मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २६

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २६

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

लागता कृष्णापरिस हाती ॥ जे का प्रेमे घालिती कंठी ॥ तेचि सुवर्णयुक्त होती ॥ येर लोहचि जंगले ॥१॥

श्रवणासि टपले ऋषि सादर ॥ जैसे पाहता दूध मांजर ॥ देखोनि शिवाचा ज्येष्ठ कुमर ॥ म्हणे एकाग्र होवोनी ॥२॥

सर्वतीर्थापासाव धनु ॥ वीस असे जया प्रमाणु ॥ तेचि तीर्थ पिशाचमोचनु ॥ नसे अनुमानु किंचित ॥३॥

पुढे मांडव्यतीर्थ पहा ॥ अंतर जयाला धनुष सहा ॥ शांत जाहला मांडव्यदाहा ॥ जेथे स्नानेचि केवळ ॥४॥

पुढे असे गार्ग्यतीर्थ ॥ जे का पातका नष्ट करित ॥ ज्ञानदायक नंदितीर्थ ॥ तीर्थ अनंत तेथुनी ॥५॥

तेथे लिंग अनंतेश ॥ जयाचे दर्शने पापनाश ॥ तेथोनि पुढे तीर्थ आळस ॥ अति सुरस मुनी हो ॥६॥

जे कामुक शठ आळशी ॥ तयांनीही तीर्थ आळशी ॥ स्नान करिता पापराशी ॥ दहन हुताशी केलिया ॥७॥

दक्षतीर्थ ब्रह्मतीर्थ ॥ ऋषितीर्थ देवतीर्थ ॥ इष्टदायक राजतीर्थ ॥ अनर्थहारक मुनि हो ॥८॥

जेथे पश्चात्ताप होऊन ॥ दक्षराजा शिवपूजन ॥ करिता लाधला वरप्रदान ॥ राजतीर्थ तेचि हे ॥९॥

कृष्णेमाजी तीर्थलिंगे ॥ अनंत असती अतिसुरगे ॥ स्नाने जयांचिया पाप भंगे ॥ जन्मजन्मांतरींचे ॥१०॥

महालिंग कोपेश्वर ॥ जयाचे दर्शने मुक्त नर ॥ होतो म्हणोनि महिमा अपार ॥ शिवकुमार म्हणतसे ॥११॥

साठ धनुषे प्रमाण जया ॥ म्हणती मुक्तीतीर्थ तया ॥ तेथे न करिता स्नान वाया ॥ काया तया नराची ॥१२॥

मुक्तितीर्थी जया स्नान ॥ घडे कोपेश्वरपूजन ॥ तेचि दुर्लभ योगिया स्थान ॥ पावती कृष्णाप्रसादे ॥१३॥

ऐकोनि यापरी कार्तिकोक्ति ॥ म्हणे ऋषींची सकल पंक्ती ॥ कवण पावला तेथ मुक्ती ॥ सांग आम्हाप्रती कुमारा ॥१४॥

ऐसे ऐकून शिवनंदन ॥ सांगे कोपेश्वराख्यान ॥ करिता जयाचे श्रवणपठण ॥ जनन मरण नुरेचि ॥१५॥

नमिता सिद्ध सांख्येश्वरा ॥ बंकेश्वरा कोपेश्वरा ॥ भक्तीने पाहतांचि मुक्ति नरा ॥ वरावया येतसे ॥१६॥

ऐसा अतर्क्य महिमा ऐकुन ॥ एक होता पंगु ब्राह्मण ॥ अश्वारूढ तो सर्वेचि होऊन ॥ आला बंकेशासन्निध ॥१७॥

बंकेश्वराला नमोनि आधी ॥ पूजन करी मग यथाविधी ॥ अश्वे कोपेश देखोनि तधी ॥ देहउपाधी टाकिली ॥१८॥

देखोनि यापरी परम नवल ॥ तेथेचि राहिला तो पांगुळ ॥ अश्वासि न्यावया विमान धवल ॥ आले जवळ तयाचे ॥१९॥

अश्व होवोनि दिव्य वेष ॥ विमानी बैसता वाद्यघोष ॥ करीत नेला जेथ महेश ॥ भवानीसहित वसतसे ॥२०॥

यापरी देखोनि चकितमती ॥ होवोनि इंद्रादि देव म्हणती ॥ अहो पशुला परम गती ॥ कोपेशदर्शने जाहली ॥२१॥

ऐसे बोलोनि तदा सकळ ॥ गेले नारायणाजवळ ॥ कळवोनि वृत्ताम्त तो केवळ ॥ चला म्हणती तेथवरी ॥२२॥

अश्व जाहला मुक्त जेथ ॥ आले माधवासहित तेथ ॥ लिंग स्थापूनि नाम ठेवित ॥ अश्वेश्वर यापरी ॥२३॥

स्नान करोनि मुक्तितीर्थी ॥ कोपेश्वराते नमोनि चित्ती ॥ आनंदोनिया स्वर्गाप्रती ॥ गेले इंद्रादि सुरवर ॥२४॥

अश्वतीर्थी करिता तप ॥ दहन होय सकळ पाप ॥ अष्टसिद्धी आपोआप ॥ प्राप्त होती तयासी ॥२५॥

म्हणे शिवाचा ज्येष्ठ कुमर ॥ पुढे असे कुब्जेश्वर ॥ पौलस्त्यतीर्थ पौलस्त्येश्वर ॥ स्नाने पूजने वरद जो ॥२६॥

भक्तिपूर्वक कोपेशमहिमा ॥ ऐकता होय गति उत्तमा ॥ पुढिले अध्यायी फिरोनि तुम्हा ॥ सांगेन शुक्लतीर्थ हो ॥२७॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ षड्‌विंशोऽध्याय हा ॥२८॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये सर्वतीर्थवर्णनं नाम षडविंशोऽध्यायः ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP