मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय १४

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १४

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

भजा भजा हो तुम्ही कृष्णा ॥ अंती होईल सर्व मृत्स्ना ॥ सोडोनिया संसारतृष्णा ॥ पान करा कृष्णेचे ॥१॥

नारद म्हणे भद्रेश्वर ॥ तेथोनि दोन दंडसहस्त्र ॥ पावनीगंगासंगम पवित्र ॥ तीर्थ श्रेष्ठ जाहले ॥२॥

तेथे करिता स्नान दान ॥ मनोरथ होतील सकल पूर्ण ॥ तेथोनि द्विदंडसहस्त्र प्रमाण ॥ तीर्थ पावन गोष्पद ॥३॥

ऐकोनिया ऋषींची मांदी ॥ म्हणे कैसे ते सांग आधी ॥ नामाभिधान महिमा गोष्पदी ॥ छेदी संशय आमुचा ॥४॥

नारद म्हणे स्वायंभुव ॥ कल्प असता सर्पराव ॥ वासुकी असे जया नाव ॥ सत्यवती जाया तयाची ॥५॥

असे तियेसी पुत्रशत ॥ दिव्यरूपी बलवंत ॥ किरीटकुंडल विराजित ॥ सुतपादि नामे तयांची ॥६॥

हाटकेश्वराचे नित्य पूजन ॥ करिती सत्यवतीनंदन ॥ एकदा कराया हाटकी स्नान ॥ हिमनगबाळी पातली ॥७॥

रूप पाहोनि तिचे सुंदर ॥ विषधर झाले कामातुर ॥ ऐसे पाहोनि नंदिकेश्वर ॥ धिःकार करी तयांचा ॥८॥

होईल तुमचे वंशछेदन ॥ ऐसा ऐकता शापगहन ॥ दीन होऊन नंदीचरणा ॥ धरोनि शरण बोलती ॥९॥

दया येऊनि म्हणे नंदी ॥ ब्रह्मलोकी याचि संधी ॥ वासुकी जरी जावोनि वंदी व गोविंदनंदन सर्प हो ॥१०॥

तरी ब्रह्माज्ञे येतील गाई ॥ जेथे वसे कृष्णाबाई ॥ स्त्राव करतील तिये ठायी ॥ जीवदायी ते जल ॥११॥

ऐसे ऐकोनि नंदीवचन ॥ मृतप्राय झाले सर्पजन ॥ पिता पाहोनि अश्रुनयन ॥ हाटकेशानस्तवन करी ॥१२॥

जयजयाजी पार्वतीवरा ॥ पन्नगभूषणा दीनोद्धारा ॥ मृत्युंजया रुद्रशंकरा ॥ कर्पूरगौरा पिनाकी ॥१३॥

त्राहि त्राहि परमेश्वर ॥ हाटकेशा चंद्रशेखर ॥ ऐसे वदोनि नमस्कार ॥ वारंवार करितसे ॥१४॥

ऐशी ऐकोनि सर्पस्तुति ॥ संतोष पावला पशुपति ॥ म्हणे माग असे चित्ती ॥ आर्ती पुरवीन ये काळी ॥१५॥

परिसोनिया अमृताक्षर ॥ वासुकी म्हणे जिवंत पुत्र ॥ होवोनि शांत धर्मपर ॥ भक्तिसुरत करी गा ॥१६॥

तदा बोले शूलपाणि ॥ जावे तुवा ब्रह्मसदनी ॥ मस्तक ठेवोनि चरणी ॥ कमलयोनि भजावा ॥१७॥

तुष्ट होता गोविंदसूनू ॥ देईल तुज कामधेनू ॥ ज्या का असती सुवर्णवर्णू ॥ मेरुसानूवरी त्या ॥१८॥

तया आणिता कृष्णातीरी ॥ अमृतस्त्राव करील भारी ॥ तेचि कृष्णासुधा वारी ॥ दुःख वारील मनीचे ॥१९॥

ऐसे ऐकोनि शंभुवचन ॥ कृष्णातटी आणि गोधन ॥ अमृतासह कृष्णाजीवन ॥ तेथूनि वाहू लागले ॥२०॥

गाई स्थिरावल्या जेथ ॥ तेचि जाहले गोष्पदतीर्थ ॥ सुवर्णेश शिव तेथेचि पूजित ॥ नागनाथ भावेसी ॥२१॥

त्रिकाल पूजिता इंदुमौली ॥ कृष्णामृत जाय रसातळी ॥ नागसंतती जिवंत जाहली ॥ आनंदली मातापिता ॥२२॥

अहो ऋषींस म्हणे नारद ॥ धन्य धन्य तीर्थ गोष्पद ॥ मृत्युनिवारक जे औषध ॥ सर्पसुखद होई जे ॥२३॥

च्यवनाश्रमाचे पश्चिमेसी ॥ पवनाश्रमाचे पुर्व दिशेसी ॥ गोष्पदतीर्थ पापनाशी ॥ देत सिद्धी इच्छीली ॥२४॥

कार्तिकेसि येता कृत्तिका ॥ वैशाखी आल्या विशाखा ॥ मध्यरात्री अग्निशिखा ॥ लिंगाकार भासत ॥२५॥

इष्टापूर्त द्विजतर्पण ॥ सदा करी शिवचिंतन ॥ त्यासचि होय ते दर्शन ॥ आन जना न होय ॥२६॥

गोष्पदी करी जो श्राद्ध हिरण्य ॥ तया जोडे अमित पुण्य ॥ कामधेनूचे मिळे स्तन्य ॥ घृत मधु पितरांसी ॥२७॥

गोष्पदी गोदान कार्तिकी ॥ करिता वंश होय सुखी ॥ गोहत्यादि पापे निकी ॥ नष्ट करी श्रीकृष्णा ॥२८॥

कार्तिकेसि दीपोत्सव ॥ सुवर्णेशा करी जो मानव ॥ वंशी तयाचे अभिनव ॥ ठाव लक्ष्मी देतसे ॥२९॥

गोष्पदी करिता ब्राह्मणभोजन ॥ जप होम वस्त्रदान ॥ जोडोनिया ब्रह्मसदन ॥ अक्षय कल्याण मेळवी ॥३०॥

भक्तिपूर्वक मनुज जरी ॥ गोष्पदमहिमा श्रवण करी ॥ होता सुवर्णेश कृपा तरी ॥ मोक्ष करी तयांच्या ॥३१॥

पुढले अध्यायी चंद्रिकामहिमा ॥ नारद सांगेल द्विजोत्तमा ॥ कृष्णातटी मुक्त चंद्रमा ॥ द्वैमातुरप्रसादे ॥३२॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ती तेणे अखंड ॥ चतुर्दशोऽध्याय हा ॥३३॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये गोष्पदतीथवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP