मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५७

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५७

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.

श्रीगणेशाय नमः ॥

टवटवी जैसी कैरवाला ॥ येते देखता कुमुदबंधूला ॥ तैसे कृष्णे पाहता तुजला ॥ होईन विकसित दास मी ॥१॥

स्कंद बोले मुनिवराते ॥ पूर्वी कथिले देवतीर्थाते ॥ आता ऐका एकाग्रचित्ते ॥ तीर्थ सप्तर्षि नामक ॥२॥

स्नान जेथे करिता नरे ॥ बुद्धिमंदता परिहरे ॥ पुढे जावोनि विश्वामित्रे ॥ केले तप दुर्धर ॥३॥

तदा कृष्णा होवोनि तुष्ट ॥ पुढे तयाचे जाहली प्रगट ॥ सकल हराया भक्तकष्ट ॥ श्यामवर्णा वैष्णवी ॥४॥

शंख पद्म गदा चक्र ॥ हाती देखोनि जगन्मित्र ॥ उठोनि अंगी रोम सर्वत्र ॥ स्तोत्र नमोनि करीतसे ॥५॥

जय जय संसारभयनाशिनी ॥ जगन्माते नारायणी ॥ जय जय परब्रह्मरूपिणी ॥ कृष्णावेणी पाहि मा ॥६॥

तूचि भक्ता आधार अससी ॥ म्हणोनि बोलती तुज भूमिसी ॥ तूचि अग्नी पाप जाळिसी ॥ कृष्णावेणी पाहि मां ॥७॥

अंतर्यामी तूचि मन ॥ तूचि उदक तापशमन ॥ तूचि आकाश महाप्राण ॥ कृष्णावेणी पाहि मां ॥८॥

दुरोनि करिता तुझे स्मरण ॥ पापसमूह निवारण ॥ इष्ट फलद तुझे स्नान ॥ कृष्णावेणी पाहि मां ॥९॥

तुझे तीरी जे स्थावर ॥ किंवा पक्षी जनावर ॥ नसे तयाही मुक्ति दूर ॥ कृष्णावेणी पाहि मां ॥१०॥

अहो माते तुझे तीरी ॥ राहोनि जन्मजन्मांतरी ॥ मुखी यावे रामहरी ॥ कृष्णावेणी पाहि मां ॥११॥

पोटी अपराध सर्व घालुनि ॥ कृपा करीहो भक्त जननी ॥ नमन करितो तुझे चरणी ॥ कृष्णावेणी पाहि मां ॥१२॥

स्तविता यापरी ती जगदंबा ॥ तोषोनि म्हणे वर माग बा ॥ येरू म्हणे विषयकदंबा ॥ पासोनि मुक्त मज करी ॥१३॥

ऐसे ऐकोनि म्हणे तथास्तु ॥ जेणे स्तविता झालासि मज तू ॥ तेणे स्तविती जे मनात किंतु ॥ आणोनि ते प्रिय मज ॥१४॥

बोलोनि यापरी भक्तमाउली ॥ तात्काळ तेथेचि गुप्त जाहली ॥ वस्ती विश्वामित्रेही केली ॥ तये ठायी मग पुढे ॥१५॥

तेचि विश्वामित्रतीर्थ ॥ पुढे ऋष्यश्रृंगतीर्थ ॥ तेथोनि कर्कटिकातीर्थ ॥ जेथे स्नानेचि विमुक्ति ॥१६॥

तीर्थलिंग लवण तट ॥ स्नान करोनि नीलकंठ ॥ डोळा देखता जाय नीट ॥ श्रीकंठलोका भक्त तो ॥१७॥

पुढे कृष्णेसि भीमरथी ॥ करी येवोनि संगती ॥ जेथे स्वयंभू पशुपती ॥ संगमेश प्रसिद्ध ॥१८॥

भीमाकृष्णासंगमेसी ॥ स्नान करोनि संगमेशासी ॥ पूजिता दग्ध पापराशी ॥ रुद्रलोकासि जातसे ॥१९॥

पुढे गिरित्रय जयानाव ॥ तेचि तीर्थ आणि देव ॥ स्नाने पूजने जेथ मानव ॥ ब्रह्मलोकासि जातसे ॥२०॥

पुढे लवणभेदतीर्थ ॥ लवणनामासुर जेथ ॥ म्हणे कृष्णेसि कुंठित ॥ करीन आपुले शरीरे ॥२१॥

ऐसा करोनि विचार मनी ॥ असुर पर्वत शीघ्र होवोनि ॥ गर्जना करीत येताक्षणी ॥ महाविष्णुने देखिला ॥२२॥

सवेंचि घेवोनि कृष्णोदक ॥ पर्वतावरी फेकिता देख ॥ होय दुभंग तात्काळिक ॥ प्रगटे असुर तेधवा ॥२३॥

हस्त जोडोनो श्रीविष्णूसी ॥ कृष्णेसि नमोनि करी स्तुतीसी ॥ लाधोनि वर जाय स्वर्गासी ॥ कृष्णकृष्णाप्रसादे ॥२४॥

ऐसे लवणभेदतीर्थ ॥ स्नाने जेथिंचे वैकुंठनाथ ॥ तुष्ट होवोनि मनोरथ ॥ पूर्ण करी सकळही ॥२५॥

पुढे कृष्णा तुंगभद्रा ॥ संगम असे अतिगोजिरा ॥ स्नान जेथे करिता नरा ॥ पापवारा न लागे ॥२६॥

ब्रह्मी निर्मिला ब्रह्मेश्वर ॥ तया पूजोनि संगमावर ॥ सप्त जन्मींचे पाप दूर ॥ करो नर मुक्तिही ॥२७॥

संगमी करिता स्नान एक ॥ जे का कायिक पाप वाचिक ॥ नष्ट होयही मानसिक ॥ चित्त निःशंक असावे ॥२८॥

सूर्यग्रहणी संगमावरी ॥ जावोनि जो का स्नान करी ॥ त्रिदिन भक्तिने जप करी ॥ गायत्रीचा जो नर ॥२९॥

ब्रह्मलोकासि तो जाय ॥ संगममहिमा यापरी होय ॥ म्हणे शिवाचा ज्येष्ठ तनय ॥ पुढे लिंगतटतीर्थ हो ॥३०॥

मध्ये तयाचे भीमेश्वर ॥ प्रथम तयाते पूजिता नर ॥ कृष्णकृष्णेसि तुष्टिकर ॥ तोचि होय मुनी हो ॥३१॥

याचि विषयी एक कथा ॥ ऐका करोनि एकचित्ता ॥ जेणे अखंड सायुज्यता ॥ होय भक्तासि निश्चये ॥३२॥

कृष्णातटासि वासुदेव ॥ गेला एकादा सहपांडव ॥ द्वापारयुगी तीर सर्व ॥ पाहत पाहत चालिला ॥३३॥

आला भद्रासंगमासी ॥ देखोनि हर्षिला अति मानसी ॥ आणि बोले युधिष्ठिरासी ॥ तीर्थ वैराग्यमूळ हो ॥३४॥

संगमेशा देखता डोळा ॥ पुरे सर्व मनाचा सोहळा ॥ येरू म्हणे गा भक्तपाळा ॥ ज्ञानदायक तीर्थ हे ॥३५॥

सिद्ध लिंग सबीजक ॥ येथे स्थापिता पुण्य अधिक ॥ होईल ही हो काशीच एक ॥ यत्‍नाविणे केशवा ॥३६॥

ऐकोनि ऐसे वायुनंदन ॥ म्हणे लिंगासि मी आणीन ॥ परि कोठोनि हे आपण ॥ सांगा मज उभयता ॥३७॥

तदा धर्महरी त्यासी ॥ म्हणती जावोनि वाराणशीसी ॥ पुराण पूजायोग्य आणिसी ॥ तरी होईल बहु बरे ॥३८॥

आजपासोनि द्वादश दिनी ॥ द्वादश मुहूर्ती ते आणुनि ॥ स्थापन करिता धन्य जननी ॥ तुझी निश्चये होईल ॥३९॥

बरे बोलोनि भीमसेन ॥ वाराणसीप्रती करी गमन ॥ थोरलिंग ते स्कंधी घेऊन ॥ तेथोनि परते मागुता ॥४०॥

इकडे धर्म म्हणे देवा ॥ कसा पातला दिवस बारावा ॥ मुहूर्त जाईल हा बरवा ॥ भीम अद्यापि नयेचि ॥४१॥

कृष्ण म्हणे तो चिंचवृक्ष ॥ मूळ तयाचे अत्यंत शुष्क ॥ स्थापा आणोनि मज समक्ष ॥ विप्रवर्गाकरवि हो ॥४२॥

परिसोनि यापरी ते पांडव ॥ आणोनि लिंग ते अभिनव ॥ स्थापन करविती धरोनि भाव ॥ तव अद्‌भुत वर्तले ॥४३॥

भीम दोनशे वीस कोस ॥ चालोनि रस्ता कृष्णातटास ॥ येवोनि पाहता तत्कृतीस ॥ अति संतप्त जाहला ॥४४॥

अहो कृष्णा काय हे केले ॥ ऐसे बोलोनि आपुले बळे ॥ नदीमाजि लिंग फेकिले ॥ बोले श्रीहरी तेधवा ॥४५॥

कालातिक्रम तुवा केला ॥ म्हणोनि स्थापिले काष्ठ लिंगाला ॥ केलेसि तू तरी साहसाला ॥ भला भलारे भीमजी ॥४६॥

आता शांत करी राग ॥ भीमसेना तुझे लिंग ॥ होईल फणा धरील त्यावर नाग ॥ न धरी संदेह मानसी ॥४७॥

जो का प्रथम पूजोनि त्याते ॥ नंतर मी स्थापिले ते ॥ तोचि पावे पूजाफलाते ॥ व्यर्थ नातरी जाणिजे ॥४८॥

पापनाशक हे चरित्र ॥ नांदे ऐकता सभार्य पुत्र ॥ मल्लिकार्जुन कथा पवित्र ॥ पुढे श्रवण करा हो ॥४९॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ सत्तावन्नावा अध्याय हा ॥५०॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये लिंगतटतीर्थवर्णनं नाम सप्तपंचाशत्तमोऽध्यायः ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP