श्रीगणेशाय नमः ॥
जयजय करुणारससमुद्रे ॥ भक्तमानसचकोरचंद्रे ॥ कृष्णावेणि हो ज्ञानसमुद्रे ॥ नमन चरणी तूझिये ॥१॥
म्हणे ऋषीला अग्निसुत ॥ तीर्थे कृष्णेत असंख्यात ॥ परी याज्ञवल्क्याप्रत ॥ जी का उत्तंक कथीतसे ॥२॥
तीच विख्यात अतिपवित्र ॥ तुम्हा सांगतो तच्चरित्र ॥ जया ऐकता इह परत्र ॥ सुख सर्वत्र होतसे ॥३॥
व्यासतीर्थ जे अतिपावनू ॥ तयापासाव सहा धनू ॥ ब्रह्मतीर्थ जे स्नान पानू ॥ करिता ब्रह्मत्व देतसे ॥४॥
पुढे धनुषे पाच प्रसिद्ध ॥ तीर्थ वालखिल्याभिध ॥ महिमा तयाचा अति अगाध ॥ ऐक सावध मनाने ॥५॥
वालखिल्य मुनिवर ॥ तप करिती धुरंधर ॥ ते होय पापाद्रिवज्र कठोर ॥ दारुण क्रौंच म्हणतसे ॥६॥
वालखिल्यतीर्थामधी ॥ स्नान करोनि यथाविधी ॥ करी जो का ब्रह्मयज्ञादी ॥ लाधे वैकुंठभुवन तो ॥७॥
असे शुकतीर्थ तयापुढे ॥ स्नाने जयाचे पुण्य जोडे ॥ दर्शन साधुत्व रोकडे ॥ कीर्ती वाढे दिगंती ॥८॥
विकट तयाचे तीर्थ अपार ॥ जया नरहरी म्हणती नर ॥ जेथ तप करी पराशर ॥ मनी नरहरी आणुनी ॥९॥
प्रसन्न होवोनि वरप्रदान ॥ द्यावया आला सिंहवदन ॥ देखोनि पराशर साष्टांग नमन ॥ करी परम भक्तीने ॥१०॥
निघती मुखापासाव ज्वाला ॥ हाले जिव्हा लळलळा ॥ देखोनि यापरी नरहरीला ॥ करी स्तुतीला मुनिवर० ॥११॥
जयजयाजी एकसुंदरा ॥ निरंजना नतसुरासुरा ॥ पादपद्मी लीन इंदिरा ॥ कृष्णातटस्था नरहरे ॥१२॥
भक्तपालका जगन्नाथा ॥ पदी ठेविला तुझे माथा ॥ तूचि आमुचा दुःखहंता ॥ कृष्णातट० ॥१३॥
टाकोनि कोपासि धरी शांतता ॥ अमृतदृष्टीने पहा आता ॥ आम्हा तुजवीण कवण त्राता ॥ कृष्णातट० ॥१४॥
ऐसे करोनिया स्तवन ॥ ज्वालानृसिंह नामाभिधान ॥ ठेवी सप्रेम होऊन ॥ नरहरीचे तेधवा ॥१५॥
दयासागर पराशराला ॥ म्हणे तदा या तीर्थीच मला ॥ करी स्थापन याचि वेळा ॥ शांती लाधेन निश्चये ॥१६॥
नाही तरी मम कोपानल ॥ सकळ त्रैलोक्य हे जाळील ॥ परिसोनि यापरी आज्ञे केवळ ॥ स्थापी पराशर तयासी ॥१७॥
ज्ञानदात्री नृसिंहमुर्ती ॥ राहे कृष्णातटी मग ती ॥ मानी पराशर मनी खंती ॥ तिचे वियोगे तेधवा ॥१८॥
मनी ठेवोनि मग तियेला ॥ तीर्थासि पाहत मुनी गेला ॥ उत्तंक याज्ञवल्क्याला ॥ सांगे यापरी मुनी हो ॥१९॥
ऐकोनिया तीर्थथोरी ॥ याज्ञवल्क्य तोषला भारी ॥ उत्तंक मुनीसह कृष्णातीरी ॥ तीर्थे पहाया निघाला ॥२०॥
सागरापर्यंत सकळ तीर्थे ॥ पाहोनि गेले निज आश्रमाते ॥ ऐकेल जो या चरित्राते ॥ हरिकृपेचे पात्र तो ॥२१॥
पुढिले अध्यायी कथारस ॥ पाजील कार्तिक मुनिजनांस ॥ पुरतील ऐकता सकळ सोस ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥२२॥
कृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति अखंड ॥ बेचाळिसावा अध्याय हा ॥२३॥
इति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये ज्वालानृसिंहवर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥४२॥