मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री कृष्णा माहात्म्य|
अध्याय ३२

श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ३२

विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

जय जय कृष्णाबाई माते ॥ भयापासाव तारी माते ॥ नमितो तुझिया पादपद्माते ॥ अनन्यभावेकरोनी ॥१॥

मयूरवाहन ऋषींप्रती ॥ म्हणे द्यावे अवधान पुढती ॥ माता जयाची सत्यवती ॥ याज्ञवल्क्यासि तो म्हणे ॥२॥

वेदनदीचा कृष्णावेणीसी ॥ संगम हाचि गा देख यासी ॥ संगमेश हा पापनाशी ॥ घेता दर्शन इयाचे ॥३॥

या संगमी स्नान करिता ॥ संगमेशा डोळा पाहता ॥ सकळ पातकांपासाव मुक्तता ॥ सायुज्यताही मिळतसे ॥४॥

वेदनदी हा प्रत्यक्ष निगम ॥ होय तयाचा जेथ संगम ॥ ते हे कृष्णा परं ब्रह्म ॥ महिमा अतर्क्य इयेचा ॥५॥

की हे वेदनदी शक्ती ॥ कृष्णा प्रत्यक्ष पशुपती ॥ गौरीहराची होतांचि भेटी ॥ आनंद पोटी न समाये ॥६॥

वेदगंगा कृष्णावेणी ॥ वाटे संगमी ही कृष्णवेणी ॥ जेथे साक्षात शूलपाणि ॥ सदा संनिहित असे हो ॥७॥

जेथे कृष्णावेदसंगति ॥ तेथ गोदा गंगा गोमती ॥ स्नान करिता पुण्यास मिती ॥ नाही नाहीच मुनी हो ॥८॥

करोनिया संगमी स्नान ॥ लक्ष गायत्री जप करून ॥ कामपूरक देवदर्शन ॥ होवोनि लाधे मुक्तिही ॥९॥

अमावास्या सोमवारी ॥ असे जे का फल सागरी ॥ तेचि मुनी हो संगमावरी ॥ स्नान करिता मिळतसे ॥१०॥

पंचक्रोशक्षेत्र पावन ॥ येथे राहती जे सज्जन ॥ करी तयांचे पाप नाशन ॥ सदाचरण ठेविता ॥११॥

पंचक्रोश हा कल्पवृक्ष ॥ फळे जयाची अर्थ मोक्ष ॥ धर्म कामही पहा समक्ष ॥ याज्ञवल्क्य मुनी रे ॥१२॥

सकलतीर्थशिरोमणी ॥ हेचि जाणिजे गा त्रिभुवनी ॥ येथे प्रवेश करिता क्षणी ॥ पापहानी होतसे ॥१३॥

जी का सकळ दुर्वासना ॥ समूळ तियेचे करी नाशना ॥ जेथे यमाचे किंकरांना ॥ रिघाव होईना जावया ॥१४॥

ती ही पंचक्रोश भूमी ॥ डोळा देखिली तुवा आणि मी ॥ अहा काय हे तीर्थ नामी ॥ याज्ञवल्क्य मुनी रे ॥१५॥

येथे अयाचित नक्तभोजन ॥ किंवा एकान्न सेवन ॥ करिता सदा सत्य भाषण ॥ पुण्य अमित जोडते ॥१६॥

ब्राह्मणाज्ञा घेवोनिया ॥ स्नान करी जो संगमी या ॥ मिळे जे का पुण्य तया ॥ ते याज्ञवल्क्य ऐक तू ॥१७॥

कोटि देता गोप्रदान ॥ किंवा सकल भूमिदान ॥ जोडे पुण्य ते संगमी स्नान ॥ करिता विप्राज्ञेचि हो ॥१८॥

भूमिप्रदक्षिणा करिता ॥ काळ जातो अवघाचि रिता ॥ यास्तव राहोनि येथे सुचरिता ॥ करिता सार्थक होतसे ॥१९॥

म्हणे कार्तिक ऋषिवरांते ॥ व्यास ऐसे याज्ञवल्क्याते ॥ सांगोनि सांगेल पुढेहि ते ॥ वेदसंगमचरित्र ॥२०॥

कृष्णाकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ बत्तिसावाध्याय हा ॥२१॥

इति श्रीस्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये वेदनदीसंगमेश्वरवर्णनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP