श्रीगणेशाय नमः ॥
माझी मती द्राक्षवेली ॥ कृष्णादुधे ती वाढली ॥ गमली होती फुकट गेळी ॥ परी दुणावेल ही ॥१॥
अंबेसि पूजोनि ते तापसी ॥ आले भार्गवसुतीर्थासी ॥ जेथे अद्यापि भार्गव ऋषी ॥ करितो जपासि सकाळी ॥२॥
परम पावन तीर्थ भार्गव ॥ महिमा जयाचा अति अभिनव ॥ सांगे अमरसैन्यराव ॥ मुनिवरांसी भक्तीने ॥३॥
सकल देवांमाजि थोर ॥ ब्रह्मा विष्णू आणि शंकर ॥ तिघांमाजिही अत्यंत थोर ॥ देव कृपाघन कोणता ॥४॥
ऋषिसमाजामाजि प्रश्न ॥ यापरी निघाला अत्यंत गहन ॥ भृगुऋषी मग स्वये आपण ॥ निघे पहावयासि ॥५॥
कैलासपती सत्यराट् ॥ एक अज्ञ एक रागिट ॥ ऐसे देखोनि वैकुंठवाट ॥ धरी परीक्षक भृगुऋषी ॥६॥
तेथे दिव्य सिंहासन ॥ वरी बैसला रमारमण ॥ देखोनि यापरी उरी चरण ॥ हाणी भृगुमुनि हो ॥७॥
तदा टाकोनि खाली उडी ॥ विप्रा बसवी वर पार्थगडी ॥ आणि तयाचे पाय रगडी ॥ मांडिवरी घेउनी ॥८॥
भक्तवत्सल ब्राह्मणप्रिय ॥ म्हणे आजि मी धन्य धन्य ॥ ऐसा देवाधिदेव वंद्य ॥ पाहोनि भृगू निघाला ॥९॥
येवोनि ऋषिसमाजात ॥ म्हणे श्रेष्ठ एक रमानाथ ॥ अहो मारिली मी या लाथ ॥ परी शांत देव तो ॥१०॥
ऐसी भृगूची ऐकोनि बोली ॥ म्हणे तयाला ऋषिमंडळी ॥ साक्षात अच्युत तया मारिली ॥ लाथ कैसा पवित्र तू ॥११॥
जयाचे ऐकता भक्तचरित्र ॥ पापवर्तता होय वज्र ॥ तया मारिता लाथ रे विप्र ॥ अससी कैसा पवित्र तू ॥१२॥
यापरी परिसोनि मुनिभाषण ॥ नमोनि म्हणतसे भृगुब्राह्मण ॥ चुकलो सांगा कृपा करून ॥ पावन व्हावया उपाव ॥१३॥
तदा म्हणती मुनि ऐक ॥ कृष्णावेणीमाजि एक ॥ तीर्थसंगम विश्वतारक ॥ तेथ जावोनि पूत हो ॥१४॥
कृष्णादर्शनास्नानपान ॥ तटी करिता तप दारुण ॥ पाप जावोनि तीर्थाभिधान ॥ भृगु ऐसेचि होईल ॥१५॥
ऐकोनि यापरी तो ब्राह्मणू ॥ जावोनि करिता तपा विष्णू ॥ आला पाहोनि करी पूजनु ॥ भृगू परम प्रीतीने ॥१६॥
निष्पाप जाहलासि हे बोलून ॥ विष्णु पावला अंतर्धान ॥ ऐकता पठता हे आख्यान ॥ नष्ट होती पातके ॥१७॥
आता पुढे जंबुतीर्थ ॥ महिमा तयाचा अत्यदभुत ॥ सांगेल पार्वतीचा सुत ॥ सकळ मुनिवरांसी ॥१८॥
कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ अठ्ठेचाळिसावा अध्याय हा ॥१९॥
इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये भार्गवतीर्थवर्णनं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥४८॥