन म्हणे जान्हवी ॥३९॥
देवाधिदेवा नारायणा ॥ भक्तपालका मधुसूदना ॥ गुरु कन्येस येता जाणा ॥ येईन कृष्णाभेटीसि ॥४०॥
जोवरी असती चंद्रसूर्य ॥ येईन तोवरी सत्य सत्य ॥ आज्ञा पाळीन तुझी नित्य ॥ दैत्यमर्दन मुरारी ॥४१॥
बोल ऐकोनि यापरि ॥ ऋषी आनंदले भारी ॥ गुप्त जाहला कैटभारी ॥ सरिद्वरा जेथ वसे ॥४२॥
स्कंद म्हणे मुनिवरांसी ॥ गंगोद्भव होवोनि उत्तरेसी ॥ वाटे मिळोनिया कृष्णेसी ॥ सागरासी भेटाया ॥४३॥
तीर्थी तीर्थी आनंदलहरी ॥ दावूनि चालिले गंगावारी ॥ आश्रम कृष्णाउभयतीरी ॥ व्यासादि करिती तपार्थ ॥४४॥
म्हणोनि कन्येसि येता गुरू ॥ कृष्णा होतसे कल्पतरू ॥ कल्पिले फल पाविजे नरू ॥ पुण्य अपारू पिंडदाने ॥४५॥
क्षौरपवास हिरण्यश्राद्ध ॥ होमस्नानदान अगाध ॥ करिता होतील पितर शुद्ध ॥ मुक्त कृष्णाप्रसादे ॥४६॥
आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ॥ पुत्रपौत्रादि पावती नर ॥ कन्येसि येता देशिकवर ॥ कृष्णातरंगिणीदर्शने ॥४७॥
कन्यागती कृष्णातीरी ॥ पिंडश्राद्ध जो न करी ॥ चांडाळ तो रौरवघोरी ॥ कल्पवरी राहत ॥४८॥
तेथे भोगोनि यातना ॥ ब्रह्मराक्षसादि जन्म नाना ॥ पावे तोचि वंशछेदना ॥ कारण होय निश्चये ॥४९॥
ऐसे जाणोनि धर्मराज ॥ कन्यागती कृष्णेसि सहज ॥ येऊनि साधे आत्मकाज ॥ प्रजारिष्टे घालवी ॥५०॥
कन्यागती भद्रेश्वरा ॥ पूजोनि देत वसुंधरा ॥ पात्र पाहोनि द्विजवरा ॥ राज्यपद मेळवी ॥५१॥
भद्रेश्वरी येता मरण ॥ सर्व पापे होती दहन ॥ भद्रेश होय तोचि जाण ॥ कैलाससदन साधिजे ॥५२॥
जया असे संसारव्याधि ॥ तया कृष्णा हाचि औषधि ॥ तोडोनिया सकल उपाधी ॥ कृष्नानिधि सेवा हो ॥५३॥
जो हे भद्रेश्वराख्यान ॥ आदरे करी श्रवण पठण ॥ तोचि लाधे भद्रेशचरण ॥ ध्यान करिता कृष्णेचे ॥५४॥
पुढले अध्यायी गोष्पदतीर्थ ॥ महिमा वर्णितील अद्भुत ॥ एकाग्र करोनिया चित्त ॥ ऐका संतभाविक हो ॥५५॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ तृप्ति पावाल तेणे अखंड ॥ त्रयोदशोऽध्याय वर्णिला ॥५६॥
इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये भद्रेश्वरवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥