मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय २८

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय २८

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जय जय जय कृष्णे भवहारिणी ॥ तूचि आमुची बाप जननी ॥ तुझे ज्ञानपय आम्हा पाजुनी ॥ भूकअज्ञान नीववी ॥१॥

आता श्रोते सावधान ॥ म्हणे ऋषीला महासेन ॥ केला व्यासासि जो प्रश्न ॥ याज्ञवल्क्यऋषीने ॥२॥

उत्तर तयांते काय बोलिला ॥ तेचि सांगतो मी तुम्हांला ॥ मध्यदेशी एका द्विजाला ॥ बाळक होईना मुळीच ॥३॥

विप्र होता वेदवेत्ता ॥ तरी लागली पुत्रचिंता ॥ परी लाधला चार सुता ॥ म्हातारपणी सुदैव ॥४॥

आता सुतांचे सुख पहावे ॥ आयुष्य सरले तव आघवे ॥ वडिल बाईल पतीसवे ॥ मरण पावे यापरी ॥५॥

धाकुटी होती बाईल तया ॥ ती तव आली असे वया ॥ सुंदर असे जिची काया ॥ परी वाया पतीविणे ॥६॥

त्रासूनिया मदनबाणे ॥ देश सोडिला तदा तिणे ॥ जळो तरुणविधवाजिणे ॥ दुःख भोगणे सर्वथा ॥७॥

प्रांत कोकण एक नगरी ॥ तेथे जावोनि ती सुंदरी ॥ स्वैरविहार यथेच्छ करी ॥ धर्म सांडोनि आपुला ॥८॥

इकडे कोणी सज्जनाने ॥ तिचे सुतांची मौजीबंधने ॥ केली वेचोनि आपुले सोने ॥ अनेक वसने वाटिली ॥९॥

यापरी होता मौजि सोहळा ॥ बुद्धि उपजली तया बाळा ॥ की घेवोनि विकत बैला ॥ व्यापार करावा विदेशी ॥१०॥

ऐसा विचार करोनि मनी ॥ चौघे निघाले देश सोडुनी ॥ दुकान देशांतरी थाटुनी ॥ वणिजवृत्तीने राहिले ॥११॥

एकदा घेवोनि माल विपुल ॥ जात असता तेथोनि सकळ ॥ मार्गी देखोनि चोरमंडळ ॥ गळबळीत जाहले ॥१२॥

माल टाकोनि तात्काळ तेथ ॥ चौघे पळाले धावत धावत ॥ रत्‍ने होती जवळ गुप्त ॥ एक नगरा पातले ॥१३॥

तया नगरामाजि वेश्या ॥ वसत होती तया ठाया ॥ जाता म्हणे ती अहो या या ॥ श्रीमंत चौघा देखुनी ॥१४॥

दूर देशापासाव आला ॥ येथे राहता रतिसुखाला ॥ देईन म्हणे घालोनी डोळा ॥ वेळोवेळा कामिनी ॥१५॥

ऐसे ऐकोनि कामलंपट ॥ तेथेचि राहिले ते उद्धट ॥ म्हणती क्षुधेने पीडिले पोट ॥ वाट आधी लाव ही ॥१६॥

यापरी परिसोनि ती सुंदरी ॥ आली घेवोनि फळे पदरी ॥ देवोनि चौघा हात पसरी ॥ म्हणे विषयफळ बदल द्या ॥१७॥

हांसोनि चौघे फळे खाती ॥ रत्‍ने दिधली तिचे हाती ॥ तुष्ट जाहली कामिनी ती ॥ रतिसुखासि द्यावया ॥१८॥

देवोनि तांबूल चौघा जणा ॥ वारा घाली घेवोनि विंझणा ॥ थट्टा करितसे नाना ॥ नट्टपट्टा करोनी ॥१९॥

तव जाहले एक नवल ॥ चौघामाजी धाकुटा कुशल ॥ तयाने देखिले वदनकमल ॥ अयन्यामजी तियेचे ॥२०॥

सवेंचि पाहे आपुले मुख ॥ म्हणे हर हर धिक धिक ॥ कैचे जन्मलो आम्ही मूर्ख ॥ माता आमुची ही की हो ॥२१॥

होवोनि सर्वही अत्यंत खिन्न ॥ करिती तियेसी तात्काळ नमन ॥ तीही जाणोनी निजनंदन ॥ उद्विग्न बहुत जाहली ॥२२॥

होवोनि चौघांसि पश्चात्ताप ॥ म्हणती अहो घोर पाप ॥ आम्हांसि घडले बाप बाप ॥ काय आता करावे ॥२३॥

ऐसे जाहले चिंतातुर ॥ तव देखिले ज्ञानचतुर ॥ ब्रह्मरूप ब्रह्मज्ञ विप्र ॥ प्रारब्धयोगे तयांनी ॥२४॥

तत्काळ तयांचे जावोनि पाय ॥ धरोनी म्हणती बाप माय ॥ तुम्हीच आमुते आता उपाय ॥ सांगा सदय होवोनी ॥२५॥

करिता यापरी तया विनंति ॥ ब्राह्मण सांगती चौघांप्रती ॥ अनुताप जाहला तुम्हा चित्ती ॥ हेचि तीर्थ श्रेष्ठ पै ॥२६॥

ज्ञानतीर्थ मानसतीर्थ ॥ धैर्य सात्त्विक हेचि तीर्थ ॥ शुद्ध अंतःकरणतीर्थ ॥ श्रेष्ठ सर्वात बाप हो ॥२७॥

स्नान करिता जळांतरी ॥ कदा नोहे निर्मळ अंतरी ॥ जो का असे मळ शरीरी ॥ जले तोचि जाईल ॥२८॥

तया बोलती पंडित स्नान ॥ जेणे होतसे शुद्ध मन ॥ शुद्ध होता भेटोनि सज्जन ॥ ज्ञानसागरी बुडविती ॥२९॥

बुडविता अवघेचि ज्ञान दिसे ॥ विश्व भासे मृगजळ तसे ॥ सच्चिदानंदघन प्रकाशे ॥ नासे अज्ञानतिमिर जे ॥३०॥

अज्ञानतिमिरे विषयसुख ॥ वाटे गोमटे परी दुःख ॥ जैसे परिपूर्ण अंतरी विख ॥ मोदक मुखी घालिता ॥३१॥

घालिता उडी पापडोही ॥ नरकयातना उग्र पाही ॥ म्हणोनि आईचा आपुलाही ॥ उद्धार करा बाप हो ॥३२॥

आता पुढे तोचि गुरू ॥ करितील कथन तीर्थ थोरू ॥ तेचि कथेचा विस्तार करू ॥ संसारसागरू तराया ॥३३॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ अष्टाविंशोऽध्याय हा ॥३४॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये सर्वतीर्थवर्णनं नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP