श्रीगणेशाय नमः ॥
आई आई गे कृष्णावेणी ॥ पाव पाव गे त्रितापशमनी ॥ धाव धाव गे पापनाशिनी ॥ पाप पावनी सह्यजे ॥१॥
स्कंद म्हणतसे मुनिवरांना ॥ पूर्वाध्यायी वेदकृष्णा ॥ संगम ऐकोनि वाढली तृष्णा ॥ याज्ञवल्क्यमुनीची ॥२॥
म्हणे अहो संगमाचा ॥ महिमा वर्णिला परि तयाचा ॥ आला अनुभव कवणासि साचा ॥ सांगा व्यासमुनीजी ॥३॥
तदा पराशरकुमार म्हणे ॥ वेदकृष्णासंगमस्नाने ॥ काया जयाचि पवित्र तेणे ॥ केले जिणे सकळचि ॥४॥
संगमी पडे जरी हाड ॥ उघडे मुक्तीचे तरी कवाड ॥ कथा सांगतो तुज सुखाड ॥ घडली तेचि मुनिवरा ॥५॥
सौरभनगरामाजि कुटिल ॥ होता जातीचा विप्र केवळ ॥ परनिंदकामाजि कुशल ॥ पालक चोरजनांचा ॥६॥
सभेमाजी साक्ष मिथ्या ॥ सदा देवोनि ब्रह्महत्या ॥ करोनि ठेविली एक वेश्या ॥ तया द्विजाने मुनी हो ॥७॥
राहोनि काही दिवस गावी ॥ अपार पैसा तो मेळवी ॥ गिरिकंदरी पुढे ठेवी ॥ आपुली वस्ती तो द्विज ॥८॥
वाटेत जे का पांथ येती ॥ घेवोनि तयांचीहि संपत्ती ॥ मारीतसे हो तया निगुती ॥ महापातकी अधम तो ॥९॥
ऐसे लोटता बहुत दिन ॥ दैवयोगे पावला मरण ॥ होता तयाला एक नंदन ॥ ब्राह्मण वेदपारग ॥१०॥
शिवशर्मा नाम ज्याचे ॥ खिन्न होवोनि तो पित्याचे ॥ और्ध्वदेहिक वत्सराचे ॥ ब्राह्मणाज्ञेने संपवी ॥११॥
मातापित्याचिया घेवोनि अस्थी ॥जावे स्वयेचि काशीप्रती ॥ ऐसे आणीतसे चित्ती ॥ सवेचि विघ्न पातले ॥१२॥
काशीस जावे मनी येता ॥ अग्नि लागे घरा अवचिता ॥ दुजे वत्सरी मालमत्ता ॥ चोरीस जाता रहावे ॥१३॥
वर्षे लोटली यापरी बारा ॥ परी न घडे प्रस्थान पुत्रा ॥ गती कैशी मिळेल पितरा ॥ काय करावे म्हणतसे ॥१४॥
ऐसे चिंतोनि तो ब्राह्मण ॥ एकदा निघे अस्थि घेऊन ॥ देश पर्वत उल्लंघून ॥ आला कृष्णातटासी ॥१५॥
अस्थि ठेवोनिया तीरी ॥ सभार्य गेला जलांतरी ॥ राहोनि उभा उच्चार करी ॥ स्नानमंत्र मुखाने ॥१६॥
तव येवोनि एक कोल्हा ॥ अस्थि घेवोनि चालिला ॥ दैवे मुखापासाव सुटला ॥ अस्थिसमूह तयाचे ॥१७॥
समूह अस्थींचा पडे तीर्थी ॥ देखोनि कोल्हा त्वरितगती ॥ पळे तेथोनि मनी भीती ॥ धरोनि मुनिश्रेष्ठ हो ॥१८॥
शिवशर्मयाचे स्नान होता ॥ अस्थि पाहे डोहात पडता ॥ सवेचि तिथे जावोनि शोधिता ॥ न सापडती फिरोनी ॥१९॥
भार्येसि म्हणे हा प्रारब्ध माझे ॥ पितरांचे हे कर्म ओझे ॥ कैसेनि उतरेल मज सांगिजे ॥ आता मध्येच विघ्न हे ॥२०॥
येरी म्हणे ही कर्मगती ॥ असे भयंकर अहो पती ॥ ऐसे परस्पर जव बोलती ॥ तव विमान पातले ॥२१॥
होता घंटानाद घणघण ॥ दूत पातले चौघे जण ॥ चतुर्भुज घनश्यामवर्ण ॥ मातापितयांसि न्यावया ॥२२॥
तदा होवोनि दिव्यकांती ॥ पितर विमानारूढ होती ॥ पुत्र स्नुषा देखोनि करिती ॥ नवल चित्ती आपुले ॥२३॥
तदा श्रीवत्सचिन्ह दूत ॥ म्हणती शिवशर्मयाप्रत ॥ नवल कैचे वाटले येथ ॥ सांग सत्वर ब्राह्मणा ॥२४॥
गंगा यमुना सरस्वती ॥ सकळ जगाचा उद्धार करिती ॥ तैसी कृष्णा जाणिजे निरुती ॥ मुक्तिदायिनी ब्राह्मणा ॥२५॥
पितर तुझे हे पातकी दुवाड ॥ परी कृष्णोदकी हाड ॥ पडतांचि तुटले संसारझाड ॥ कृष्णाकर्हाडे ब्राह्मणा ॥२६॥
बोलोनि ऐसे शिवशर्मयासि ॥ दूत तयाचे मातापित्यासी ॥ घेवोनि गेले विष्णुलोकासी ॥ व्यास म्हणे तेधवा ॥२७॥
ऐसा कृष्णावेदसंगम ॥ साक्षात असे हे मुक्तिचे धाम ॥ पाहोनि यापरी करी धर्म ॥ शिवशर्मा भक्तीने ॥२८॥
बांधोनिया पर्णकुटी ॥ सदा राहिला कृष्णातटी ॥ स्नाने पाने स्वये शेवटी ॥ भक्तमात्रास निश्चये ॥३०॥
देह राहो की न राहो ॥ कृष्णाघोष हा हो ॥ स्कंद म्हणतसे पुढे ऋषी हो ॥ तीर्थ कहोळ कथीन ॥ ३१॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ तेहतिसावाऽध्याय हा ॥३२॥
इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये सर्वतीर्थवर्णनं नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः ॥३३॥