मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ५४

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ५४

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

पातकी जरी कैसा चांडाळ ॥ पुनीत करी पाहतांचि केवळ ॥ ती ही कृष्णा भक्तवत्सल ॥ मम निर्मळ मन करो ॥१॥

पूर्वाध्यायी घटपानदी ॥ कृष्णेसि मिळाली ऐसे सुबुद्धी ॥ सांगोनि ऋषींचे चरण वंदी ॥ कृष्णावेणीचे भक्तीने ॥२॥

उठोनि अंगी अष्टांगभाव ॥ पुनरपि म्हणे तो चमूराव ॥ ऐका मुनी हो तीर्थवैभव ॥ चित्त एकाग्र करोनि ॥३॥

ऋणमोचन तीर्थ पावन ॥ जेथे करिता स्नानदान ॥ देव पित्रर्षींचे ऋण ॥ नष्ट होते निश्चये ॥४॥

पापनाशक शूर्पालक्षेत्र ॥ जेथे अश्वत्थ वृक्ष पवित्र ॥ विष्णुरूपी शुभ चरित्र ॥ माहेर भक्तजनांचे ॥५॥

तयाचे वामभागी नर ॥ अस्थीसी टाकिता कुलोद्धार ॥ करी जेथिचे कृष्ण विप्र ॥ स्त्रिया प्रत्यक्ष रुक्मिणी ॥६॥

जेथे करिता त्रिरात्र वास ॥ अश्वमेधीय पुण्य खास ॥ अस्थि जेथिंचे सहा मास ॥ होता होती शंखचि ॥७॥

अश्वत्थरूपी जेथ विष्णु ॥ तेचि जाणिजे तीर्थविष्णु ॥ ऋणमोचन दहा बाणू ॥ तेथोनि म्हणे कार्तिक ॥८॥

मरे न फेडिता घेतले ऋण ॥ तरी भोगे नरक दारुण ॥ पुढे पश्वादि जन्म घेऊन ॥ भोगे अनंत यातना ॥९॥

दैवे लाधोनि मनुष्यदेहा ॥ पातला जेथे मलापहा ॥ कृष्णेसि मिळाली तेथ लोहा ॥ परिससंगसा होय तो ॥१०॥

कृष्णेचिया उभयतीरी ॥ क्षेत्र जे का योजनावरी ॥ सह्या पर्वत सागरांतरी ॥ तेही विमुक्तिद जाणिजे ॥११॥

कोणतेही ठायी वनी ॥ गावी अथवा जरी प्राणी ॥ स्नान करी कृष्णाजीवनी ॥ तरी अश्वमख फळ असे ॥१२॥

कन्यागती सोमवारी ॥ स्नान केले हरिवासरी ॥ कोटि जन्मींचे पाप वारी ॥ अंधकारीसुत म्हणे ॥१३॥

साठ सहस्त्रे वरुषे जरी ॥ भागीरथीचे स्नान करी ॥ कृष्णावेणीचे एकचि जरी ॥ कन्यागती तरी पुण्य सम ॥१४॥

कन्येसि येता वाचस्पती ॥ श्रवण सोमी श्राद्ध करिती ॥ तया पुण्यासि नाही मिती ॥ मुक्त होती पितृगण ॥१५॥

जेथे मलापहासंगम ॥ तेथे स्नानेचि पुण्य परम ॥ जरी असेल अधमाधम ॥ तरी जन्मासि न ये तो ॥१६॥

याचिविषयी पुरातन ॥ इतिहास ऐका देवोनि मन ॥ दाल्भ्यनामे एक ब्राह्मण ॥ भोजन अतिथीस देतसे ॥१७॥

परी अन्न जे का आणिले उसने ॥ मरण पावला ते फेडिल्याविणे ॥ कोल्हा जाहला दाल्भ्य तेणे ॥ सह्यगिरीवर मुनी हो ॥१८॥

पुनरपि जाहला तो लांडग ॥ कोल्हा होय मग परी स्मृति गा ॥ होती तया जो सदा जागा ॥ होता तपासी म्हणोनि ॥१९॥

उद्विग्न होवोनि मनी चिंती ॥ काय करु या ऋणा निष्कृती ॥ आला कृष्णानदीतटी ॥ तव गौतम देखिला ॥२०॥

कोल्हा तयाचे जावोनि जवळी ॥ लीन जाहला पादकमळी ॥ गौतम म्हणे तये वेळी ॥ तू दाल्भ्य जाणिले ॥२१॥

तुवा पराचे घेतले ऋण ॥ ते न फेडिले म्हणोनि गहन ॥ दुःख भोगिसी याचि कारण ॥ कृष्णास्नान करि बा ॥२२॥

कृष्णास्नाने मुक्त होसी ॥ कोठे करावे जरी म्हणती ॥ तरी सांगतो ऐक तुजसी ॥ गौतमऋषी म्हणतसे ॥२३॥

जेथे जेथे असे कृष्णा ॥ तेथे करिता भक्तीने स्नाना ॥ पुण्य जे का सर्व दाना ॥ देता तेचि यासही ॥२४॥

अमा पौर्णिमा अष्टमीसी ॥ चंद्रसूर्यग्रहणदिवशी ॥ स्नान करिता कृष्णावेणिसी ॥ गोसहस्त्र फळ असे ॥२५॥

देवामाजि जसा विष्णू ॥ थोर वर्णात की ब्राह्मणु ॥ तैसी बापा कृष्णावेणू ॥ नदीमाजी श्रेष्ठही ॥२६॥

पिती कृष्णोदका किडे ॥ की जो कृष्णातटी पहुडे ॥ तेही पावती फळ रोकडे ॥ तपोनिष्ठासिही जे ॥२७॥

कृष्णावेणीचा महिमा असा हा ॥ विशेष जेथे मलापहा ॥ मिळे तियेसी तेथेचि अहा ॥ काय वानु पुण्य मी ॥२८॥

ब्रह्मदेवे शापशांती ॥ व्हावी म्हणोनि जियेप्रती ॥ निर्मिली तीही विमलकीर्ती ॥ मलापहा सह्यजा ॥२९॥

जेथे जाहला उभयसंगम ॥ तेथेचि जावे हे उत्तम ॥ स्नान करोनि देवोत्तम ॥ गौरिपति मग नमावा ॥३०॥

म्हणे रे पशुरूप नष्ट होवोनि ॥ फिरोनि होसील दाल्भ्य मुनी ॥ मोक्षजननी कृष्णावेणी ॥ कृपा करील तुजवरी ॥३१॥

संगमी करिता पिंडदान ॥ किंवा सतिल जलतर्पण ॥ संतुष्ट होती पूर्वजगण ॥ भुक्तिमुक्तीसि देति ते ॥३२॥

नहुष ययाति दिलीप सागर ॥ मांधातृ भगीरथ जमदग्निपुत्र ॥ असित देवल अत्रिकुमर ॥ येथेचि तरले भवाब्धी ॥३३॥

क्षत्रियांतक परशुराम ॥ करी त्रिस्थळी तप उत्तम ॥ मलापहेचा जेथ संगम ॥ असे तेथे दुपारी ॥३४॥

शूर्पालतीर्थी वसे सकाळी ॥ सायंकाळी महेंद्राचळी ॥ पापे यापरी समूळ जाळी ॥ चंद्रमौळीसुत म्हणे ॥३५॥

तीन आहेत रामाश्रम ॥ जे का सकळ तीर्थधाम ॥ तेथे स्नान करोनि नाम ॥ घ्यावे शिवाचे मानवे ॥३६॥

माघमासी कार्तिकेसी ॥ स्नान करोनि संगमासी ॥ करिता शंकरापुढे स्तुतीसी ॥ ज्ञानसिद्धी होतसे ॥३७॥

ऐसे ऐकोनि गौतमाक्षर ॥ येरू म्हणे झाला तर ॥ सांगा तुम्ही हो कृपासागर ॥ मज अनायासी भेटला ॥३८॥

ऐसी दाल्भ्यविनवणी ॥ ऐकोनि बोले गौतममुनी ॥ वीरभद्र पिनाकपाणी ॥ कुलवर्धन काम हा ॥३९॥

स्थाणु पशुपति महादेव ॥ वृषभध्वज अनंत शिव ॥ सिंह चंडीश भैरव ॥ पार्वतीप्रिय तुरीय ॥४०॥

चंडीश शूली गुरुतर गुरू ॥ गुह्य प्रजापति जगद्‍गुरू ॥ नागभूषण कपिल हरू ॥ खंडपरशु वृषात्मा ॥४१॥

पद्मनाभ वृषवर्धन ॥ पद्ममूर्ति दीप्तिमान ॥ भूतनाथ क्रूरनयन ॥ अज प्रचंड अव्यय ॥४२॥

नामस्तोत्र बोलोनि नमन ॥ शिवाकरिता कैवल्यधन ॥ हाता येईल तुझे जाण ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥४३॥

परिसोनि यापरी दाल्भ्य ऋषी ॥ नमन करोनि गौतमासी ॥ मलापहेचे संगमासी ॥ जावोनि करी यथोक्त ॥४४॥

वळता कृष्णा मेघडंबर ॥ तात्काळ जाहला मुनिशरीर ॥ राहोनि तेथेचि निरंतर ॥ घर मुक्तीचे मेळवी ॥४५॥

ऐसा इतिहास शंकराने स्कंदासि गिरिजेसि सुहर्षाने ॥ कैलासपर्वती कार्तिकाने ॥ तोचि कथिला मुनीसी ॥४६॥

नारद म्हणे मुनिवराला ॥ मीही कथियला तो तुम्हाला ॥ सांगेन पुढेही चरित्राला ॥ मलापहेचे मुनी हो ॥४७॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ चौपन्नावा अध्याय हा ॥४८॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये मलापहासंगमवर्णनं नाम चतुःपंचाशत्तमोऽध्यायः ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP