श्रीगणेशाय नमः ॥
नारायणीची आनंदखाणी ॥ कृष्णा अघबकविदारिणी ॥ कृष्णा संसारकंसमर्दिनी ॥ मनी सर्वदा ही वसो ॥१॥
म्हणे मुनीला शिखिवाहन ॥ कृष्णतीर्थापासून दोन ॥ बाण असे जया प्रमाण ॥ आदित्यतीर्थ तेचि पै ॥२॥
जेथे करिता स्नान जप ॥ होम श्राद्ध दान तप ॥ दहन सप्त जन्मींचे पाप ॥ तिलतर्पणे होतसे ॥३॥
आदित्यह्रदय पठण करी ॥ पूजी आदित्यासी जरी ॥ सूर्यमंडल भेदून तरी ॥ वरी तत्पद मेळवी ॥४॥
तेथोनि दोन बाणांवर ॥ असे मुद्गलतीर्थ पवित्र ॥ पुढे विदुरतीर्थ थोर ॥ अंतर सहा बाण जे ॥५॥
तेथोनि सहा धनुषांवर तीर्थ सर्वपापहर ॥ स्नान करिता यमलोक दूर ॥ ज्ञान अंतरी देत जे ॥६॥
कृष्णातटी पदोपदी ॥ उभय काठी तैसेचि मधी ॥ तीर्थे आहेत जी व्याधी ॥ नष्ट करिती स्पर्शिता ॥७॥
शतलिंगासंगम पुढे ॥ स्नाने जेथिचे मुक्ति जोडे ॥ क्रौंचतीर्थ मग रोकडे ॥ क्रौंचमुनीचे सिद्धिद ॥८॥
पुढे विदुरयज्ञपंथ ॥ स्नान करिता भक्तीने जेथ ॥ वाजपेयफल प्राप्त ॥ होते म्हणे नारद ॥९॥
कृष्णादर्शना कार्तिकेय ॥ गेला असता पार्वतीप्रिय ॥ गौरीसहित मागून जाय ॥ जेथ तनय पहाया ॥१०॥
जेथे गणांसह गणपती ॥ आला पहाया अग्रजापती ॥ सर्वही सदा तैसेचि राहती ॥ कुमारालय तीर्थ ते ॥११॥
कुमारासि जे प्रियकर ॥ सर्वसिद्धिद पापहर ॥ ते कुमारालय पवित्र ॥ तीर्थ थोर मुनी हो ॥१२॥
पुढे संगम सृष्टगेचा ॥ वास जेथे विधिशिवाचा ॥ स्नान करिता पातकांचा ॥ लेश नुरे तेथ हो ॥१३॥
पूजोनिया लक्षुमीसी ॥ सुख जाहले जानकीसी ॥ जेथे तेथे सीतार्हदासी ॥ बोलती सकळ मुनी हो ॥१४॥
तेथे स्नान करिता नर ॥ लाधे स्वर्गसुख अपार ॥ ऐकोनि यापरी ऋषीश्वर ॥ विचारिती कार्तिका ॥१५॥
अहो स्कंदा तीर्थयात्रेसी ॥ करित होते जे तापसी ॥ तयांचा याज्ञवल्क्यासी ॥ काय संवाद जाहला ॥१६॥
मध्ये तैसाचि तो राहिला ॥ सांग आता तरी आम्हाला ॥ ऐसे परिसोनि सांगता जाहला ॥ अनलात्मज मुनींसी ॥१७॥
सीतार्हदाप्रति सकळ मुनी ॥ याज्ञवल्क्यासह येऊनी ॥ स्नान संध्या तेथे करोनी ॥ द्रौपदीतीर्थासि पावले ॥१८॥
पुढे देखिले धर्मतीर्थ ॥ धौम्यतीर्थ मग शंखतीर्थ ॥ देखोनि पार्वतेयतीर्थ ॥ म्हणती मुनी कार्तिका ॥१९॥
अहो द्रौपद्यादितीर्थे ॥ कैसी जाहली हे आम्हांते ॥ सांग म्हणताचिबोले तयाते ॥ हर्षे उमेचा नंदन ॥२०॥
अजातशत्रु धर्म नृपती ॥ यत्ने मेळवी सकल क्षिती ॥ मग हस्तनापुरी वस्ती ॥ करोनि राहिला मुनी हो ॥२१॥
परी चैन नसे तया ॥ म्हणोनि बोलवी विप्र धौम्या ॥ आणि म्हणतसे काय करु या ॥ राज्यासि कृष्णासमक्ष ॥२२॥
मित्र बांधव सान थोरू ॥ तैसेचि भीष्म द्रोण गुरू ॥ वधिले मिया आता तरू ॥ कैसे नरकार्णवासी ॥२३॥
मी महापातकी अधम ॥ तारील मजही जे उत्तम ॥ असेल तीर्थ ते विचार परम ॥ करोनि सांगा मुनी हो ॥२४॥
ऐसा सानुज धर्म दीन ॥ होवोनि करी संभाषण ॥ तदा धौम्यादि ते ब्राह्मण ॥ म्हणती युधिष्ठिरासी ॥२५॥
जयंती नगरी कृष्णावेणी ॥ सर्व पापप्रणाशिनी ॥ करी पाषाण जिचे पाणी ॥ षण्मासात अस्थिसी ॥२६॥
ऐसे ऐकोनि धर्मराज ॥ संगे घेवोनि बंधु द्विज ॥ धौम्य आणि गरुडध्वज ॥ प्रजाजनांसह निघाला ॥२७॥
पुढे तुरंग उंट हत्ती ॥ भाट बिरुदावली गाती ॥ डंका दुंदुभि बहु वाजती ॥ झळके छत्र चामर ॥२८॥
अर्ध कोसावरी जयंती ॥ राया दिसे जणु अमरावती ॥ जेथे स्वधर्मे सर्व जाती ॥ दिसती दशरथपुत्रसे ॥२९॥
मग तेथोनि भरत पायी ॥ वेगे रामाकडे जा ॥ धर्म तैसा जावोनि पाही ॥ कृष्णाबाई माउली ॥३०॥
वारंवार लोटांगण ॥ तदा घाली धर्मनंदन ॥ सकल लोकही साष्टांग नमन ॥ करिती कृष्णेसी तेधवा ॥३१॥
करोनि आंघोळ यथाविधि ॥ म्हणे धौम्यासी उदारबुद्धि ॥ कवण दानासि पात्र आधी ॥ सांग मज गुरुवरा ॥३२॥
पात्रापात्र न पाहता ॥ दान दिधले म्या तत्वता ॥ ऐसे धौम्यासि विचारिता ॥ सांगे ज्ञाननिधि तो ॥३३॥
जगी म्हणावे दानशूर ॥ किंवा भीतीने दिधले अपार ॥ किंवा फेडणे परोपकार ॥ दान नोहे हे तरी ॥३४॥
नटनायक उपहासक ॥ मत्त उन्मत्त चिकित्सक ॥ चोर कुष्ठी नपुंसक ॥ यांस दान न द्यावे ॥३५॥
मुका खुजा जो पामर ॥ कडु कुळी जो जन्मला नर ॥ व्रतादिके जया न संस्कार ॥ दान तयाला न द्यावे ॥३६॥
कृष्णाचि तोषो अशा भावे ॥ दान सूज्ञे सदा द्यावे ॥ तया कृष्णार्पण म्हणावे ॥ हाव फळाची नसावी ॥३७॥
वेदवेत्ता जो श्रोत्रिय ॥ कुटुंबी तो दानयोग्य ॥ दात्यासि यापरी फळलाभ होय ॥ दोषहीन प्रतिग्रही ॥३८॥
ज्ञानी तपस्वी श्रीहरिभक्त ॥ दान द्यावया योग्य खचित ॥ पात्र नसता पातक प्राप्त ॥ उभयताला होतसे ॥३९॥
दगड बांधोनिया उदरी ॥ निघे पोहावया सागरी ॥ दान तैसे देता अपात्री ॥ दुःखासि कारण होतसे ॥४०॥
केला हत्ती लाकडाचा ॥ किंवा हरिण कातडियाचा ॥ तैसाचि ब्राह्मण जातीचा ॥ वेदशास्त्ररहित जो ॥४१॥
हरिचरणी जया भक्ति ॥ नाही अणुमात्र निश्चित्ती ॥ कैचा विप्र तो चांडाळमति ॥ पात्र दानासी होईल ॥४२॥
एक अक्षर ज्ञान जया ॥ नाही तया दान वाया ॥ देवोनि उपयोग काय राया ॥ षंढासि जेवी पद्मिणी ॥४३॥
जैसा निर्जल बांधिला कूप ॥ की भस्मी ओतिले तूप ॥ तैसा निरक्षर द्विज सुरूप ॥ तया दान व्यर्थची ॥४४॥
हव्य कव्य हरण करी ॥ केवळ आपुले उदर भरी ॥ कदा मुखासि नये हरी ॥ तो गा अपात्र जाणिजे ॥४५॥
जो का तीर्थयात्रा करी ॥ राहे सदा तीर्थतीरी ॥ भजे स्वधर्मा तयासि करी ॥ दान धर्मा प्रीतीने ॥४६॥
असत्य भाषण असे वमन ॥ त्यजिले जयाने तो ब्राह्मण ॥ जया अंतरी नारायण ॥ सदा दानासि पात्र तो ॥४७॥
धौम्य म्हणे गा धर्मराया ॥ पात्र यापरी पाहोनिया ॥ दान देता अनंत पुण्या ॥ लाधसी तू निश्चये ॥४८॥
ऐसे ऐकोनि युधिष्ठिर ॥ प्रत्येक विप्रा एकेक भार ॥ सुवर्णधेनुही देतसे फार ॥ करोनि पूजा भक्तीने ॥४९॥
तुष्ट व्हावे पितर म्हणोन ॥ करी विधियुक्त पिंडदान ॥ तुलापुरुष महादान ॥ धर्मनंदन करीतसे ॥५०॥
सर्भार्य बैसे एक पारडी ॥ सुवर्णरत्न दुजे पारडी ॥ वजन करोनि ते घरासि धाडी ॥ ब्राह्मणांचे तेधवा ॥५१॥
अश्व-गज-अन्न-दान ॥ नृप करिता येरही जन ॥ करिती आपुले शक्तीप्रमाण ॥ दान कृष्णातटी हो ॥५२॥
धौम्य द्रौपदी धर्मराय ॥ करिती स्वनामे तीर्थत्रय ॥ ब्रह्मादिवंद्य शंभुतनय ॥ म्हणे मुनिवरांसी ॥५३॥
पुरुष अवमान रुद्रसूक्ते ॥ करी अभिषेक शंभुलिंगाते ॥ करोनि शंखे गंध बिल्वाते ॥ वाहे धत्तूरपुष्पही ॥५४॥
धूप दीप सुनैवेद्य ॥ तांबूल दक्षिणा समंत्र अर्घ्य ॥ देवोनि रुक्मिणीप्राणप्रिय ॥ भूरिश्राद्ध करितसे ॥५५॥
भोजन कोटि ब्राह्मणांसि ॥ मुके आंधळे पांगळ्यांसी ॥ देवोनि वस्त्रकंबलासि ॥ तृप्त करी श्रीहरी ॥५६॥
जयंतीनगरी कृष्णातीरी ॥ राहोनि धर्मनृप यापरी ॥ क्षेत्रस्थ विप्रांसि दान करी ॥ तव मंत्री पातले ॥५७॥
नमन करोनि युधिष्ठिरा ॥ म्हणती सोडोनि हस्तनापुरा ॥ येथे येवोनि करुणासमुद्रा ॥ कैसा राहिलासि भूपते ॥५८॥
प्रजापालन राजधर्म ॥ हे का नेणसि शास्त्रवर्म ॥ करभार घेवोनि येर कर्म ॥ नरकासि कारण पार्थिवा ॥५९॥
मनु अंबरीष शिबि नल ॥ पृथु मांधातृ भूप नील ॥ प्रजापालनेचि हे केवळ ॥ तरले भवसमुद्रा ॥६०॥
तुझे प्रजेला परम दारुण ॥ त्रास देती चोरजन ॥ म्हणोनि हस्तनापुरा गमन ॥ करी आता येथुनी ॥६१॥
हेचि तप श्रेष्ठ जाण ॥ हाचि धर्म गा महान॥ हेचि परम असे ज्ञान जे का रक्षण प्रजेचे ॥६२॥
ऐसे ऐकोनि मंत्रिबोल ॥ अवश्य म्हणे तो भूमिपाल ॥ परी कृष्णाविरह केवळ ॥ सोसवेना तयासि ॥६३॥
कृष्णे दिले अनुमोदन ॥ परी कृष्णेसि सोडिना मन ॥ तदा होवोनिया खिन्न ॥ म्हणे धर्म मुनी हो ॥६४॥
मृत्यु येवोनि ठाकला जवळि ॥ तया जिरेना अमृतवल्ली ॥ तैसी येवोनि विघ्ने धडकली ॥ कृष्णातटी राहता ॥६५॥
आता मुनी हो काय मी करू ॥ ऐसे विचारी अजातशत्रु ॥ ऋषी म्हणती हाचि थोरू ॥ धर्म रक्षण प्रजेचे ॥६६॥
जे का श्रोत्रिय निरीच्छ असती ॥ गंगातटी जे वास करिती ॥ अन्नदाने तया रक्षिती ॥ भुपाल तुजसारिखे ॥६७॥
शिबी उंछवृत्ती बली ॥ दधीचि इयांनी कीर्ति केली ॥ निजशरीरे अतिथीस दिली ॥ परोपकारार्थ केवळ ॥६८॥
जो का कायावाचामने ॥ परोपकारी तयाचे जिणे ॥ धन्य तयाचे केवळ दर्शने ॥ मुक्त होती पातकी ॥६९॥
जेथे सदा परोपकार ॥ तेथेची काशी कुरुक्षेत्र ॥ यमुना कृष्णा गया पुष्कर ॥ सरस्वती त्रिपथगा ॥७०॥
तीर्थमहिमा प्रथम ऐकिजे ॥ नंतर तीर्थ हे सत्य जाणिजे ॥ मग तयाचे सेवन कीजे ॥ तीर्थवासी होय ते ॥७१॥
जलामाजि बेडूक मासा ॥ राहे सदा तीर्थवासा ॥ कदा न लाहे म्हणोनि जा कसा ॥ प्रजारक्षणाकारणे ॥७२॥
परिसोनि यापरी धर्मनंदन ॥ कृष्णेसि मग साष्टांग नमन ॥ कृपा असो दे ऐसे म्हणोन ॥ गेला हस्तनापुरासी ॥७३॥
म्हणे कार्तिक मुनिवरांसी ॥ शंखे अभिषेकिले शिवासी ॥ तेथे शंखतीर्थ ऐसी ॥ ख्याति जाहलीतदा हो ॥७४॥
धर्म द्रौपदी धौम्य शंख ॥ पवित्र ऐसे तीर्थचतुष्क ॥ जेथे स्नान करिता सुख ॥ मिळे इच्छित नरासी ॥७५॥
हा अध्याय श्रवण करा ॥ चुकवा जन्ममरणफेरा ॥ पुढे तीर्थे सांगेन तेरा ॥ म्हणे मुनिवरा कार्तिक ॥७६॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकावन्नवा अध्याय हा ॥७७॥
इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये तीर्थचतुष्कवर्णनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥