मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय १६

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय १६

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जय जय कृष्णरूपिणी सरिते ॥ आता न सेवी तुझियापरते ॥ तुज देखोनि येतसे भरते ॥ आनंद माते नावरे ॥१॥

माता पिता कृष्णानदी ॥ स्मरण करिता तियेचे आधी ॥ नष्ट होती संसारव्याधि ॥ आदिमाता बुद्धिदा ॥२॥

नारद म्हणे दंड सहस्त्र ॥ निर्जनापासाव गणेशप्रवर ॥ तीर्थ असे हो विघ्नहर ॥ कृष्णादक्षिणतटाकी ॥३॥

जेथे गणेश करिता तप ॥ सकल सिद्धीचा होय अधिप ॥ तेथे सतिल स्नाने अमुप ॥ पुण्य गणपा पूजिता ॥४॥

माघ शुक्ल चतुर्थीसी ॥ गणेशतीर्थी गणेशासी ॥ पूजिता करूनि स्नान त्यासी ॥ सर्व सिद्धी होईल ॥५॥

दूर्वामिश्र अक्षतेसी ॥ रक्त कमले गणेशासी ॥ पूजोनि जपता षडक्षरासी ॥ विघ्ननाश होतसे ॥६॥

चतुर्थीसी उपोषण ॥ सहस्त्रशत मोदकान्न ॥ गणेशतीर्थी गणेशार्पण ॥ करिता पूर्ण अभीष्टे ॥७॥

ऐसे गणेशप्रवरतीर्थ ॥ तेथोनि कोशावर कोटितीर्थ ॥ स्मरणे जयाच्या इच्छिला अर्थ ॥ होय सार्थक जन्माचे ॥८॥

कोटीश्वराचा अनंत महिमा ॥ आता सांगतो सर्व तुम्हा ॥ निर्दोष करी जो भार्गवरामा ॥ अणिमादि सिद्धिकारक ॥९॥

रामनामे जामदग्न्य ॥ ब्रह्मचारी महा धन्य ॥ दुःख होता पितृजन्य ॥ कार्तवीर्य वध करी ॥१०॥

कोपोनिया भार्गवमुनी ॥ निःक्षत्रिय करी मेदिनी ॥ एकवीस वेळा रक्तमासांनी ॥ पूर्ण कदन क्षत्रियांचे ॥११॥

एक वीर पृथ्वीवर ॥ यज्ञ करी परशधर ॥ दान देत महाथोर ॥ सर्व पृथ्वीचे कश्यपा ॥१२॥

परि चिंताज्वर मानसी ॥ की हत्या केल्या बहुवसी ॥ कैसेनि जळे पापराशी ॥ म्हणे सुत रेणुकेचा ॥१३॥

तव पातला अगस्तिमुनी ॥ पुसे तयालागूनि चरणी ॥ पापनाशक उपाव झणी ॥ करी कथन दयाळा ॥१४॥

धर्म केला व्रते बहुत ॥ परी नोहे चित्त शांत ॥ कोठे जाऊ सांगा त्वरित ॥ तीव्र तप कराया ॥१५॥

प्रश्न ऐकोनि कुंभोद्भव ॥ बोले रामासी हा उपाव ॥ घेता कृष्णेसि बा धाव ॥ ठाव नुरे पातका ॥१६॥

जी का असे कृष्णतनु ॥ भक्तवत्साची कामधेनु ॥ तियेचे करिता स्नानपानु ॥ नुरे क्षत्रहत्यादि ॥१७॥

इष्टापूर्तादि यज्ञ करिता ॥ जे का फल असे तत्त्वता ॥ तयाहूनि अधिक सेविता ॥ तारक कृष्णाजीवना ॥१८॥

ऐसे बोलता अगस्ति ऋषि ॥ संतोष वाटे राममानसी ॥ सह घेवोनिया तयासी ॥ कृष्णातीरासी पातला ॥१९॥

येवोनि जेथे कालिया सर्प ॥ करिता अत्यंत उग्र तप ॥ नष्ट करी ब्रह्मशाप ॥ तेथे भार्गव पातला ॥२०॥

नागतीर्थ तया नाम ॥ जेथे असे गौतमाश्रम ॥ गौतमेश निकट उत्तम ॥ तेथे अगस्ति तप करी ॥२१॥

अगस्त्ये पूजिला ईश्वर ॥ तोचि होय अगस्तीश्वर ॥ तया ठायी क्षत्रियांतकर ॥ करी स्नान भक्तीने ॥२२॥

सह्यजेच्या दक्षिणतटी ॥ नष्ट व्हावया पापकोटी ॥ मनी आणोनिया धूर्जटी ॥ नासाग्रदृष्टी भार्गव ॥२३॥

जितश्वास निराहार ॥ तप करी धुरंधर ॥ अगस्त्ये सांगितला मंत्र ॥ शतरुद्र जपतसे ॥२४॥

त्रिकाल करी कृष्णास्नान ॥ सदाशिवाचे नित्य चिंतन ॥ शतवर्षे होता उमारमण ॥ प्रसन्न झाला तयासी ॥२५॥

अंतरीक्षी प्रगट होऊन ॥ रामा म्हणे उमारमण ॥ कोटिपापांचे केले दहन ॥ तुवा कृष्णांबुसेवने ॥२६॥

आता आणीक काय इच्छिसी ॥ सांग वत्सा तेचि मजसी ॥ येरू म्हणे या तीर्थजलासी ॥ कोटितीर्थ असे म्हणावे ॥२७॥

येथेचि करावा तुवा वास ॥ नाम कोटीश्वर जगन्निवास ॥ ऐसे ऐकता भार्गवास ॥ तथास्तु म्हणे पिनाकी ॥२८॥

कोटितीर्थ कोटीश्वर ॥ तेथेचि असे अगस्तीश्वर ॥ धन्य अगस्ती परशधर ॥ कृतार्थ कृष्णाप्रसादे ॥२९॥

कोटितीर्थी गोप्रदान ॥ देता करोनि उपोषण ॥ फल होय सहस्त्रगुण ॥ ब्रह्मनंदन म्हणतसे ॥३०॥

महाशिवरात्री कोटीश्वरा ॥ घृते धरावी अभिषेकधारा ॥ बिल्वपत्रे पूजा करा ॥ वरा मुक्ति कन्येसी ॥३१॥

माघशुक्ल पंचमीसी ॥ स्नान करोनि नागर्‍हदासि ॥ शतपत्रे नागेश्वरासी ॥ सदाशिवासी पूजावे ॥३२॥

नैवेद्य द्यावा अनारशांचा ॥ भाव असावा अंतरी साचा ॥ अनुभव घ्यावा सदा सुखाचा ॥ कायावाचामानसे ॥३३॥

रविवारी येता व्यतीपात ॥ गौतमेशाची पूजा करीत ॥ तिलबिल्वपत्रे तया वाहत ॥ रुद्रलोकांत जातसे ॥३४॥

श्रवण नक्षत्र सोमवारी ॥ पितृदेवतर्पण करी ॥ भावे कोटीशपूजा करी ॥ पाप संहारी आपुले ॥३५॥

असे जोवरी कन्येसि गुरु ॥ कोटितीर्थी पापभीरू ॥ ब्रह्मचर्ये तोवरी नरू ॥ असता रुद्र साह्य तो ॥३६॥

कोटीशमहिमा हा अगाध ॥ तुम्हा वर्णिला सर्वकामद ॥ ऐकता जोडे कैलासपद ॥ नारद म्हणे ऋषींसी ॥३७॥

पुढिले अध्यायी कथा सुंदर ॥ शकुंततीर्थ दुरितहर ॥ सांगेल शिवाचा ज्येष्ठ कुमर ॥ श्रवणी सादर असावे ॥३८॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ षोडशोऽध्याय हा ॥३९॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये कोटितीर्थवर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥


References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP