श्रीगणेशाय नमः ॥
जरी कृष्णागस्त्य जपी ॥ दुरावेल पापवातापी ॥ पुनीत होय महापापी ॥ पिता तीर्थ कृष्णेचे ॥१॥
देखोनि ऋषींची उत्साहशक्ति ॥ स्कंद म्हणे ऐका पुढती ॥ शकुंततीर्थाची महा ख्याति ॥ अति रसिक कथा हे ॥२॥
रथंतरकल्पी अति उदार ॥ निचूल नामे ऋषीश्वर ॥ तयाचे पहाया सत्त्व इंद्र ॥ आला पक्षिस्वरूपी ॥३॥
म्हणे गिधाड निचूलाला ॥ भूक लागली अति मला ॥ देई मज नरमांसाला ॥ दीन दयाळा नुपेक्षी ॥४॥
ऐकोनि ऋषि ती विनंति ॥ शीघ्र पाचारी पुत्राप्रति ॥ म्हणे माझी पुण्यसंतती ॥ तुम्ही आहा निश्चये ॥५॥
देऊनिया स्वमांसासी ॥ तोषवावे अतिथीसी ॥ परिसोनिया भारती ऐसी ॥ सूत म्हणती तयाते ॥६॥
जे का असे धर्मसाधन ॥ स्वर्गमोक्षासि कारण ॥ ते हे गोमटे लाडके तन ॥ कैचे अर्पण करावे ॥७॥
ऐसी ऐकोनि पुत्रवाणी ॥ कोपोनि बोले तदा मुनि ॥ तुम्ही पावाल पक्षीयोनि ॥ आज्ञोल्लंघने माझिया ॥८॥
नश्वर असे हे कलेवर ॥ ऐसा नाही केला विचार ॥ माझे वचनी अनादर ॥ तेणे स्मरण न राहे ॥९॥
यापरी शापोनि पुत्रांसी ॥ स्वमांस द्यावया उद्युक्त ऋषि ॥ झाला तव गृध्रपक्षी ॥ म्हणे ऋषीसि इंद्र मी ॥१०॥
तुझे सत्त्व पहावया ॥ पक्षी जाहलो विप्रराया ॥ नको छेदू आपुली काया ॥ वाया सात्विक उदारा ॥११॥
ऐसे गोडही इंद्रवचन ॥ ऐकोनि कोपला तो ब्राह्मण ॥ म्हणे तुवाहि शकुंत होऊन ॥ संवत्सरशत रहावे ॥१२॥
अगस्त्याची होईल भेटी ॥ तेधवा होय शापमुक्ति ॥ ऐकतांचि ऐसी उःशापोक्ति ॥ शकुंत जाहला सुरेंद्र ॥१३॥
आकाशपंथी एकदा उडत ॥ असता देखिला अगस्त्य अवचित ॥ तया करोनि दंडवत ॥ शकुंत म्हणे ते काळी ॥१४॥
दुःखसागरी बुडालो मी ॥ यासी कारण निचूल स्वामी ॥ आलो शकुंतचि या जन्मी ॥ कृमिभक्षक जाहलो ॥१५॥
परी देखिली चरणनौका ॥ होईन मुक्त आता निका ॥ तारि तारि या बाळका ॥ कृपा करी झडकरी ॥१६॥
ऐसे विनवित अगस्त्यासी ॥ दया उपजली शीघ्र मानसी ॥ म्हणे कृष्णातटी तपासी ॥ करिता होसी मुक्त तू ॥१७॥
सांगताचि ऐसे अगस्त्यमुनि ॥ शकुंत निघाला तेथुनी ॥ आला कृष्णातटी मनी ॥ ध्यान करीत कृष्णेचे ॥१८॥
सदा कृष्णांबुसेवन ॥ सदाशिवाचे करी चिंतन ॥ ऐसे करिता तप दारुण ॥ प्रसन्न जाहला धूर्जटि ॥१९॥
पंचवदन चंद्रमौळी ॥ देखोनि बोले चरणकमळी ॥ अंजुळि जोडोनिया जवळी ॥ उभा ठाकला शकुंत ॥२०॥
होता शिवाची कृपादृष्टि ॥ मुक्त जाहला शचीपति ॥ म्हणे देवा उमापति ॥ एक विनंति परिसावी ॥२१॥
माझिये नामे असावे तीर्थ ॥ तुवाही वसावे शकुंतेश येथ ॥ बरे बोलोनि पार्वतीनाथ ॥ राहिला तेथ अक्षय ॥२२॥
कोटितीर्थापासून दूर ॥ चार सहस्त्र धनुषांवर ॥ शकुंततीर्थ परमपवित्र ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥२३॥
चतुर्दशी वैशाख कृष्ण ॥ शकुंततीर्थी करावे स्नान ॥ शकुंतेश्वरा अभिषेचन ॥ घृते भक्तीने करावे ॥२४॥
सुगंध चंदन कुंकुमेसी ॥ तंदुल शतपत्रबिल्वेसि ॥ पूजोनिया महेशासी ॥ गुग्गुल धूपासि जाळावे ॥२५॥
प्रातःकाळी दर्शदिनी ॥ शकुंततीर्थी स्नान करोनी ॥ तृप्त करिता विप्र भोजनी ॥ कैलासभुवनी जाय तो ॥२६॥
श्रवण नक्षत्र सोमवारी ॥ शकुंततीर्थी स्नान करी ॥ शकुंतेश्वराची पूजा करी ॥ पाप संहारी आपुले ॥२७॥
हा अध्याय भक्तिपूर्वक ॥ श्रवण करिता पापमोचक ॥ अंती जोड महेशलोक ॥ शकुंतेशकृपेने ॥२८॥
पुढले अध्यायी कथा उत्तम ॥ कृष्णावेणासंगम ॥ दुःखतप्तासि हा आराम ॥ विश्राम घ्यावया होईल ॥२९॥
कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ सप्तदशोऽध्याय हा ॥३०॥